'कडवी हवा' (नितीन दीक्षित)

nitin dixit
nitin dixit

"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात करायला लागणार होती. खरं तर एका क्षणी "आता बास झालं' असाही एक विचार आला; पण असा विचार करणं चुकीचं आहे असं दुसरं मन सांगायला लागलं. "इथून मागं गेलो तर अर्थ नाही' असं मनानं समजावलं आणि मी मग पुढच्या लढाईसाठी सज्ज झालो...

बरेच कष्ट, विचारप्रक्रिया आणि खूप लेखनकल्लोळानंतर "कडवी हवा'चा पहिला ड्राफ्ट तयार झाला. मी तो नीला माधब पांडाला मेल केला आणि त्याच्या प्रतिक्रियेची उत्सुकतेनं वाट पाहू लागलो. उत्सुकता दोन गोष्टींची होती. त्याला कसं वाटेल, तो काय म्हणेल याची उत्सुकता होतीच; पण दुसरं म्हणजे हा माझा पहिलाच हिंदी चित्रपट होता. साताऱ्यात असल्यापासून आणि अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरणार होतं- त्यामुळं तीही एक उत्सुकता होती. पण घडायचं होतं ते वेगळंच....

खरं तर ही सगळी प्रक्रिया सुरू झाली तो भागही औत्सुक्‍याचा होता. "अवताराची गोष्ट'चं पार्श्‍वसंगीत ज्यानं केलं होतं त्या मंगेश धाकडेनं माझं नाव नीला माधव पांडाला सुचवलं होतं. नीला एका मराठी लेखकाच्या शोधात होता. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी लेखकांकडं खूप आदरानं पाहिलं जातं. "श्‍वास'पासून इतर अनेक मराठी चित्रपटांपर्यंत या चित्रपटसृष्टीनं जे काही प्रयोग केले, यश मिळवलं त्याचाही तो परिणाम आहेच. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नीलाचा मला फोन आला. आम्ही बोललो, भेटलो. नीलानं मला विषय ऐकवला. त्याला एका शेतकऱ्याची गोष्ट हवी होती. दुष्काळाची झळ भोगणाऱ्या आणि स्वतः मात्र त्याला जबाबदार नसणाऱ्या अशा शेतकऱ्याची गोष्ट त्याला अपेक्षित होती. त्याला दिसत होता तो बुंदेलखंड हा भाग. त्या भागात हा सगळा प्रश्‍न आहे आणि तो माध्यमांत तितका उचलला जात नाही, असं त्याचं म्हणणं होतं. नीलाकडं ठोस अशी कोणती गोष्ट तयार नव्हती. फक्त एक अंध म्हातारा आणि त्याच्या भोवतीची परिस्थिती अशी एक थीम त्याला दिसत होती. दुष्काळाच्या धगीमुळं एकेक लोक जीव सोडत चालले आहेत आणि आपला मुलगाही त्याच वाटेनं जाईल की काय अशी भीती असलेला हा शेतकरी, असा तो थोडक्‍यात विषय होता. खरं तर साधारण अशाच प्रकारच्या एका कथाविषयाच्या जवळचा एक मराठी चित्रपट येऊन गेला होता. त्याची आठवण यायला नको असं माझं म्हणणं होतं. त्यामुळं या चित्रपटात वेगळेपण काय आणायचं ते तू बघ असं सांगून नीलानं तो विषय माझ्यावर सोपवून टाकला. कधी मीटिंग्ज, कधी मेल अशा पद्धतीनं आमचा संवाद सुरू होतं. मी या निमित्तानं बुंदेलखंड भागात गेलो. खूप फिरलो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत पाच जिल्ह्यांत पसरलेला हा भाग. लहानपणापासून चंबळचं खोरं, फुलनदेवी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. ते प्रत्यक्ष बघायला मिळालं. मी त्या भागात खूप फिरलो, लोकांना भेटलो, आणि एक वेगळाच "भारत' बघायला मिळाला. तिथं अनेक गावं होती- आणि अजूनही आहेत- ज्यांच्यामध्ये साधी वीजसुद्धा नव्हती. दहा-बारा वर्षांची अनेक मुलं गावाबाहेरसुद्धा पडलेली नव्हती. अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र यांच्यासारखे त्यांच्या वडिलांचे जे हिरो तेच यांचेही हिरो! शाहरूख, आमीर ही नावं केवळ ऐकलेली. पण वरुण धवन वगैरे अजून माहितीच नाही- कारण घरात टीव्हीच नाहीये. ही सगळी परिस्थिती मी बघितली. तिथं दारिद्रय "सुखात' नांदत होतं; पण आहे त्याच परिस्थितीत सर्व्हाइव्ह करणारी ही माणसं. जमीन नापिकी, सिंचन नाही. हे सगळं पाहिलं. मझ्यावर त्याचा खूप खोल परिणाम झाला. मला कथेतली माणसं हळूहळू दिसायला लागली आणि मग मी हळूहळू कथा तयार करत गेलो.

