कुठल्याही वर्णाचं बिरुद नसलेला माणूस कुठं आहे? (नितीन दीक्षित)

नितीन दीक्षित
रविवार, 23 जून 2019

​कुठल्याही वर्णाचं बिरुद नसलेला माणूस आम्ही आणला होता.. इतर वर्णांची माणसं सगळ्यांत खालच्या लेव्हलवर होती.. पण आज तो माणूस हरवलाय! कदाचित, त्याला त्याच्या आसपास त्याच्या जाती-धर्माचं कुणीच दिसत नसावं.. ही आहे एका मूकनाट्याची बोलकी कहाणी!

हातात खूप कमी दिवस होते. शिवाय ज्या काळातली ही कथा होती, त्या काळात कोणता वर्ण कोणती भाषा बोलत होते, याबाबत मनात गोंधळ होता. अभ्यास करायलाही पुरेसा वेळ नव्हता. म्हणून एकांकिकेत संवादच ठेवायचे नाहीत असं मी ठरवलं. लेखन असं काही नव्हतंच. मी सगळे प्रसंग दिग्दर्शित करत गेलो. गंमत म्हणजे सगळी एकांकिका बसवून झाली आणि त्यानंतर स्पर्धेत द्यायला लागणार म्हणून आम्ही संहिता लिहिली. ती चार पानांची संहिता बघून संयोजकही बुचकळ्यात पडले...

मला जेव्हा एखादा विषय सुचतो, तेव्हा तो फुलत असतानाच तो कोणत्या साच्यात बसेल, हेदेखील आपोआप ठरत जातं. मग त्याचा जीव छोटा असेल, तर त्याची एकांकिका होते. मोठा आहे; पण रंगमंचावर मावणारा आहे असं वाटलं तर नाटक होतं, नाही तर सिनेमा होतो. अर्थात असं ठरवण्याची इतर अनेक कारणंही असतात; पण त्यामुळंच एखाद्या एकांकिकेचं नाटक करावं असं मला कधी वाटलं नाही. एक अपवाद वगळता.

पुण्यातल्या सोहम करंडक स्पर्धेचा फॉर्म भरलेला होता. जी. ए. कुलकर्णी यांच्या "अनामिक' या कथेवर एकांकिका करायची असं ठरलं होतं. त्यामुळं एकांकिकेचं नाव "अनामिक' असं दिलं होतं. मात्र, काही कारणांमुळं त्या कथेवर एकांकिका करता आली नाही. मात्र, नाव तर आता बदलता येणार नव्हतं. मग सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. या नावाला साजेसा विषय काढण्याची. मग फार विचार करून, अनेक विषयांची चर्चा करून काहीच ठरेना. हातात पुरेसा वेळही नव्हता. स्पर्धेत जायचंच नाही असाही एक विचार आला; पण त्या काळात आम्हा सातारकरांना पुण्याच्या प्रेक्षकांसमोर जाण्याची तेवढी एकच संधी असायची, ती आम्हाला सोडायची नव्हती. आधी बारसं करून मग अपत्याला जन्माला घालायचा विचार करायचा, हे माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतलं एकमेव उदाहरण. फॉर्म पाठवल्यावर काही दिवस गेले आणि मला एक विषय सुचला.

एक कलाकार एखादी कलाकृती तयार करतो, तेव्हा केवळ त्याची बुद्धिमत्ता आणि कला यांचाच तो परिपाक नसतो. त्याच्या सामाजिक जाणिवा, त्याचा डीएनए, त्याची जडणघडण, त्याच्यावर झालेले आणि करून घेतलेले जाणते-अजाणते संस्कार, त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्त्व अशा सगळ्याच गोष्टींचं ते मिश्रण असतं. तर असं हे माझ्यातलं मिश्रण मला एक विचार करायला भाग पाडत होतं, की आपल्या धर्मातली ही चातुर्वर्णाची उतरंड जशी आज आपल्याला अयोग्य आणि चुकीची वाटतेय. या यंत्रणेवर घाव घालणारे जसे आज आणि इतिहासातही सापडतात, तसे पौराणिक काळातही कोणी होते का? चार्वाक, बौद्ध, जैन ही तत्त्वज्ञानं होतीच आणि ती आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होती, आहेत. पण पूर्वी धर्मात राहून हे सगळं मोडून टाकण्याचा कुणी प्रयत्न केला असेल का?
विषयाचं कथानकात रूपांतर होताना ते असं झालं, चारही वर्णांतले मुलगे आणि वडील अशा दोन पिढ्या. रंगमंचावर लेव्हल्सच्या मदतीनं तयार केलेली उतरंड. सर्वांत वरच्या लेव्हलवर कथित उच्च वर्ण, तर सर्वांत खाली कथित कनिष्ठ वर्ण. आधीच्या पिढीनं पुढच्या पिढीला आपापल्या वर्णाची दिलेली दीक्षा. मग त्या चार मुलांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना जंगलात पाठवलं जातं. सुरवातीला ते आपापल्या वर्णाचं पालन करतात; पण जेव्हा त्यांच्यावर संकट येतं, तेव्हा ते आपल्यातले भेद विसरून एकत्र येतात आणि त्या संकटाचा सामना करून सुखरूप परततात. आल्यावर ते व्यवस्थेविरुद्ध बंड करतात. जे साहजिकच आढीच्या पिढीला सहन होत नाही आणि मग ते काय करतात अशी साधारण कथा होती.

