'कॉम्प्लेक्‍स' उभारताना... (नितीन दीक्षित)

नितीन दीक्षित
रविवार, 2 जून 2019

शहरांतली-महानगरांतली खेळांची मैदानं कमी होत आहेत, असं म्हणण्याचा काळ कधीच मागं पडला. अशी मैदानं आता शहरांमध्ये जवळपास नाहीतच हे आजचं वास्तव. विकासाच्या नावाखाली या मैदानांवर मोठमोठ्या इमारती उठल्या. मुला-मुलींसाठीची मैदानी खेळांची हक्काची ठिकाणं हिरावली गेली. हीच व्यथा मांडणाऱ्या "कॉम्प्लेक्‍स' या एकांकिकेच्या उभारणीचा प्रवास...

शहरांतली-महानगरांतली खेळांची मैदानं कमी होत आहेत, असं म्हणण्याचा काळ कधीच मागं पडला. अशी मैदानं आता शहरांमध्ये जवळपास नाहीतच हे आजचं वास्तव. विकासाच्या नावाखाली या मैदानांवर मोठमोठ्या इमारती उठल्या. मुला-मुलींसाठीची मैदानी खेळांची हक्काची ठिकाणं हिरावली गेली. हीच व्यथा मांडणाऱ्या "कॉम्प्लेक्‍स' या एकांकिकेच्या उभारणीचा प्रवास...

ते वर्ष असावं 1994- 95. मुंबईत एफटीआयआयची परीक्षा देऊन मी साताऱ्याला परत निघालो होतो. त्या वेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग झालेला नव्हता, त्यामुळे जुन्या महार्गावरूनच माझी बस चालली होती. एकांकिका स्पर्धांचा सीझन जवळ येत चालला होता. मी मुंबईहून परत येईन तेव्हा माझ्याकडं एकांकिकेसाठी एखादा तरी विषय असायला पाहिजे, अशी अट मला माझ्या सहकलाकार-मित्रांनी घातली होती. त्यामुळे बसच्या खिडकीतून बाहेर पाहत माझ्या डोक्‍यात तेच विचार सुरू होते. प्रवासात विचारांना गती मिळते याचा अनुभव मी त्या काळात बऱ्याचदा घेतलाय आणि त्या गतीला ब्रेक लावायला त्या वेळी मोबाईलही नसायचे.

...बसनं खोपोली स्थानक सोडलं. खिडकीतून मागं सरकणारं खोपोली शहर दिसत होतं. माणसांनी उभ्या केलेल्या इमारती हळूहळू विरळ होत, मोकळी मैदानं आणि त्यावर खेळणारी मुलं दिसू लागली आणि चटकन मनात विचार आला की ही मैदानंसुद्धा हे शहर काही वर्षांत गिळंकृत करणार...मग ही मुलं आणखी बाहेर फेकली जाणार...मग ती मैदानंही शहरात जाणार...हे असं होतच राहणार. याच विचारात खंडाळ्याचा घाट सुरू झाला आणि थोड्या वेळानं अचानक जाणवलं की, अरे...हाच तर विषय आहे आपल्या एकांकिकेचा!

साताऱ्यात पोचेपर्यंत एकांकिकेचा ढाचा तयार झाला. शहरातलं एक मैदान, त्यात विविध खेळ खेळणारी मुलं, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचे "स्टम्प्स' असणारं चिंचेचं एक झाड असं स्थळ निश्‍चित झालं. पहिला घाव पडतो तो त्या झाडावरच...झाड का पाडलं गेलं याचा फारसा विचार न करता ती मुलं त्या पडलेल्या झाडाशीच खेळू लागतात...पुढं सगळ्या मैदानावर खड्डे, मग पिलर्स, भिंती उभ्या राहत जातात...या प्रत्येक टप्प्यावर मुलं आपला खेळ बदलत त्या जागेवरून गायब झालेलं मैदान आपल्या मनात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत; पण जेव्हा घरं बांधून पूर्ण होतात तेव्हा त्यांचं मैदान पूर्णपणे हरवलेलं असतं...आता ती मुलं त्यांच्या घरांच्या चार भिंतींत बंदिस्त होऊन जातात...जे झालंय त्याचा अर्थ समजण्याचं त्या मुलांचं वय नाही, जे झालंय ते बदलण्याची समजही त्यांच्याकडं नाही, जे झालंय त्याचे गंभीर परिणाम भोगणं एवढंच काय ते त्यांच्या हाती आहे...

