'अगला स्टेशन...' (नीती मेहेंदळे)

niti mahendale
niti mahendale

मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी जवळ नेत होता...

सकाळची 8.40 ची कर्जत फास्ट लोकल मुलुंडला थांबली. धावपळ करत फर्स्ट क्‍लासचा खांब हातात आला. हुश्‍श! मागून तिच्या पाठीवर एक थाप पडली ः ""काय गं! आज पण उशीर...?''
आत बसलेल्यांवर नजर फिरवत अंदाजानं डोळ्यांनीच "कुठं उतरणार?' असा प्रश्न विचारायचा आणि डोंबिवलीवाली "ये' म्हणाली तर जिंकली मग अंबरनाथपर्यंत!
राधाच्या घाटकोपरच्या दुकानाचं आज उद्‌घाटन झालं, त्यामुळे ती सजून-नटून आलेली. पेढ्याचं बॉक्‍स पुढं करत म्हणाली ः ""कशी दिसतेय?''
"छान' असं खुणेनंच म्हणत तिनं पेढा तोंडात सरकवला.
आणि तिनं मनाशीच म्हटलं ः "पिट्ट्या पडला आज कामाचा. उद्या प्रेझेंटेशन. लवकर बोलावलंय. आठच्या लोकलनं जेमतेम पोचेन. सव्वासातची मिळाली तर ग्रुप असेल. कुणीतरी असेलच. निवांत जाईन बसत-उठत.'
सगळं या लोकलच्याच आजूबाजूनं चाललेलं आयुष्य. "लाईफलाईन' काय उगाच नाव नाही तिचं. मग थोड्या बऱ्या हिरव्यागार मऊ पाठीला रेलून तिनं डोकं विसावलं. एक फार लांबवर ना गेलेला भूतकाळ फ्लॅशबॅक होऊन तरळत राहिला. रेलगाडी...रेलगाडी...झुकझुक झुकझुक... बीचवाले स्टेशन बोले...रुकरुक रुकरुक. अशोककुमार ऊर्फ दादामुनींनी अजरामर केलेलं हे गाणं "छायागीत'मध्ये झळकलं की आमची कॉलर टाईट...आपल्या स्टेशनचं नाव त्यात म्हणून! दुसऱ्या दिवशी शाळेत मुलींचं डिस्कशन, त्यातली कोणकोणती स्टेशन्स मुंबईतली होती यावर! पण लोकलची तशी धास्तीच वाटायची. अगदी लहानपणापासून. मिळेल का, वेळेवर पोचेल का, बसायला जागा मिळेल का, चढता येईल का, झोप लागून गेली तर, परत कसं जायचं, फास्ट कोणती, स्लो कोणती... असे असंख्य प्रश्न इवल्याशा मनात गोंधळ घालत असायचे; पण मोठी होत गेली तसं तिचं महत्त्व समजत गेलं आणि सोपं होत गेलं सगळं. मुंबईचं आयुष्यच मुळात घड्याळाच्या काट्यावर चालतं आणि त्याला मुख्य भक्कम आधार या लाईफलाईनचा. लाईफलाईनच! तिचं जाळं मुंबईच्या नसानसांना व्यापून आहे. मुंबईनं तिची सगळी रूपं पहिली आहेत. अगदी भकभक धुराच्या इंजिनवाल्या गाडीपासून ते अगदी नव्या नवलाईच्या मेट्रोपर्यंत सगळीच. ब्रिटिशांनी ती डौलात आणली आणि आपण तिला "यूजर-फ्रेंडली' बनवली! अगदी डबेवाल्यांचा, भाजीव्यापाऱ्यांचा खास डबा असो किंवा परीटघडीचा फर्स्ट क्‍लास असो. तिच्यासाठी सगळे चाकरमानीच. सगळ्यांनी कधीतरी आयुष्यात फूटबोर्डवर उभं राहून प्रवास केलेला. तिच्याशी इमानी सगळेच आणि तीही सगळ्यांशी! प्रत्येक मुंबईकराला आपलं म्हणत त्यांना दिवस-रात्र अथक वाहून नेत असलेली. स्वतःचं महत्त्व जाणून असलेली.
***

