मूकनायकाची 'बोल'की कहाणी (नितीन दीक्षित)

नितीन दीक्षित
रविवार, 26 मे 2019

'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी...

'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी...

आमचं क्षेत्र हे नाव, प्रसिद्धी मिळवून देणारं म्हणून ओळखलं जातं; पण ही लोकप्रियता नेहमीच तुमच्या कुवतीवर किंवा कर्तृत्वावर अवलंबून असते असं नाही. इथं सुमारांनाही बेसुमार ग्लॅमर मिळू शकतं, तर अनेक प्रतिभावान अंधारात राहतात किंवा त्यांना प्रसिद्धीचा योग्य वाटा मिळत नाही. विष्णुपंत दामले हे अशांपैकीच एक होते.
केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपट इतिहासातला सुवर्णकाळ म्हणजे "प्रभात'...प्रभात फिल्म कंपनी.

"संत तुकाराम', "संत ज्ञानेश्‍वर', "शेजारी', "रामशास्त्री' अशा अनेक आशयघन आणि तरीही अत्यंत यशस्वी चित्रपटांची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीनं केली. "प्रभात' म्हटलं की बहुतेकांना एकच नाव आठवतं व ते म्हणजे व्ही. शांताराम. मात्र, "प्रभात'च्या स्थापनेत विष्णुपंत दामले यांचा आणि एस्‌. -फत्तेलाल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या सोबतीला व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर आले. हे चौघंही आपापल्या कलांमध्ये निष्णात होते; पण फिल्म कंपनी नुसत्या कलावंतांनी चालत नसते, त्यासाठी आर्थिक पाठबळही लागतं. ते मिळवून देण्याचं काम विष्णुपंतांनी केलं. कोल्हापुरातले एक सराफ आणि विष्णुपंतांना जवळून ओळखणारे सीतारामपंत कुलकर्णी यांनी कंपनीला अर्थसाह्य केलं आणि ते "प्रभात'चे पाचवे भागीदार झाले...

गोरेगावच्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये बसून वीरेंद्र वळसंगकर मला हे सगळं सांगत होता. त्याचं असं झालं होतं...विष्णुपंतांचे नातू अनिल दामले यांना विष्णुपंतांवर माहितीपट करायचा होता, त्यासाठी ते सुमित्रा भावे यांच्याकडं गेले होते. त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या आणि स्वत: एक चांगला संकलक आणि दिग्दर्शक असलेल्या वीरेंद्रचं नाव त्यांनी दामले यांना सुचवलं. या माहितीपटाची पटकथा आणि निवेदन मी लिहावं अशी वीरेंद्रची इच्छा होती. बजेट माझ्या अपेक्षेपेक्षा कमी होतं; त्यामुळे मी सुरवातीला नकारच कळवला होता; पण नंतर ते थोडंसं वाढवून वीरेंद्रनं मला आग्रह केला म्हणून आणि त्याहीपेक्षा मला "प्रभात'चा हा प्रवास जवळून पाहायचा होता म्हणून मी तयार झालो. मी तिसरी-चौथीत असताना आमच्या साताऱ्यातल्या प्रभात टॉकीजमध्ये "प्रभात'च्या चित्रपटांचा सप्ताह चालायचा. आमच्या सगळ्या वर्गालाच थिएटरमध्ये नेऊन हे सिनेमे दाखवले जायचे. त्या लहान वयात, या चित्रपटांनी आम्हाला अक्षरश: मंत्रमुग्ध केलं होतं. त्यातली काही दृश्‍यं तर मनावर इतकी कोरली गेलेली आहेत की आजही ती मला जशीच्या तशी आठवतात. त्या वयात सिनेमाच्या तंत्राविषयी फारसं काही माहीत असण्याचं कारणच नव्हतं; पण तरीही मनात यायचं : "तो कृष्णानं गोवर्धनगिरी उचलला आहे, त्याचं शूटिंग कसं केलं गेलं असेल...?' "त्या "शेजारी' सिनेमातल्या धरणाची भिंत कशी फोडली असेल...?' किंवा "तो एवढा मोठा गरुड संत तुकाराममहाराजांना घेऊन कसा उडाला असेल...?' त्या बालवयात पडलेल्या अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं आता मला मिळणार होती.
माहितीपट करण्याचा एक कलावंत म्हणून खूप फायदा असतो. एक तर, तुम्हाला अनेक विषयांमध्ये, प्रांतांमध्ये मुशाफिरी करायला मिळते...तुमच्या अनुभवविश्वात नवे तारकासमूह जन्म घेतात...तुमच्या विचारांना खोली असेल तर त्यांना अनेक नवे पैलू मिळतात...

या माहितीपटासाठी संपूर्ण दामले परिवार संशोधनाच्या कामात गुंतला होता. त्यांनी दिलेला प्रत्येक कागद मी वाचून काढत होतो आणि हळूहळू विष्णुपंतांशी माझी ओळख वाढत जात होती!

