कन्यादान (निर्मला देशपांडे)

nirmala deshpande write article in saptarang
nirmala deshpande write article in saptarang

सुजाता रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. दोन्ही मुली आणि सदानंद अगदी शांत झोपले होते. हिला मात्र अजिबात झोप लागत नव्हती. विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. आपल्या दोन्ही सुंदर, गुणी मुलींकडं तिची पुनःपुन्हा नजर वळत होती. 'बाईच्या जातीत जन्माला येणं एवढं पाप आहे का, की ती कितीही कर्तृत्ववान असली, तरी तिला आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य नसावं? सगळं घरातल्या बाकीच्या मोठ्या मंडळींनी ठरवायचं?'' तिचे डोळे भरून आले. मुलींच्या डोक्‍यावरून हलकेच हात फिरवत ती पुटपुटली ः 'माझ्या चिमण्या.''

विमानानं आकाशात झेप घेतली. कदाचित ते प्राचीचंच असेल, असं मानून सर्वांनी निरोपाचा हात हलवला. तो प्राचीला दिसणार नव्हताच; पण आपल्या मनाचं तेवढंच समाधान. खरं तर दोन तासापूर्वी प्राची विमानात बसण्यासाठी आतल्या भागात गेली होती. तिच्याबरोबर कुणालाही आणखी आत जाता येत नव्हतंच; पण तरीही सगळे जण विमान निघेपर्यंत थांबले होते. आता ती दोन वर्षं दिसणार नव्हती, म्हणूनच सगळे जण तिला डोळ्यांत साठवून घेत होते. ती पण एरवी एवढी धीट असणारी पोरगी शेवटी हळवी झालेली जाणवत होती. 'अगं एवढं काय वाटतंय तुम्हाला? मी तुमच्याशी तिकडून बोलणार आहे. शिवाय आता किती सोयी झाल्यात. मोबाईलवर फेसबुकवर मी तुम्हाला दिसेन, तुम्ही मला दिसाल वेब कॅमेऱ्यावर. गप्पाही मारू,'' असं वरवर हसत म्हणाली आणि पटकन ती मान वळून आत गेली. डोळ्यांतून ओघळणारं पाणी लपवत.

शकूमावशी मैत्रिणीच्या हातात हात घालून उभ्या होत्या, तर प्रतिमा सुजाताच्या अंगाभोवती हात लपेटून तिला आधार देत होती की स्वतःला घेत होती? सुजाता हलकेच तिच्या हातावर थोपटत होती आणि आतून दाटून आलेले हुंदके महत्प्रयासानं बाहेर पडू देत नव्हती. मात्र, त्याच वेळी प्राचीच्या जन्मापासूनचा इतिहास सुजाताच्या डोळ्यासमोर उभा राहिला.
***

सुजाता रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. दोन्ही मुली आणि सदानंद अगदी शांत झोपले होते. हिला मात्र अजिबात झोप लागत नव्हती. विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. आपल्या दोन्ही सुंदर, गुणी मुलींकडं तिची पुनःपुन्हा नजर वळत होती. 'बाईच्या जातीत जन्माला येणं एवढं पाप आहे का, की ती कितीही कर्तृत्ववान असली, तरी तिला आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य नसावं? सगळं घरातल्या बाकीच्या मोठ्या मंडळींनी ठरवायचं?'' तिचे डोळे भरून आले. मुलींच्या डोक्‍यावरून हलकेच हात फिरवत ती पुटपुटली ः 'माझ्या चिमण्या.''

सकाळी घरातल्या कामाच्या रामरगाड्यात, ऑफिसच्या गडबडीत मग दुसरा विचार करायला मग वेळच नव्हता. आदल्या दिवशी सासूबाईंच्या बालमैत्रीण शकूताई आल्या होत्या. त्या दूर कोकणात असत; पण वर्षं- दोन वर्षांनी केव्हा तरी त्यांची चक्कर असे. दोघीचं बालपण एका वाड्यात गेलेलं. लग्नानंतरही ही मैत्री घट्ट टिकून होती. एकमेकींना पत्र लिहिणं, फोन करणं, एकमेकींकडं कौतुकानं लग्नकार्याला हजर राहणं अशामुळं दोन्ही कुटुंबांत पुढच्या पिढीतही कौटुंबिक जिव्हाळा होता. दोघींनाही मन मोकळं करायला हक्काची जागा होती. दोन्ही कुटुंबांत दोघींबद्दल आदर होता. कर्तृत्वाचं कौतुक होतं. शकूमावशी कोणाकडं तरी लग्नाला आल्या होत्या. यावेळी त्या जवळजवळ चार वर्षांनी आल्या होत्या. त्यामुळं दहा-पंधरा दिवसांशिवाय त्यांची सुटका नव्हती.

