एका नाटकाची गोष्ट (नितीन दीक्षित)

nitin dixit
nitin dixit

गरज ही काही फक्त शोधाचीच नाही तर कलाकृतीचीही जननी असू शकते. त्या संध्याकाळी मी चौपाटीवरून उठलो ते नाटकाचा आराखडा तयार करूनच. मग चर्चगेट ते सांताक्रूझ या लोकलच्या प्रवासात संवादही सुचू लागले. सांताक्रूझला उतरल्यावर एक वही विकत घेतली आणि रूमवर येऊन, जे जे सुचलं होतं ते सगळं उतरवायला सुरवात केली. अक्षरशः अडीच दिवसांत पहिला पूर्ण अंक आणि दुसरा अंक अर्धा लिहून तयार झाला.

मरिन ड्राइव्हच्या चौपाटीवर मी बसलो होतो. समोर वारंवार नव्या जोमानं किनाऱ्याला धडका मारणारा अथांग समुद्र आणि मागं असंख्य शक्‍यतांनी भरलेलं मुंबई शहर. मला मुंबईत येऊन दीड महिना होऊन गेला होता. साताऱ्याहून आणलेली तुटपुंजी शिदोरी संपत आली होती आणि हातात काही काम नव्हतं. अजून टीव्ही चॅनेल्सचा महाविस्फोट व्हायचा होता, त्यामुळे आजच्यासारखा किमान तग धरता येईल, अशा संधींचा सुळसुळाट झालेला नव्हता. लोकांना भेटणं, फोन करणं चालू होतं; पण काही घडत नव्हतं.
..."सोक्षमोक्ष' या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाची किंवा पहिल्या व्यावसायिक कामाची सुरवात अशा अवस्थेत झाली. माझे साताऱ्याचे मित्र बाळकृष्ण शिंदे आणि सचिन मोटे हे दोघंही माझ्या आधी मुंबईत आले होते. बाळकृष्णनं सचिन मोटेची सचिन गोस्वामीशी ओळख करून दिली होती आणि त्यानं माझी. गोस्वामीकडे नाटकाचं एक कथानक होतं, जे मला सचिननं ऐकवलं होतं. सचिन मोटे तेव्हा लेखक झाला नव्हता, त्यामुळे तो मला म्हणाला, की बघ तुला काही सुचतंय का? गोस्वामी हे नाटक दुसऱ्या एका लेखकाकडून लिहून घेणार होता; पण अनेक महिने त्याच्यामागे लागूनही तो काही वेळ देत नव्हता, आणि गोस्वामीला ते लवकर लिहून हवं होतं. नाटकाचा विषय मला आवडला होता; पण मी आतापर्यंत दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टीवर कधी काही लिहिलं नव्हतं. तोपर्यंत आपलाच विषय, तो आपण लिहायचा आणि आपणच बसवायचा असंच सुरू होतं. त्यामुळे ते जमेल का, आणि जमलं तरी आपण ते करायचं का या गोंधळात मी होतो.

मात्र, गरज ही काही फक्त शोधाचीच नाही तर कलाकृतीचीही जननी असू शकते, हे त्या वेळी लक्षात आलं. त्या संध्याकाळी मी चौपाटीवरून उठलो ते नाटकाचा आराखडा तयार करूनच. मग चर्चगेट ते सांताक्रूझ या लोकलच्या प्रवासात संवादही सुचू लागले. सांताक्रूझला उतरल्यावर एक वही विकत घेतली आणि रूमवर येऊन, जे जे सुचलं होतं ते सगळं उतरवायला सुरवात केली... आणि अक्षरशः अडीच दिवसांत पहिला पूर्ण अंक आणि दुसरा अंक अर्धा लिहून तयार झाला.

