सर्जनाच्या 'सीमे'वर... (नितीन दीक्षित)

nitin dixit
nitin dixit

सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी आमची चाललेली धडपड पाहून एक मेजर मला म्हणाले : ""आपका काम बहुत मुश्‍कील है, कितना करना पडता है आप लोगों को!'' मी त्यांना म्हटलं : "और आप जो हमारे लिये कर रहे हो- वो कौनसा आसान काम है?''

"आय नीड फ्यू सोल्जर्स फ्रॉम युवर बटालिअन टू प्ले द रोल ऑफ टेररिस्ट्‌स फॉर द डॉक्‍युमेंटरी ऑन युअर एक्‍स सी. ओ. कर्नल वसंत वेणुगोपाल'... मराठा बटालियनचे कर्नल काटकर यांना मी विनंती केली, आणि इतका वेळ माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलत असलेले हे ऑफिसर मला म्हणाले : ""हे तुमचे सिनेमे, डॉक्‍युमेंटरीज पाहून इन्स्पायर होऊन कुणी आर्मीत येत नसतं. आमच्यासारखे काही वेडे असतात- ज्यांच्यात किडा असतो- तेच देशासाठी मरायला इथं येतात. ज्या दहशतवाद्यांनी माझ्या बॉसला मारलं त्यांचा रोल प्ले करायला एकही सोल्जर तुम्हाला मराठा बटालियनमधून मिळणार नाही.''

...अतिरेक्‍यांचा सामना करत असताना शहीद झालेल्या आपल्या जवानांवर माहितीपट करण्यासाठी मी जम्मू-काश्‍मीरला आलो होतो. रा मीडिया नावाच्या कंपनीचा मालक राजर्षी रॉयनं हे काम माझ्यावर सोपवलं होतं. वेगवेगळ्या रॅंक्‍सच्या एकूण बारा जवानांवर दूरदर्शनसाठी हे माहितीपट करायचे होते. ते ज्या कारवाईत शहीद झाले, त्याची सविस्तर माहिती दोन महिन्यांपूर्वीच आर्मीच्या मुख्यालयातून आम्हाला मेल केली गेली होती. मी त्या माहितीचा नीट अभ्यास केला. ती माहिती तशी सरकारी भाषेतली कोरडी म्हणावी अशीच, तरीही प्रत्येक गोष्ट वाचताना अंगावर शहारे येत होते.. माझ्यावर लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी होती. कामाचा आवाका मोठा होता आणि त्यासाठी असणारा वेळ मात्र कमी.

शहीद झालेल्या जवानासोबत असणारे त्याचे सहकारी, त्याच्या परिवारातले सदस्य यांच्या मुलाखती, छायाचित्रं, त्याच्या घराची भेट असं सगळं एकत्र करून ते एडिट करून त्याच्यावर निवेदन चिकटवून एक एपिसोड करायचा असंच सगळ्यांचं म्हणणं होतं. हे सगळं मी करणार होतोच; पण मला त्या अतिरेक्‍यांवरच्या कारवाईमधलं नाट्य खुणावत होतं आणि ते चित्रित करायचं तर शूटिंगचे दिवस वाढणार, निर्माता त्याला तयार नव्हता. शेवटी मी म्हटलं : ""हे होणार नसेल तर मला हे प्रोजेक्‍टच करायचं नाही.'' हो-नाही करत तो थोडे दिवस वाढवून द्यायला तयार झाला. मग मी प्रत्येक भागाच्या पटकथेचा फ्लो तयार केला. सुरवात ज्या युनिटचा तो जवान असेल त्या युनिटविषयी थोडी माहिती. मग त्या शहीद झालेल्या जवानाविषयी थोडंसं, नंतर ज्या कारवाईत तो शहीद झाला ती कारवाई आणि शेवटी त्या शहीदाला मानवंदना. साधारण असा साचा ठरवला. हे सगळं करणं अनेक कारणांसाठी जिकिरीचं होतं. एकूण बारा माहितीपट करायचे होते. त्यासाठी साठ-सत्तर जणांच्या मुलाखती, जवानांचं युनिट काश्‍मीरमध्ये आणि घरं भारतभर विखुरलेली, त्यामुळे प्रवासाचं वेळापत्रक ठरवणं हे आलंच. त्यात दोघे जण राष्ट्रीय रायफल्समधले होते. राष्ट्रीय रायफल्समध्ये येणारा प्रत्येक जण हा खास प्रशिक्षण घेऊन फक्‍त दोन वर्षांच्या कालावधीसाठीच येतो आणि नंतर परत आपापल्या युनिटमध्ये जातो. तसे या दोघांचे कारवाईतले साथीदार आता त्यांच्या त्यांच्या युनिटमध्ये गेले होते. त्यांना शोधणं, कारवाईच्या नाट्यरूपांतरासाठी साधर्म्य सांगणारं स्थळ शोधणं, या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना आम्ही त्या त्या युनिटला दिली. आमचं वेळापत्रकही त्यांना पाठवलं आणि ऐन दिवाळीत मी माझ्या छोट्याशा युनिटसोबत जम्मूला पोचलो.