हातात खूप कमी दिवस होते. शिवाय ज्या काळातली ही कथा होती, त्या काळात कोणता वर्ण कोणती भाषा बोलत असेल, याविषयी मनात गोंधळ होते. अभ्यास करायला पुरेसा वेळ नव्हता. म्हणून एकांकिकेत संवादच ठेवायचे नाहीत असं मी ठरवलं आणि तालमी सुरू केल्या. लेखन असं काही नव्हतंच, मी सगळे प्रसंग दिग्दर्शित करत गेलो. संवादाच्या जागी पार्श्‍वसंगीतच होतं, ते सचिन गद्रेनं केलं होतं. गंमत म्हणजे सगळी एकांकिका बसवून झाली आणि मग त्यानंतर स्पर्धेत द्यायला लागणार म्हणून आम्ही संहिता लिहिली. ती चार पानांची संहिता बघून संयोजकही बुचकळ्यात पडले. स्पर्धेत आमच्या प्रयोगाच्या आधी एक घटना घडली. ज्यानं आम्ही अस्वस्थ झालो. श्रीरंग गोडबोले यांची एकांकिका होती. ज्यात विनोदी शैलीनं काही तरी सादर केलं होतं. त्यावर काही हुल्लडबाजांनी येऊन सगळ्या कलकारांच्या तोंडाला काळं फासलं. आम्हाला वाटलं आता आपली काही धडगत नाही. आमचा विषयही अशा लोकांना न पचणारा.

या गोंधळात प्रयोग सुरू झाला. आधीच्याच वर्षी केलेल्या "कॉम्प्लेक्‍स'मुळं भरत नाट्यमंदिर खचाखच भरलेलं होतं. त्यात हे मूकनाट्य आहे हे आम्ही सांगायला विसरलो. पहिला प्रसंग संपेपर्यंत लोक शांतपणे सगळं पाहत होते. मी प्रकाशयोजनाही करत होतो. अंधार झाला आणि एका मुलानं आपल्या आईला विचारलं ः ""आई, हे बोलत का नाहीत?'' त्यावर उत्तर आलं ः ""अरे, हे मूकनाट्य आहे.'' यानंतर जो प्रयोग रंगला तो पडदा पडेपर्यंत टाळ्यांच्या गजरातच.

प्रयोग संपला. बक्षिसंही मिळाली; पण आधी घडलेल्या त्या प्रसंगानं त्यावेळी धडपडणाऱ्या आमच्यासारख्या रंगकर्मींचं नुकसान झालं. स्पर्धेच्या संयोजकांनी उद्विग्न होऊन ही स्पर्धा कायमची बंद करत असल्याचं जाहीर केलं. राज्य नाट्य स्पर्धेच्या वेळी याच एकांकिकेवर नाटक करायचं माझ्या मनात आलं. तेही दोन अंकी मूकनाट्य. जे अजून तरी मराठी रंगभूमीवर कुणी केल्याचं ऐकिवात नव्हतं. हा एक धाडसी प्रयोग ठरणार होता. मात्र, नाटक करताना एकांकिकेचा विस्तार न करता, एकांकिका हा नाटकाचा दुसरा अंक असणार होता. पहिल्या अंकात चातुर्वर्ण्य व्यवस्थेची रचना का आणि कशी झाली असेल, याची माझ्या कल्पनेनं मी मांडणी केली होती. एकांकिकेत बारा पात्रं होती, तर नाटकात सोळा. पहिल्या अंकात मोकळ्या रंगमंचावर जंगल, सूर्यग्रहणाचं दृश्‍य, शिकारीचं दृश्‍य असे अनेक प्रसंग जिवंत करण्यात आम्ही यशस्वी झालो- तेही कलाकारांच्या हातात कसलीही प्रॉपर्टी नसताना. प्रयोगाच्या वेळी आमचा मेकअपमन आलाच नाही. मग जवळ कोणतंही साहित्य नसताना राजेंद्र संकपाळ आणि मी मिळून सोळा जणांचा मेकअपही केला. नवख्या कलाकारांचे काही गोंधळ सोडले, तर प्रयोग चांगला झाला; पण स्पर्धेत तो ग्राह्य धरला गेला नाही. कारण नियमाप्रमाणं नाटक मराठी भाषेतलं असायला हवं होतं आणि आम्ही तर कोणतीच भाषा वापरली नव्हती.

पुढं या नाटकाचा प्रयोग मुंबईतही करायचा घाट घातला होता. मात्र, पुन्हा सोळा जणांची मोट बांधणं शक्‍य झालं नाही आणि ते बारगळलं. या नाटकात शेवटच्या प्रसंगात मी सर्वांत वरच्या लेव्हलवर कुठल्याही वर्णाचं बिरुद नसणारा मानव आणला होता आणि बाकी चारही वर्णांची माणसं सर्वांत खालच्या लेव्हलवर ठेवली होती. तो "मानव' आज कुठंतरी हरवलाय. भरत नाट्यमंदिरात त्या दिवशी ज्या प्रवृत्तींनी हुल्लडबाजी केली त्यांना घाबरून तो कुठं तरी लपून बसलाय... त्याला त्याच्या आसपास त्याच्या जातीचं, त्याच्या धर्माचं कोणीच दिसत नसावं कदाचित!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin dixit write panto drama article in saptarang