साताऱ्यात पोचलो आणि साताऱ्यातल्या माझ्या जवळजवळ सगळ्या
नाटक-एकांकिकांमध्ये माझ्या सोबतीला असणारा माझा मित्र सचिन मोटे याला गाठलं. त्याला माझ्या मनात आलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यालाही ते खूप आवडलं. मग हे कसं करायचं यावर आमची चर्चा सुरू झाली. त्या वेळी साताऱ्यात नाटकासाठी मुली मिळणं ही गोष्ट खूप अवघड होती. त्यामुळे एकांकिकेत सगळी मुलंच असणार हे आम्ही गृहीतच धरलं होतं. राजेश नारकर, संतोष लोहार, मिलिंद वाळिंबे, जितेंद्र खाडिलकर, सागर गोसावी, प्रकाश बोधे, सचिन गद्रे आणि सचिन मोटे असे आम्ही सगळे एकत्र आलो. आम्ही सगळे विशीतले होतो; पण एकांकिकेतल्या पात्रांची वयं मात्र लहानच होती, त्यामुळे विषय जरी गंभीर असला तरी त्याचं गांभीर्य पात्रांच्या तोंडी येणाऱ्या संवादांमधून थेट प्रकट करणं बेगडी वाटलं असतं. त्यामुळे एकांकिकेचे संवाद हे ती बसवतानाच पक्के करत जायचं असं मी ठरवलं.

साताऱ्यातल्या एका शाळेच्या हॉलमध्ये आमच्या तालमी सुरू झाल्या. तालमीच्या आधी थोडा वेळ आम्ही "लपंडाव', "चिरचिरगुडी', "आंधळी
कोशिंबीर' असे खेळ खेळायचो. कधी कधी या खेळांमध्ये आम्ही इतके वाहत-वाहवत जायचो की त्या दिवशी तालीम व्हायचीच नाही. खेळून झालं की थोडी विश्रांती घेऊन तालीम सुरू व्हायची. मी मुलांना दृश्‍य काय आहे, त्यांनी काय करायचं आहे हे सांगायचो आणि त्या वेळी त्यांना जे जे संवाद सुचतील ते ते बोलायला सांगायचो. ते बोलत असतानाच, जे संवाद योग्य वाटतील ते मी लिहून घ्यायचो आणि मग त्यांत थोडाफार बदल करून ते संवाद पक्के करायचो. हळूहळू एकेक दृश्‍य उभं राहत होतं. पडलेलं झाड रंगमंचावर दाखवण्यासाठी आम्ही ते फरशीवर आखलं. कोणत्या फांदीच्या खालून जायचं, कोणत्या फांदीच्या वरून जायचं हे ठरवलं. नंतर खड्डेही आखले. त्या खड्ड्यांच्या भोवती खेळणारी मुलं
कधी कधी तो खड्डा उडी मारून ओलांडत असत, मग त्याच खड्ड्यांच्या जागी खांब उभे राहिले. त्या अमूर्त खांबांभोवती "दही-भात', "लपंडाव' असे खेळ खेळणारी मुलं त्यांच्या हालचालींमधून त्या खांबांना मूर्त रूप द्यायची.

