'हलकाफुलका' चित्रपट (नितीन दीक्षित)

nitin dixit
nitin dixit

"हल्का'ची निर्मिती होती शिव नाडर फाऊंडेशनची. त्यांच्या दिल्लीमध्ये काही शाळा होत्या आणि त्याची अशी इच्छा होती, की यातला काही भाग त्यांच्या शाळेत चित्रीत व्हावा आणि माधवला कसंही करून महात्मा गांधी यांना या कथेचा एक भाग बनवायचं होतं. बापूजी आणि शाळा या माझ्या विचारात नसणाऱ्या दोन्ही गोष्टी मला पटकथेत आणाव्या लागल्या; पण त्यामुळं फायदाच झाला. बापूजींमुळं पिचकूचा संघर्ष हा "लाज वाटते' या पातळीवर न राहता "आत्मसन्मानाच्या' पातळीवर आणता आला आणि शाळेमुळं आपल्या समाजातल्या "वर्ग'व्यवस्थेवर, त्यातल्या वाढत चाललेल्या दरीवर भाष्य करता आलं. त्या दरीची लांबी, रुंदी आणि खोली दाखवता आली...

मला जेव्हा एखादी गोष्ट सुचते, तेव्हा ती मी माझ्या जवळच्या काही लोकांना ऐकवतो. एकत्र नाही, वेगवेगळी. यातल्या प्रत्येक कथनाच्या वेळी, त्या गोष्टीत काही नवीन घटना, पात्र आणि इतर गोष्टींची माझ्याकडून भर पडत जाते. काही गोष्टी ऐकणाऱ्यांच्या शंकांमधून, प्रश्‍नांमधून सुटत जातात आणि ती गोष्ट फुलत जाते, पक्की होत जाते. "हल्का' या माझ्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाची कथा काहीशा अशाच पद्धतीनं तयार झाली. फरक इतकाच होता, की ही कथा मी आणि या चित्रपटाचा दिग्दर्शन नीलामाधव पांडा आम्ही दोघांनी मिळून तयार केली. तीही प्रत्यक्ष न भेटता- फक्त फोनवरच्या संभाषणामधून.

लेखक-दिग्दर्शकाचं नातं हे नवरा-बायकोसारखं असतं; पण यातल्या नवरा-बायकोच्या भूमिका सतत बदलत असतात. एखादा मुद्दा किती ताणल्यावर तुटू शकतो हे सगळं माहीत होतं आणि त्यालाही माझ्या काम करण्याच्या पद्धतीचा अंदाज आला होता. त्यामुळे "कडवी हवा'च्या वेळी जसे वाद, भांडणं झाली तसं या वेळी काही झालं नाही. फोनवर कथेचा सांगाडा तयार झाला होता. काही गोष्टी ज्या त्याला कथेत हव्याच होत्या, त्या माधवनं मला सांगितल्या होत्या. त्यातल्या एक-दोन गोष्टींना माझा नकार ठामपणे त्याच्यापर्यंत पोचवला होता. हे सगळं झाल्यावर मी पटकथा लिहायला घेतली.

वसईमध्ये एका हॉटेलची रूम आठ दिवसांसाठी बुक केली. त्यातले दोन दिवस असेच विचार करण्यात इकडंतिकडं फिरण्यात गेले. मग काम सुरू झालं. गोष्ट एका लहान मुलाची होती. मुंबईमधल्या रेल्वेलाईनजवळ असणाऱ्या एका झोपडपट्टीत राहणारा पिचकू एका पेचात सापडलाय. त्याला कळतंय, तेव्हापासून त्याची आई त्याला सांगतेय ः ""बेटा, अब तू बडा हो गया है, ऐसे नंगे नही घुमते...'' आणि त्याच्यासमोर त्याच्या वस्तीमधले लोक रेल्वेलाईनवर रोज सकाळी त्याच्या आईनं दिलेल्या बाळकडूवर बाटलीभर पाणी ओततायत. त्याच्या वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालय आहे; पण फारसं कोणी त्याचा वापर करत नाही. अगदी त्याचे आई-वडीलसुद्धा. कारण त्याची अवस्था खराब आहे. पिचकूला रेल्वेलाईनवर उघड्यावर जायला लाज वाटते आणि सार्वजनिक शौचालयात तो एक सेकंदही थांबू शकत नाही. मग तो जाणार कुठं? पिचकूनं यावर एक उत्तम तोडगा काढलाय. पिचकूचे वडील सायकलरिक्षा चालवतात आणि आई उदबत्तीच्या फॅक्‍टरीत काम करते. हे दोघंही घराबाहेर गेले, की पिचकू घरातच कार्यक्रम उरकून घेत असतो. लहानपणापासून आईच्या हाताला येणाऱ्या निरनिराळ्या सुगंधांची सवय असलेला पिचकू काम मात्र कचरा गोळा करण्याचं करतो. एके दिवशी त्याचे वडील त्याला रंगेहाथ पकडतात आणि सगळ्या वस्तीसमोर लाईनवर नेऊन बसवतात. घराला नवीन कुलूप बसवतात आणि पिचकूची पंचाईत करून टाकतात. सगळ्या वस्तीमध्ये कुणीही असा नसतो, की ज्याला उघड्यावर बसायची लाज तर सोडाच; त्यात काही वावगं आहे असं वाटत नसतं. अशात त्याला वस्तीत नवीन राहायला आलेला गोपी भेटतो. गोपीच्या आधीच्या घरी टॉयलेट असतं. त्यामुळं इथं आल्यावर त्यालाही उघड्यावर जायची लाज वाटत असते. या एका समान धाग्यामुळं दोघांची गट्टी जमते आणि पिचकू स्वतःसाठी आपल्या घराच्या मागं असणाऱ्या मोकळ्या जागेत टॉयलेट बांधायचं ठरवतो.