आमचं एक ठरलं होतं, की हा चित्रपट आम्हाला खूप गंभीर, कलात्मक, जड अशा पद्धतीनं करायचा नव्हता. अर्थात तो अगदी गल्लाभरू पद्धतीचा नाही; पण प्रेक्षकांना पूर्णपणे बांधून ठेवेल असा चित्रपट आम्हाला करायचा होता. त्यामुळं मी एका वेगळ्याच ह्युमरनं या विषयाकडं बघायचं ठरवलं आणि "सटायर'चा धागा मला सापडला. त्या पद्धतीनं मी स्क्रिप्ट लिहिली आणि त्याला मेल केला.

...पण ही स्क्रिप्ट वाचल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "आपण जे बोललो होतो, चर्चा केली होती, ठरलं होतं तसंच तर लिहिलं आहे,' असं मी सांगितलं; पण "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. त्यातल्या काही काही गोष्टी चांगल्या आहेत हे तो मान्य करत होता; पण तरीही त्याला एकदमच वेगळं काही तरी पाहिजे होतं. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात करायला लागणार होती. खरं तर एका क्षणी "आता बास झालं' असाही एक विचार आला; पण असा विचार करणं चुकीचं आहे असं दुसरं मन सांगायला लागलं. "इथून मागं गेलो तर अर्थ नाही' असं मनानं समजावलं आणि मी मग पुढच्या लढाईसाठी सज्ज झालो. पुढची सगळी कामं सोडून दिली. काही कामांना नाही म्हणून सांगितलं आणि परत पहिल्यापासून लिहायला लागलो.
अर्थात यावेळी मात्र मी सावध होतो. मी प्रत्येक टप्प्यावर नीलाला सांगायला लागलो. आमच्या खूप मीटिंग्ज झाल्या. नीलाचं ऑफिस दिल्लीला. त्यामुळं दिल्लीतही खूप वेळा जाऊन त्याला भेटलो. मी अजून एक केलं. मी पुन्हा बुंदेलखंडला गेलो. सगळं पुन्हा नव्यानं बघितलं आणि मग एक स्क्रिप्ट तयार झालं. ते वाचल्यावर मात्र नीलाला ते बेहद्द आवडलं. "ये बात बन गयी' अशी त्याची प्रतिक्रिया होती. खरं तर नीलाला फक्त माझ्याकडून स्क्रीनप्ले हवा होता. मी मराठी असल्यामुळं संवाद दुसऱ्याकडून लिहून घेऊ असं तो म्हणत होता. पण पहिल्या ड्राफ्टच्या वेळीच माझे संवाद त्याला आवडले आणि ते कामही माझ्याकडं आलं.

स्क्रिप्ट संपल्यावर मग पुढचं काम सुरू झालं. कास्टिंग आधीपासूनच निश्‍चित होतं. संजय मिश्रा त्यातल्या अंध म्हाताऱ्याचं काम करणार होता. दुसऱ्या वेळी कथानक रचताना मी एक पात्र आणलं होतं. बॅंकांमध्ये वसुलीचं काम करणारा माणूस. हा म्हातारा वसुलीला येणाऱ्या माणसालाच विश्‍वासात घेतो. तो त्याचा चक्क "इन्फॉर्मर' बनतो. इतरांची माहिती सांगायला लागतो. "फक्त माझ्या घरी येऊ नको' अशा प्रकारचं डील तो या वसुली अधिकाऱ्याशी करतो असं कथानक मी रचलं होतं. त्यामुळं मग त्या दोघांचं एक छान रिलेशन आलं. ते व्यवस्थित डेव्हलप झालं. या ठिकाणी आणखी एक गंमत झाली. त्या वसुली अधिकाऱ्याचाही एक अँगल पांडानं आणला. हा अधिकारी समजा ओडिशातला असेल तर, असा प्रश्‍न त्यानं विचारला आणि मग कथानकाला आणखी एक वेगळी दिशा मिळाली. म्हणजे क्‍लायमेट चेंजचा त्रास दोघांनाही भोगावा लागतोय असा तो अँगल आला. बुंदेलखंडचा उन्हाळा, दुष्काळ आणि ओडिशातली अतिवृष्टी, पाऊस असा एक कन्फ्लिक्‍ट आपोआपच तयार होत गेला. हा शेती करू शकत नाही आणि तो तिकडं जाऊ शकत नाही. त्यामुळं हा दुसरा जरी वसुली अधिकारी असला, तरी तोही याच्यासारखाच आहे, हेही ठसवायला मदत झाली. त्या भूमिकेसाठी रणवीर शौरीला घेण्याचं ठरलं.