तिला आता दिसल्या पिटक्‍या पिटक्‍या दोन बहिणी. आई-बाबांबरोबर भयंकर टेन्शनमध्ये गाडीत चढायचा प्रयत्न करणाऱ्या. शेवटी फलाट आणि पायरी यांच्यातलं मधलं अंतर लहान पायांच्या आवाक्‍यातलं नसल्यानं त्यांना उचलून वर ठेवण्यात आलं. मग टेन्शन... बाबा गाडीत चढले का याचं. किती ती लहान जीवांची घालमेल. पार भायखळ्यापर्यंत. मग बसलेल्या
माणसांच्या पायांमधून वाट काढत खिडकीत गच्च गज पकडून सक्तीनं बाहेर गंमत बघत उभं राहायचं. अर्धं लक्ष आई-बाबा दिसतायत का इकडंच. तसे ते कमी गर्दीचे दिवस. आतापेक्षा. कुणाला जाणवत नसलेली धडधड तिच्या हृदयात. आधी बिनसवयीचं असल्यानं फलाटावर इंडिकेटर शोधत आणि मग वाट पाहणं ट्रेनची. पहिल्या एकट्या प्रवासाचा नवखेपणा प्रयत्नपूर्वक चेहऱ्यावर दिसू न देता ती चढत होती. एरवी, आई-बाबांचं सुरक्षाकवच असताना हुशारीनं बसायला जागा शोधायला धावणारे पाय दरवाज्याजवळच अंग चोरून उभे राहिले. भिरभिरती नजर सगळं डब्यातलं विश्व टिपत होती.

"हाथ रंगने की मेहंदी लालम्‌ लाल, मारवाडी मेहेंदी मारवाड की' असे काहीसे पुकारे करत एक गुजराथी जीर्ण पदर हिंडत होता...पेटी वाजवत गाणं म्हणणारा एक भिकारी अंदाजानं चालत थबकत होता...लहान मुलांची पुस्तकं घेऊन विकणारी कुणी लहान मुलं कळकट्ट कपड्यात फिरत होती...कुणी अनुभवी मुलगी स्मित करत होती तिच्याकडं पाहून. तिनं अनोळखी हास्यानं परतफेड केली आणि तिचा नवखेपणा असा प्रांजळ समोर आला. "अशी ओळख झाली की जागा मिळते आणि अडीअडचणीला उपयोग होतो,' असा मोलाचा सल्ला देऊन ती मुलगी तिच्या सोबत उतरायला उभी राहिली. एकदाचं दादर स्टेशन आलं आणि जिंकल्याच्या आविर्भावात तिनं फलाटावर पाय ठेवला. त्या क्षणापासून तिची भीती, धास्ती कुठल्या कुठं पळून गेली आणि तिचे ऋणानुबंध जुळले ट्रेनशी. वातावरण हलकं करत प्रवास सुखाचा करणारे विक्रेते, ट्रेनची पत्र्याची भिंत बडवत आपल्याच नादात भजनं म्हणणारे प्रवासी, कुणी पुस्तक वाचत असलेलं, तर कुणी अखंड बडबड करत, कुणी साध्यासुध्याच, तर कुणी नटून-थटून...तिला ते सारं जग हवंहवंसं वाटायला लागलं. मुंबईचं प्रेमात पडायला लावणं नकळत हे असं होत राहतं. पुढं लांब पल्ल्याच्या ट्रेननं अंगावर आलेलं अंतर कापताना तिला या "ट्रिक'चा उपयोग झाला. वेगवेगळ्या वेळी ट्रेन पकडत राहिल्यानं प्रत्येक ट्रेनमध्ये तिचे ग्रुप झाले. चिकार मैत्रिणी झाल्या. जिवाभावाच्या. आठवणीनं जागा राखून ठेवणाऱ्या. बहुतेक एकाच वयोगटातल्या असल्यानं सासुरवाशिणींची सुख-दुःखं जवळपास सारखीच असायची. कधी कुणी नरम असायची, हळवी होऊन आलेली. तिला सगळ्या आपल्यात घेऊन तिची कळी खुलवायच्या. मग अंताक्षरीच्या फेऱ्या झडायच्या. सणवार, वाढदिवस, हळदी-कुंकू, डोहाळजेवणं असं काय काय सर्रास साजरं व्हायचं. तिला सुटी आता नकोशी वाटायला लागली. ऑफिसमधले अपमान, घरातल्या कुरबुरी चुटकीसरशी भुर्र उडवून द्यायची सवय तिला इथूनच लागली. हळूहळू गर्दी वाढू लागली आणि ऑफिसमधल्या जबाबदाऱ्याही. तिचं रात्रीचं परतणं अनिवार्य होऊन बसलं. एरवी "केवळ स्त्रियांसाठीचे' असलेले डबे रात्री उशिरा आता "जनरल' होऊ लागले. खांद्याला लटकलेली आवश्‍यक पर्स आणि हातात पिशव्या, फाईल्स असं काय काय सांभाळत ती शोधक नजरेनं सुरक्षितता चाचपडत असायची. पुन्हा एकदा कॉलेज सुरू झाल्यावरचा पहिला प्रवास आठवला आणि तिनं अंग चोरलं. समोर बघण्यात अर्थ निघू नयेत म्हणून बाहेर अंधारात शून्य पाहत राहिली. कुणी हाक मारत होतं. "मॅडम, आत या. हे उतरताहेत. बाहेरची गर्दी चढेल.'
ती सरळ सुरक्षित होत आत येऊन बसली. धीटपणे तिनं डब्यात नजर फिरवली. तेव्हा नव्यानंच आलेल्या मोबाईल या प्रकाराशी काहीजण खटपट करत होते. कुणी इअरफोन लावून काही ऐकत होते. कुणी गाढ झोपलेले होते, तर कुणी आवरून-सावरून बसलेले...पण सारे एकाच घडीचे प्रवासी.. एकाच टॅगलाईनखालचे दिसत होतेः "चाकरमानी!'
तिचं निर्धास्त झालेलं मन आत खूप सुखावलं होतं... का? मुंबईच्या या एका लयीत चालणाऱ्या ट्रेननं सगळ्यांना आपल्या ट्यूनमध्ये सामावलं होतं आणि पुन्हा एकदा ती मुंबईच्या गाढ प्रेमात पडली.
***