पहिल्या बारा दिवसांत चार कारवाया, आणि त्या संदर्भातल्या काही मुलाखती चित्रित केल्या. शहीद झालेल्या जवानाशी साधर्म्य असणाऱ्या त्या युनिटमधल्याच एकाला त्याची भूमिका द्यायची, अतिरेकी कोण होणार हे त्यांचं त्यांनीच ठरवलेलं असायचं. लोकेशनही त्यांनी पाहून ठेवलेलं असायचं, मग लष्कराच्या सुरक्षेत पाच-सहा वाहनांच्या ताफ्यातून आम्ही चित्रीकरणस्थळी पोचायचो. कधी हे दुर्गम भागातलं एखादं दहा-बारा घरांचं खेडं असायचं, तर कधी हिमालयातल्या जंगलात दडलेल्या गुहा असायच्या. माझ्या कॅमेरामनकडे एक कॅमेरा आणि माझ्याकडे एक कॅमेरा असं दोन कॅमेऱ्यांनी आम्ही सगळी ऍक्‍शन चित्रित करायचो. त्यामुळे एका दिवसात हे चित्रीकरण संपायचं. यात गंमत यायची ती या जवानांकडून अभिनय करून घेताना. फार कमी वेळात त्यातल्या त्यात बरे एक्‍सप्रेशन्स देणाऱ्यांना निवडायचं आणि त्यांचेच क्‍लोज शॉट्‌स घ्यायचे. बाकीचं सगळं वाईड आणि कॅंडीड शूट करायचं. हा त्या जवानांसाठी तर वेगळा अनुभव होताच; पण माझ्यासाठीही हे सगळं नवीनच होतं. दिवसभर चित्रीकरण करायचं, संध्याकाळी एक-दोन तास निवेदनासाठी टिपणं लिहायची आणि रात्री ऑफिसर्ससोबत गप्पा आणि आर्मीचा साग्रसंगीत पाहुणचार घ्यायचा हा दिनक्रम ठरलेला.

एक कारवाई रात्री केली गेली होती, आणि आमच्याकडे शूटिंग लाईट्‌स नव्हते, मग ते ऑफिसर म्हणाले : ""हे आपण दिवसा घडलं असं दाखवू.'' मी म्हटलं : ""आपण एक प्रयत्न करून बघू, नाही जमलं तर तुम्ही म्हणताय तसं करू.'' सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून ही कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी आमची चाललेली धडपड पाहून एक मेजर मला म्हणाले : ""आपका काम बहुत मुश्‍कील है, कितना करना पडता है आप लोगों को!'' मी त्यांना म्हटलं : ""और आप जो हमारे लिये कर रहे हो- वो कौनसा आसान काम है?''

कर्नल काटकरांच्या मताचा आदर होता. शेवटी समोरच असलेल्या 34 राष्ट्रीय रायफल्समधून काही काश्‍मिरी जवानांनाच आणलं गेलं. आपल्याला दहशतवाद्यांची भूमिका करायचीय हे कळल्यावर त्यातला एक जण मला म्हणाला : ""क्‍या सर? हमे जो बनना नही था, वही आप हमें बना रहे हो?'' मी त्याला विचारलं, की तुम्ही तर पहाडातले लोक, काटक, मजबूत हाडांचे. तुमच्यातले भरपूर लोक भरती होत असतील. तो म्हणाला : ""सर, परवाच भरती झाली, दोन हजार मुलं आली होती, त्यातले फक्‍त तीन जण पास झाले!'' मी उडालोच, मग त्यानं कारण सांगितलं. एलओसीजवळ असणाऱ्या गावातल्या लहान मुलांना पलीकडचे जवान फूस लावून त्यांच्याकडून पाव, फळं असे खाण्याचे पदार्थ घेतात आणि त्या बदल्यात त्यांना सिगारेटचे मोठे बॉक्‍स पलीकडून टाकतात. लहान वयातच सिगारेटचं व्यसन लागल्यानं तरुण होईपर्यंत त्यांच्या फुफ्फुसांचे खुळखुळे झालेले असतात आणि साहजिकच ते भारतीय लष्करात भरती होऊ शकत नाहीत. अशा अनेक पातळ्यांवर पाकिस्तान हे युद्ध खेळतोय आणि आपलं लष्कर या सर्व पातळीवर त्यांना प्रत्युत्तर देतंय.

जम्मू-काश्‍मीरविषयी कुतूहल नसलेला माणूस भारतात तरी सापडायचा नाही. मीही त्यातलाच एक. त्यात इथं येण्याची माझी पहिलीच वेळ. एकीकडं ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा विचार आणि दुसरीकडं एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलानं तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणं चालू होतं. तितक्‍याच निरागसपणे प्रश्‍नही पडत होते : "असं का? नंदनवनात तर सगळे सुखानं नांदतात, मग इथले चिनार वृक्ष, हिमालयाची उत्तुंग शिखरं, दोन वेळच्या भाकरीसाठी धपडणारी इथली साधी माणसं हे सगळेच भेदरलेले, बिथरलेले का वाटतायत?'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com