काही महिन्यांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका मोठ्या निर्मात्याची मुंबईत भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, या घटनेचा धागा पकडून गोस्वामीनं या नाटकाचं कथानक तयार केलं होतं. मुंबईतलं एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंब, नवरा बायको आणि त्यांची बारावीत असणारी मुलगी. सकाळची वेळ आहे, तिघांनाही आपापल्या उद्योगाला बाहेर पडायची गडबड आहे, याच गडबडीत मुलीकडून घराचं दार उघडं राहतं, घरात आई एकटीच आहे, अचानक तिच्या घरात एक अनोळखी माणूस शिरतो. तो तिला, त्याला वाचवण्याची विनंती करत असतानाच आणखी दोघं जण घरात शिरतात आणि तिच्या डोळ्यासमोर त्या माणसावर गोळ्या झाडतात. या एका घटनेमुळं या कुटुंबाचं अत्यंत शांत, सरळ चाललेलं जगणं ढवळून निघतं. ज्याला गोळ्या झाडल्या आहेत तो मुंबईतला एक नामांकित बिल्डर आहे, आणि ज्यांनी गोळ्या झाडल्या आहेत ती एका कुख्यात गॅंगस्टरची माणसं आहेत. पतीच्या सल्ल्यानुसार पत्नी पोलिसांना, तिनं काहीच पाहिलं नाही असं सांगत राहते; पण या प्रकरणाची चौकशी करणारा इन्स्पेक्‍टर, तिला उलट-सुलट प्रश्‍न विचारून अडचणीत आणत राहातो. पुढं कोर्ट, साक्षी-पुरावे आणि त्यात शपथेवर तिचं खोटं बोलणं, गुंडांच्या येणाऱ्या धमक्‍या, फोन कॉल्स या सगळ्यामुळं ती महिलाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच बिथरून जातं. पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवलेला एक हवालदार असतानाही गुंड घरात शिरून तिच्या पतीला मारतात, तेव्हा मात्र चौकशीत थोडं फार सहकार्य करणारं हे कुटुंब या प्रकरणातून पूर्णपणे अंग काढून घेण्याचा निश्‍चय करतं. मात्र, पुढं एका साक्षीच्या आधी त्यांच्या मुलीवर ते गुंड हल्ला करतात. इतक्‍या दिवसांच्या कुंचबणेला वैतागलेली ती मुलगी त्या गुंडाच्या कानफटात वाजवते आणि सगळं चित्रच बदलतं. मुलीच्या त्या एका कृतीनं तिच्या आई-वडिलांनाही बळ मिळतं आणि इतके दिवस दारं-खिडक्‍या बंद करून जगणारं हे कुटुंब सगळी कवाडं उघडतं. जो गुंड आपली गॅंग नसताना, आपल्याकडे किचनमधल्या सुरीशिवाय कोणतं शस्त्र नसताना आपल्याला घाबरवण्याचा इतका प्रयत्न करतोय, तर याचा अर्थ तो आपल्याला किती घाबरतोय हे त्यांच्या लक्षात येतं आणि दुसऱ्या दिवशीच्या साक्षीसाठी ते तिघंही सगळी भीती झुगारून उभे राहतात.

जेवढं लिहून झालं होतं, ते मी आधी मोटेला वाचायला दिलं. त्याला ते खूप आवडलं. नंतर दादरच्या शिवाजी मंदिरजवळच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये बसून गोस्वामी, बाळकृष्ण शिंदे यांच्यासमोर मी त्याचं वाचन केलं. त्यांनाही ते आवडलं. तिथून उठून लगेचच आम्ही शिवाजी मंदिरमध्ये गेलो आणि एका निर्मात्याला नाटक लिहून झाल्याचं सांगितलं. त्याला या नाटकाच्या विषयाची आधीपासूनच कल्पना होती, त्यामुळे तो ते लगेचच करायला तयार होता. मात्र, आम्हाला नाटक लिहून पूर्ण करायला अजूनही काही दिवस लागणार होते.

पहिल्या अंकात चार आणि दुसऱ्या अंकात चार असे एकूण आठ प्रसंग नाटकात होते, त्यातले सहा प्रसंग अडीच दिवसांत लिहून झाले होते; पण शेवटच्या दोन प्रवेशांनी मात्र फार वेळ घेतला. कारण या वेळी मी एकटा लिहीत नव्हतो, आता सचिन गोस्वामीही सोबतीला होता. त्याला जे पटायचं ते मला आवडायचं नाही, आणि मला जे चांगलं वाटायचं ते त्याला पटायचं नाही आणि यात वेळ जायचा. मात्र, हे सगळं खेळीमेळीनंच व्हायचं. शेवटी आम्ही दोघांनी मिळून एकदाचं नाटक पूर्ण केलं.
काही कारणानं सचिननं दुसऱ्याच निर्मात्यासोबत नाटक करण्याचा निर्णय घेतला. इला भाटे, प्रदीप वेलणकर, नेहा देशपांडे असं कुटुंब जुळून आलं. इन्स्पेक्‍टरच्या भूमिकेसाठी बरेच पर्याय चाचपून शेवटी पुण्याच्या सुहास कुलकर्णीला निवडलं. या सर्वांनीच आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.

या नाटकाच्या तालमींना मला जाता आलं नाही, त्याचं कारण फार गंमतिशीर होतं. ज्या लेखकासोबत सचिन हे नाटक आधी करणार होता, त्या लेखकाला जेव्हा हे नाटक होतंय हे कळलं तेव्हा म्हणे तो जाम भडकला. सचिन गोस्वामीनं मला हे सगळं शांत होईपर्यंत साताऱ्याला जाण्याची सक्तीच केली आणि मीही आपली पहिली व्यावसायिक कमाई आई-वडिलांच्या हातावर ठेवण्यासाठी साताऱ्याला आलो.
बरं चाललेलं हे नाटक काही अव्यावसायिक कारणांमुळं मध्येच बंद पडलं. "सोक्षमोक्ष'ला व्यावसायिक यश नाही मिळालं, तरी या नाटकानं माझ्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरवात तर केलीच. शिवाय प्रेक्षकांचा प्रतिसाद, आणि आमच्या क्षेत्रातल्या जाणकारांकडून नाटकाचं होणारं कौतुक, या गोष्टींनी माझी रिकामी होत चाललेली शिदोरी पुन्हा भरली आणि माझा पुढच्या वाटचालीसाठी मला ऊर्जाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com