मग पुढं अनेक अडचणीवर मात करत पिचकू आणि गोपी त्यांच्या ध्येयापर्यंत कसे पोचतात त्याची ही साधी सरळ गोष्ट. "हल्का'ची निर्मिती होती शिव नाडर फाऊंडेशनची. त्यांच्या दिल्लीमध्ये काही शाळा होत्या आणि त्याची अशी इच्छा होती, की यातला काही भाग त्यांच्या शाळेत चित्रीत व्हावा आणि माधवला कसंही करून महात्मा गांधी यांना या कथेचा एक भाग बनवायचं होतं. कथा तयार करत असताना या दोन्ही गोष्टी माझ्या विचारप्रक्रियेचा भाग नव्हत्या; पण त्या मला आणायच्या होत्या. त्याही कथेचा ओघ बिघडू न देता. मग वस्तीतल्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर गांधीजींचा एक पुतळा आला. वस्तीतच चालणाऱ्या रात्रशाळेत पिचकू जात असतो. त्यामुळं त्याला गांधीजींविषयी थोडीफार माहिती असतेच. त्यात पिचकूला रोज जाता येता बापूजींच्या पुतळ्याकडं बघून ते आपल्याकडंच बघतात असं वाटत असतं. यातूनच पिचकू त्यांच्याशी आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकतो. शिव नाडर फाऊंडेशनच्या शाळा अगदी उच्च दर्जाच्या सर्व सोईंनी युक्त अशा होत्या आणि माझा हिरो झोपडपट्टीत रहाणारा. मग त्याचा या शाळेशी कसा संबंध येणार? ज्या ठिकाणी पिचकूचा कचरा डेपो असतो, त्याच्या समोरच्या रस्त्यावरून या शाळेची बस जात असते. त्यातला एक मुलगा पिचकू आणि त्याच्या इतर मित्रांकडं रोज कुतूहलानं पाहत असतो, हे पिचकूच्या लक्षात येतं आणि बापूजींप्रमाणं हादेखील आपल्याकडंच पाहतोय, असं वाटून पिचकू मनातल्या मनातच त्याच्याशी मैत्री करतो. पुढं पिचकू आणि गोपी एक युक्ती करून शाळेच्या ऍन्युअल फंक्‍शनच्या दिवशी शाळेत घुसतात. तिथले वर्ग, लॅब्ज, खेळाच्या सुविधा, वाचनालय आणि मुख्य म्हणजे टॉयलेटस्‌ पाहून दोघंही चक्रावून जातात.

बापूजी आणि शाळा या माझ्या विचारात नसणाऱ्या दोन्ही गोष्टी मला पटकथेत आणाव्या लागल्या; पण त्यामुळं फायदाच झाला. बापूजींमुळं पिचकूचा संघर्ष हा "लाज वाटते' या पातळीवर न राहता "आत्मसन्मानाच्या' पातळीवर आणता आला आणि शाळेमुळं आपल्या समाजातल्या "वर्ग'व्यवस्थेवर, त्यातल्या वाढत चाललेल्या दरीवर भाष्य करता आलं. त्या दरीची लांबी, रुंदी आणि खोली दाखवता आली.
"हल्का'मधला पिचकू होता तथास्तू गौतम, तर आर्यन प्रीत हा गोपीच्या भूमिकेत होता. वडील रणवीर शौरी, तर आई पाओली दाम. लेखनाबरोबरच मी या चित्रपटाचा क्रिएटिव्ह डायरेक्‍टरही होतो. माधव आणि मी एका गोष्टीबाबत ठाम होतो, की हा चित्रपट नावाप्रमाणंच "हलकाफुलका' आणि मनोरंजन करताकरता चार गोष्टी सांगणारा असायला हवा. अशा चित्रपटात गाणी हा महत्त्वाचा भाग असतो. "हल्का'ची गाणी खूप सुंदर झाली होती. प्रोतीक मुजुमदारच्या अनवट ओळींना शंकर-एहसान-लॉय यांचं ताकदीचं संगीत लाभलं आणि भट्टी जमून आली.

दिल्लीतल्या चाळीस-पंचेचाळीस अंश तापमानात, झोपडपट्टीतले विविध वास आणि त्रास सहन करत पूर्ण केलेल्या या चित्रपटाला काही आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाले. प्रदर्शन आणि प्रमोशनमध्ये हा चित्रपट थोडा फसला, असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र, एक चांगला चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं. बाकी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशी इच्छाच फक्त आपण बाळगू शकतो. तशी आता ती पूर्ण झाली आहे. "हल्का' आता नेटफ्लिक्‍सवर उपलब्ध झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com