दोन दिवस असेच गेले. खरं तर एरवी शकूमावशी आल्या, की सगळ्याबरोबर सुजातासुद्धा खूप उत्साहानं त्यांच्याशी गप्पा मारणं, फिरायला जाणं, जमेल तेव्हा पत्त्यांचे दोन डाव टाकणं यात भाग घेत असे. त्यांच्या सुगरणपणाला दाद देत त्यांच्याकडून काही नवे-जुने पदार्थ शिकायला तिला आवडत असे. त्या कोकणात राहत, त्यामुळं तिकडचे वेगवेगळे पदार्थ शिकायला अन्‌ चाखायला मिळतं. खूप मजा येई. शकूमावशीही आपल्या या बालमैत्रिणीच्या कुटुंबात छान रमत. लेकीचं, सुनेचं मुलांचं कौतुक करत. नातवंडांचेही लाड करत. असे मजेत आठ-दहा दिवस सहज निघून आणि मग सगळ्यांना कोकणात आंबे खायला यायचं निमंत्रण देत त्या एसटीत बसत.

मात्र, यावेळी घरातलं वातावरण ठीक नव्हतं. सुजाता खूप थकलेली, उदास वाटत होती. ती त्या दिवशी ऑफिसमधून लवकर आली होती. डोकं दुखतंय म्हणून आपल्या खोलीत पडली होती. हॉलमध्ये दोघी मैत्रिणी हलक्‍या आवाजात बोलत होत्या, ते तिला ऐकू आलं. शकूमावशी सासूबाईंना तिच्या तब्येतीबद्दल विचारत होत्या ः 'काय गं यशोदा, यावेळी मला सुजाताची तब्येत आणि मनःस्थितीही बरी दिसत नाही. पार सुकलीय पोर. काय होतंय गं तिला?''

'अगं काही नाही. तुला माहितीच आहे. सदानंद आमचा एकुलता एक- तीन मुलींच्या पाठीवर झालेला- मुलगा. आता त्याला लागोपाठ दोन मुलीच झाल्या. म्हणून म्हटलं तिसरी संधी घ्या. खूप मागं लागले, तेव्हा घेतली. आता मुलगाच हवा, ही आपली माझी अपेक्षा. आमच्या वंशाला दिवा हवाय. तिला म्हटलं- आता ती गर्भलिंग परीक्षा, गर्भजलपरीक्षा काय काय असतं ते करून घे. मुलगा असेल तर ठीक.''
'यशोदा, काय बोलतीयेस तू- चांगली सुशिक्षित असून? अगं, ही गर्भलिंग, गर्भजल परीक्षा ही मुलगी असेल तर नष्ट करायला नाही. कायद्यानं तो गुन्हा आहे. ती करणारे डॉक्‍टर आणि ती पेशंट दोघांनाही त्यामुळं शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. मीसुद्धा ऐकलंय बरं का त्याबद्दल. अगं, गर्भात असतानाच बाळाला काही विकृती, आजार नाही ना यासाठी ही तपासणी डॉक्‍टरांना आवश्‍यक वाटली तरच ती ते करतात. दुर्दैवानं तसं काही असेल, तर तातडीनं औषधोपचार सुरू करता येतात. निकोप बाळ जन्माला येतं.''

'होय, ते ठीकय गं! पण आम्हाला आता नातूच हवाय, म्हणून मी तिला तसं म्हटलंय. शिवाय प्रपंचही फार वाढवायचा नाही ना! नाही तर आम्ही तरी कशाला या भानगडीत पडतोय? अगं,ं म्हणून ती नाराज आहे.''
'अगं, तिचं बरोबरच आहे. मुलगी असली म्हणून काय झालं? आपलं मूल आपणच असं जन्माला यायच्या आधीच... छे! छे! ठीकाय; पण यावर माझ्याकडे एक उपाय आहे. बघ तुला पटतो का?'' ः शकुताई. 'काय उपाय आहे सांग तरी,'' सासुबाई उत्सुकतेनं म्हणाल्या.

'हे बघ, आधी शांतपणे ऐकून घे. मग सावकाश, विचार करून उत्तर दे. मला घाई नाही. तुला माहीतच आहे माझ्या मुलाच्या- प्रदीपच्या लग्नाला चौदा वर्षं झालीत; पण मूल नाही. डॉक्‍टरी तपासण्या, औषधोपचार करूनही काही उपयोग नाही. आमची प्रतिभा खूप गुणी मुलगी आहे. तिला मुलांचीही आवड आहे, म्हणून अनाथाश्रमातून एखादं बाळ दत्तक घेण्याचा आम्ही विचार करतो आहोत,'' शकूमावशी म्हणाल्या.
'अगोबाई, हो का? चांगला विचार आहे तो तुमचा. तुमच्या घरी बाळ येईल. त्यालाही आई-बाबा मिळतील. तुझ्यासारखी छान आजी मिळेल,'' सासूबाई खुशीत म्हणाल्या. शकूमावशी त्यावर म्हणाल्या ः 'पण तुझ्या घरातली समस्या ऐकल्यावर एक विचार मनात आला. बघ पटतोय का? या वेळेला सुजाताला मुलगा झाला, तर प्रश्‍नच नाही; पण मुलगी झाली तर माझा प्रदीप, प्रतिमा तिला दत्तक घेतील. म्हणजे हे तुमचं आमचं खासगीत राहील. लोकांना प्रतिमालाच मुलगी झाली असं वाटेल अशी व्यवस्था करायची आणि हो! तू तुझ्या डोक्‍यातून ते गर्भजल परीक्षेचं वेड अगदी आत्ताच्या आत्ताच पूर्ण काढून टाकायचं हं. कबूल?'' थोडा वेळ विचार करून, 'मी मुलांना, यांना विचारते,'' असं सासूबाई म्हणाल्या. पुढं त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि यथासांग पार पडलं. अगदी या कानाचं त्या कानाला न कळता.
***