संजय मिश्रा आणि रणवीर या दोघांची भट्टी छान जमली. मग त्या दोघांबरोबर आम्ही वर्कशॉप घेतले. संजय मिश्राच्या घरीच या सगळ्या मीटिंग्ज व्हायच्या. तो धमाल अनुभव होता. त्या दोघा अभिनेत्यांबरोबर काम करताना मजा आली. कोणताही ऍटिट्यूट नाही, उद्धटपणा नाही. एकमेकांना छान आदर देणारे हे लोक होते. माझ्या संवादांना बुंदेलखंडी लहेजा देण्यासाठी "डायलेक्‍ट'वर काम करणारा माणूसही होता. पण हा बदल कितपत करायचा हे नीलानं माझ्यावर सोपवलं होतं. त्यामुळं तीही एक प्रक्रिया समांतर पद्धतीनं सुरू होती. नंतर मग आम्ही लोकेशन हंटिंगला गेलो. आधी मी गेलो, मग दुसरा माणूस आला. पुन्हा सगळं फिरणं झालं. आपल्याकडं गावामध्ये कोंबड्या आणि शेळ्यामेंढ्या फिरतात तसे एका गावात चक्क मोर फिरतात असंही दिसलं. एकीकडं कलरफुल असा हा राष्ट्रीय पक्षी आणि माणसांचं आयुष्य मात्र रंगहीन अशी विसंगती दिसायला लागली. या सगळ्या प्रवासानंतर मग एक गाव पाहिलं. तिकडं एक घरसुद्धा मिळालं. मग टीम आली, त्या ठिकाणी काम सुरू झालं. शूटिंग सुरू असतानाही मी राहावं, काही इन्पुट्‌स द्यावेत असं नीलाचं म्हणणं होतं; पण मीही दिग्दर्शक होतो आणि शूटिंगच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा संघर्ष होऊ शकतो याची कल्पना होती. इगोचा संघर्ष दिसत होता. त्यामुळं मी नकार दिला. शिवाय त्यामुळं मी मुंबईला परत आलो. तरीही मी आठ दिवस तिथं राहिलो. पण माझं जे म्हणणं होतं, त्याची चुणूकही एका प्रसंगात दिसली. संजय मिश्राचं पात्र वसुली अधिकाऱ्याला जिथं भेटतं ते लोकेशन नीलानं निवडलं होतं; पण मला ते फार ऑकवर्ड वाटत होतं. माझ्या लक्षात आलं, की कॅमेरामनचं, असिस्टंट डायरेक्‍टरचंही तेच म्हणणं होतं. मी त्या प्रसंगासाठी आधीच एक छान लोकेशन बघून ठेवलं होतं. पण नीलाला त्यानं निवडलेल्या ठिकाणावर ठाम होता. मात्र, मी सांगितलेल्या ठिकाणी गेल्यावर त्याला ते पटलं. मात्र, एकूणच हा सगळा संघर्ष लक्षात घेऊन मी परत आलो. चित्रपट पुढं अतिशय छान पद्धतीनं तयार झाला. "सुपर सिक्‍स्टि'नवर शूटिंग करून त्यानं एक वेगळा प्रयोग केला होता. चित्रपटाला भरपूर पुरस्कार मिळाले. खूप कौतुक झालं. एक खूप वेगळा आणि उत्तम अनुभव होता. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत गोंधळलेल्या माणसाबरोबर काम करण्याचाही हा पहिला अनुभव होता-ज्याचा मला नंतर उपयोग झाला. नीलाबरोबर मी नंतर दुसऱ्या एका चित्रपटासाठीही काम केलं. मात्र, पहिलाच हिंदी चित्रपट आणि लेखक म्हणून लागलेलं नाव यासाठी "कडी हवा' कायम लक्षात राहील. या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट पडद्यावर आला नाही. मात्र, तो मला आजही साद घालतो, एवढं मात्र नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com