मी, सचिन गद्रे आणि मोटे...आम्ही माझ्या घरीच
टेपरेकॉर्डरवर इकडचं-तिकडचं गोळा करून पार्श्‍वसंगीत तयार केलं. सचिन मोटेच्या सूचनेनुसार, सगळ्या पात्रांची एकच वेशभूषा ठरवली. पांढरा टी शर्ट आणि निळी जीन्स. प्रकाशयोजना मीच करणार होतो. अनेक दृश्‍यबदल असल्यानं या एकांकिकेत खूप ब्लॅक आउट्‌स करावे लागत होते, ज्यांची मला भीती होती. कारण, रत्नागिरीतल्या एका स्पर्धेत या एकांकिकेचा "खेळ मांडियेला' या नावानं पहिला प्रयोग झाला आणि या ब्लॅक आउट्‌समुळेच तो फसला. आम्ही पुन्हा तालमी केल्या. ब्लॅक आउट्‌स खूप कमी केले. त्या वेळी पुण्यात नंदू पोळ यांचा स्टुडिओ होता. तिथं जाऊन पार्श्‍वसंगीत करावं असं सचिन गद्रेनं सुचवलं; पण त्याला खर्च येणार होता. तो प्रश्‍न राजेश नारकरनं सोडवला. आता सगळ्याच तांत्रिक चुका आम्ही सुधारल्या आणि साताऱ्यातल्या "सायक्‍लो करंडक' स्पर्धेत "कॉम्प्लेक्‍स' या नावानं या एकांकिकेचा दुसरा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला. प्रेक्षकांनी तर कौतुक केलंच; पण पुण्याहून आलेले परीक्षकही त्यांच्या भाषणांत आमच्या एकांकिकेविषयी भरभरून बोलले. त्यांनी पुण्यातही "कॉम्प्लेक्‍स'चं इतकं कौतुक केलं की आम्ही जेव्हा पुण्याच्या "सोऽहम्‌ करंडक' स्पर्धेत ही एकांकिका सादर करायला गेलो तेव्हा भरत नाट्यमंदिर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. पुण्यातल्या या दर्दी प्रेक्षकांनी "कॉम्प्लेक्‍स' अक्षरश: डोक्‍यावर घेतली. इतर अनेक पारितोषिकांबरोबरच, संपूर्ण मोकळ्या रंगमंचावर सादर केल्या गेलेल्या "कॉम्प्लेक्‍स'ला नेपथ्याचं पारितोषिक देऊन परीक्षकांनी गौरवलं. ज्यांनी ज्यांनी "कॉम्प्लेक्‍स'चे हे दोन प्रयोग त्या वेळी पाहिले ते आजही त्या प्रयोगांची आठवण काढतात, ही गोष्ट व्यक्तिश: मला कोणत्याही पारितोषिकापेक्षा मोठी वाटते.
ज्या वेळी आम्ही ही एकांकिका केली, त्या वेळी साताऱ्यात फक्त दोनच कॉम्प्लेक्‍स उभे राहिले होते. वाडे, चाळी, बंगले असंच साताऱ्याचं स्वरूप होतं. मुलांना खेळायला मुबलक मोठी पटांगणं, परसातल्या बागा असायच्या. आज हे सगळं जाऊन त्यांची जागा अपार्टमेंट्‌सनी घेतली आहे. सगळ्याच शहरांचं रूप आता पालटलं आहे. त्याची खंत करण्याएवढीही फुरसत आपल्याला नाहीए. हे सगळं निमूटपणे स्वीकारून आपण पुढं चाललो आहोत. "कॉम्प्लेक्‍स'मधल्या पात्रांनी माझ्यातल्या लेखकाला काही बोलू दिलं नव्हतं; पण मला बोलावंसं वाटत होतं. या ऊर्मीतून एका प्रयोगाच्या आधी ऐनवेळी मला चार ओळी सुचल्या, त्या मी लिहिल्या आणि एकांकिकेच्या शेवटच्या प्रवेशाच्या वेळी सचिन मोटेनं त्या सादर केल्या.
त्या ओळी होत्या ः
आपणच आपले जन्मदाते
आपले आपणच मारक
आपणच होउ हुतात्मे
बांधु आपणच स्मारक
चढत जाउ प्रगतीची उंच शिखरे
आपल्याच थडग्यांच्या पायऱ्यांवरून
बंदिस्त करू मोकळे आकाश
चार भिंती भोवती बांधुन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin dixit write complex article in saptarang