खूप वर्षांनी बाळंतपण म्हणून प्रतिमा शहरात त्यांच्याकडं राहायला आली. सुजाताला मुलगी झाली आणि प्रतिमा "आई' झाली. एका डोळ्यात आसू अन्‌ दुसऱ्या डोळ्यात हसू घेऊन सुजातानं आपल्या हातानं प्रतिमाला कन्यादान केलं. आपल्या हाडामांसाचा तो इवलासा गोळा दुसऱ्याला द्यायचा म्हणून दुःख, तर एका आई बनू न शकणाऱ्या आईला मातृत्वाचा महान आनंद दिल्याच्या सुखाचं हसू.
***

दिवस भराभर जात होते. प्राची शकूमावशींच्या घरात अतिशय लाडाकोडात आनंदात मोठी होत होती. अधूनमधून शकूमावशी तिला इकडं घेऊन येत होत्या. छान गोरी, देखणी, इवल्याशा बाहुलीसारखी आपली लेक बघताना सुजाताचं आईचं मन कावरंबावरं होत होतं; पण तिनंच तर आपल्या हातानं तिचं दान केलं होतं. अर्थात अगदी नाईलाजानं तसं केलं नसतं, तर कदाचित तिला हे जगही बघायला मिळालं नसतं.
नंतर संदीप जन्माला आला. वंशाला दिवा मिळाला. घरात आनंदीआनंद झाला. दोन्ही मोठ्या मुली शिकल्या. जनरितीप्रमाणं त्यांची लग्नही झाली. या सगळ्या समारंभांना शकूमावशी अगदी आवर्जून प्रदीप, प्रतिमा, प्राचीसह हजर राहिल्या. सुजाताचं आईचं मन त्यांनी जाणलं होतं. आई म्हणून प्राचीला तिला जवळसुद्धा घेता येत नव्हतं.
संदीप बुद्धीनं सामान्य होता. दरवर्षी पास होत होता इतकंच आणि प्राची? प्राची आज अमेरिकेला निघाली होती. अगदी डिग्रीपर्यंतच्या शिक्षणात तिनं कधी पहिला नंबर सोडला नव्हता. सगळं शिक्षण स्कॉलरशिप मिळवून केलं होतं आणि आताही पुढच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतल्या एका नामवंत विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवूनच ती तिकडं निघाली होती.

परत एकदा सुजातानं सुख-दुःख बरोबरच अनुभवलं. आपल्यापुरतंच. एवढी हुशार, देखणी मुलगी आपली आहे, याचा स्वतःपुरताच अभिमान आणि तिचं दान केल्याचं आभाळाएवढं दुःख, अगतिकता. एक मात्र उल्लेखनीय होतं. या सगळ्या प्रसंगात सदानंद तिच्याबरोबर होता. तिला सावरत होता. तिची मनःस्थिती जाणत होता. त्यालाही या कन्यादानाचं अतिशय दुःख होतंच की; पण तोही परिस्थितीपुढं अगतिक होता. यात एकच अत्यंत आनंदाची गोष्ट होती. प्राची अतिशय सुखात आनंदात होती.
***

आज प्राचीला सोडायला सगळे जण एअरपोर्टवर आले होते. सुजाताची मनःस्थिती ओळखून शकूमावशींनी हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला आणि त्या तिच्या कानात पुटपुटल्या ः 'तुझे आमच्यावर अगदी डोंगराएवडे उपकार आहेत पोरी. केवढं अमूल्य, देखणं दान तू आम्हाला दिलंस. तुझे हे उपकार न फेडता ते सदैव आमच्यावर राहण्यातच त्याचा मोठेपणा आहे आणि बाळा ते कशानंही फिटणारच नाहीत गं. पोरी तू धन्य आहेस. एक विझूविझू पाहणारं घर तू एका सुंदर नंदादीपाच्या प्रकाशानं उजळून टाकलंस.'' त्या तिच्या पाठीवर थोपटत राहिल्या आणि आतून दाटून आलेले अश्रू आवेगानं मागे सारत सुजातानं आईच्या मायेनं प्राचीला अनेकानेक शुभाशीर्वाद दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com