आज सकाळपासून पावसानं चांगलाच जोर धरला होता. ती ऑफिसमध्ये कामात गुंतलेली आणि बाहेर तिच्या नकळत पावसानं थैमान मांडलेलं... चारच्या आसपास लोकांची चुळबुळ ऐकू आली तशी ती सावध झाली. आता आपल्याला लांब जायचंय, असं मनाशी म्हणत आवराआवर करू लागली. मध्य रेल्वेनं जाणारा समूह जमू लागला आणि ती त्या समूहात गेली. कालिन्याहून कुर्ला स्टेशन येईपर्यंत तिला पावसाची उंची जाणवू लागली. कशीबशी छत्री बंद करत ती नेहमीच्या लोकलसाठी जाऊन उभी राहिली; पण फलाटावर आज वेगळाच सीन सुरू होता. एक रिकामी कर्जत लोकल उभी आणि विखुरलेली गर्दी. कुणी आशेनं आत बसलेलं, तर कुणी बाहेर न सुटणाऱ्या लोकलबद्दल चर्चा करत उभं...ती गोंधळून आजूबाजूला ओळखीची माणसं शोधू लागली. बराच वेळ तिष्ठत राहून तिला समजलं की सतत वाजणारी एक टेप लावून ठेवली आहे ः "कर्जत लोकल थोड्या वेळात सुटेल...' मात्र, गाडी काही जाणार
नाहीये, कारण पुढं ट्रॅकमध्ये पाणी साठलंय...तिच्या ऑफिसचे सहकारी तिला दिसले आणि त्यांच्या निर्णयानुसार बाहेर जाऊन टॅक्‍सी मिळते का पाहायला तीही आशेनं बाहेर पडली. एव्हाना अंधार पडलेला आणि पावसाचा जोर वाढलेला.. कुणीही यायला तयार होईनात. ती रडकुंडीला आली. इथं जवळपास कुणी ओळखीचंही नाही राहत. तिचे नवे, उंच टाचांचे सॅंडल्स तेवढ्यात एका खड्ड्यात पाय ठेचकाळून तुटले. सगळे सल्ला देऊ लागले ः "बाई, लांबच्या ट्रेननं जाणार आता तू.
चढता-उतरताना हे काय कामाचं?'
तिच्या गळ्यात नवं लहान मंगळसूत्र डौलात लटकत होतं. हातात हिरवा चुडा. लग्नाला जेमतेम दोनच आठवडे झाले होते. कसबसं फरपटत ती सगळ्यांसोबत पुन्हा निरुपायानं फलाटावर आली. सर्वानुमते रात्री सुरक्षित उपाय ट्रेन हाच होता. तिला लेडीज डब्यात सोडून शेजारच्या डब्यात तिचे सहकारी चढले. फर्स्ट क्‍लास खच्चून भरलेला. नाखुशीनंच ती सेकंडच्या डब्यात चढली आणि दुर्गंधीची एक लहर तिच्याभोवती तरळून गेली. तरी चिवटपणे तिनं सीटवर बसलेल्यांच्या पायांच्या मध्ये खाली कागद टाकून इतरांसारखी स्वतःसाठी जागा केली. ती आता इंजिनिअर नव्हती की हुशार विद्यार्थिनी की सुंदर स्त्री नव्हती...एक सर्वसामान्य मुंबईकर, रेल्वेची पॅसेंजर होती फक्त...सगळ्या धक्‍क्‍यांचे पडसाद आता डोळ्यांतून वाहायला लागले. नवरा, सासर-माहेर, मित्र-मैत्रिणी कुणीही नव्हतं सोबत...ना कुणाला फोन करायची सोय होती. या अफाट मुंबईत आपण एकटे पडल्याची जाणीव तिला झाली आणि तेवढ्यात... मागून कुणीतरी वडापावचा पुडा तिच्यापुढं धरत होतं. ती मानेनंच "नको' म्हणाली. वर बसलेली वृद्ध बाई प्रेमानं म्हणाली ः" कब से हो यहॉं? कुछ घंटे हुए होंगे. खाया है कुछ?' तिला आठवलं, दुपारपासून काही खाल्लेलंच नव्हतं आपण.. पण तिनं पुन्हा शंकेखोर मनानं त्या वडावापच्या पुड्याकडं पाहिलं.त्या बाईनं तो तिच्या हातात कोंबून म्हटलं ः" बस खाओ. सोचो मत.' आजूबाजूला तिनं पाहिलं तर सगळे तेच खात होते. वर मान करून पाहिलं तेव्हा दिसलं, कुणी स्थानिक माणूस सगळ्यांसाठी
वडापाव घेऊन आला होता. मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी जवळ नेत होता.
***

मुंबई...! तिनं तिच्या आपत्कालीन माणुसकी आणि ओलावा या गुणांवर तिला नकळत आपलंसं केलं होतं. ती सुखरूप होती आता मुंबईच्या कुशीत.. आता ती डब्याच्या बाहेर डोकावून पाहू लागली. बघ्यांची जागा आता स्वयंसेवकांनी घेतली होती. तेही असेच तिच्यासारखे मुंबईनं तत्काळ जन्माला घातलेले... नवजात...! कुणी अन्न वाटत होते तर कुणी स्वच्छतागृह सांभाळत होतं. तिचा ऊर आता अभिमानानं भरून आला आणि तशाही अवस्थेत एक स्मित तिच्या ओठावर उमटलं.
मुंबईचं असं अडचणीच्या वेळेसही जाणवेल असं जीव लावणं तिला फार आवडायचं. प्रत्येक वेळी नव्या रूप-गुणांसोबत सामोरी यायची ती तिच्यासमोर.. सगळे म्हणतात ः"मुंबई फुगलीय, जागा आहेच कुठं?' पण "सरकून घ्या नं... फोर्थ सीट' म्हणत ती बिचारी सगळ्यांना सामावून घेतच राहिली. त्यायोगे तिचा विस्तार अपरिहार्य होता आणि मग ट्रेनची वाढती गर्दीही; पण मुंबईशी नाळ जुळलेला आणि नाडी ओळखून असलेला मुंबईकर गर्दीतही समजून-उमजून वागत राहिला. त्यानं प्रवासात आपुलकीचा हात पुढं केला आणि मित्र जोडले. प्रवासाचा वेळ सुखद केला. रिटायर होणारे सगळे प्रवासी निरोपाचा कार्यक्रम झाल्यावर उतरण्यापूर्वी लाडक्‍या जीवनवाहिनीवर प्रेमानं हात फिरवताना दिसायचे. पूर्वी पहिली दाणकन उडी मारून जोशात चढणारी स्त्री रिटायर झाल्यावर मुद्दाम त्या प्रवासासाठी आलेली तिला दिसायची. देशाची आर्थिक राजधानी असल्याबद्दल मुंबईचा जितका अभिमान वाटायचा तितकीच तिची काळजीही वाटायची. तिला लक्ष्य करण्याच्या शेजारीदेशाच्या कारवाया ऐकून थरकाप उडायचा. आजवर किती प्राणघातक बॉम्बहल्ले झाले हिच्यावर...पण मुंबई आजही त्याच जोशात सुरू आहे तिच्या जीवनवाहिनीसकट.. उलट तिचं जाळं अधिकाधिक विस्तारत आहे. प्रगत होत आहे. वातानुकूलित मेट्रो हे तिचं अत्याधुनिक पिल्लू.. मुंबईच्या अंगावर आता हा नवा दागिना चमकू लागला आहे. तिनं सगळे बदल लीलया स्वीकारले व आत्मसात केले. आता नवी स्टेशनंही समाविष्ट झाली आहेत मध्ये मध्ये.. ही तिच्या विस्ताराची आणि बदलाची चाहूलच.. एक समाधानाची लकेर चेहराभर पसरली आणि करकचून मारलेल्या ब्रेकनं ती जागी झाली. डब्यात आता तुरळक गर्दी होती. बाहेरून गार हवा अंगावर घ्यायला दरवाज्यात उभं रहायला हवं.. पर्स चाचपडत खांद्यावर लटकवली आणि पिशव्या सावरत उभी राहिली. आता कुणाला विचारावं नाही लागत..समोर इंडिकेटर सरकत होता.. मागं अनाउन्समेंट सुरू होती ः "अगला स्टेशन....'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com