पेण ते पुणे व्हाया मुंबई-कोल्हापूर ही विष्णुपंतांची संघर्षयात्रा. ते एक उत्तम छायाचित्रकार होते, ध्वनिसंयोजक होते, दिग्दर्शक होते, कलादिग्दर्शक होते. शिवाय, कुशल तंत्रज्ञही होते. आनंदराव आणि बाबुराव पेंटर या गुरूंच्या तालमीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असे अनेक पैलू पडलेले होते. नाटकांचे पडदे रंगवण्यापासून ते "प्रभात'चे मालक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हे सगळंच एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं होतं. अनेक नाट्यमय प्रसंगांनी भरलेला त्यांचा हा जीवनपट. त्याला केवळ माहितीपटात न्याय मिळणार नव्हता आणि म्हणूनच आम्ही ही नुसती डॉक्‍युमेंटरी न करता याचा डॉक्‍युड्रामा करायचा असं ठरवलं. म्हणजे या माहितीपटातले काही ठळक प्रसंग नटांना घेऊन चित्रित करायचे, असं ठरलं. हळूहळू पटकथा आकार घेऊ लागली. माहितीपट एका तासाचा असावा असं ठरलं होतं आणि सांगण्यासारख्या इतक्‍या गोष्टी होत्या की तीन तासही पुरले नसते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक गोष्टींचा समावेश पटकथेत करता येणं शक्‍य नव्हतं. कोणत्या गोष्टी विस्तारानं मांडणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टींचा केवळ उल्लेख केला तरी पुरेसं आहे, कोणत्या गोष्टी वगळल्या तरी हरकत नाही हे सगळं आधी ठरवलं. पटकथा लिहीत असताना एका बाजूला निवेदन आणि दुसऱ्या बाजूला त्या निवेदनावर अपेक्षित असणारी दृश्‍यं, यातल्या कोणत्या दृश्‍यांचं नाट्यरूपांतर करायचं असं सगळंच लिहीत गेलो. नाट्यरूपांतर करण्याचे प्रसंग निवडताना काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं होतं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. विष्णुपंतांचा कार्यकाळ हा साधारणत: 1918 ते 1943 पर्यंतचा. तो काळ उभा करायचा म्हणजे मोठं खर्चाचं काम; पण तेवढं बजेट नव्हतं आणि बजेट नसतं तेव्हा कल्पकता कामी येते! या कल्पकतेचाच वापर करून प्रसंग निवडले आणि वीरेंद्रनंही ते फार हुशारीनं चित्रित केले.

हृषीकेश जोशी (विष्णुपंत दामले), प्रशांत तपस्वी (एस्‌. फत्तेलाल),
राजेश पाठक (व्ही. शांताराम) नितीन धंदुके (केशवराव धायबर) या मुख्य पात्रांबरोबरच इतर अनेक लहान-मोठ्या पात्रांची निवड अत्यंत चपखल झाली होती. नाट्यरूपांतरासाठी जे प्रसंग निवडले होते, त्यांमध्ये संवाद असे काही नव्हतेच. कारण, त्यावर निवेदन असणार होतं, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आपल्या अभिनयातूनच त्या प्रसंगाचा आशय पोचवावा लागणार होता आणि ही गोष्ट यातल्या सगळ्याच कलाकारांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. अनेक देशांमध्ये माहितीपट हे थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि लोक ते बघतात. ही संस्कृती आपल्या देशात अद्याप रुजलेली नाही, हे खरंतर आपल्या प्रेक्षकांचं दुर्दैव. माहितीपट म्हणजे काहीतरी रटाळ, कंटाळवाणं किंवा फारच डोक्‍याला त्रास देणारं असं काहीतरी असतं हा सर्वसाधारण समज. पूर्वी - मुख्य चित्रपटाच्या आधी जे सरकारी माहितीपट दाखवले जायचे त्यांनी हा समज दृढ करण्याचंच काम के लं; पण हा समज दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक जण करतायत. आमचा प्रयत्नही त्यापैकीच एक. अगदी
पटकथेपासून ते निवेदनापर्यंत अशा सर्वच अंगांनी हा माहितीपट उत्तम व्हावा यासाठी मेहनत घेण्यात आली. आशू सोलंकीचं छायांकन, केदार दिवेकरचं पार्श्‍वसंगीत, रविन करडे आणि विक्रम सिंग यांचं कलादिग्दर्शन, विशाल बाटे आणि वीरेंद्रचं संकलन, मराठीत सचिन खेडेकर यांनी केलेलं आणि इंग्लिशमध्ये टॉम आल्टर यांनी केलेलं निवेदन हे सगळंच खूप छान जुळून आलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मलाही पटकथेसाठी काही पुरस्कार मिळाले.
या माहितीपटाचं नाव ठरवायच्या वेळी एक मजेशीर गोष्ट घडली होती. "फिल्मला नाव काय द्यायचं?' असं एकदा मला वीरेंद्रनं विचारलं. एक नाव माझ्या मनात होतं ते मी त्याला सांगितलं; पण त्याला ते आवडलं नाही. मध्ये बरेच दिवस गेले आणि वीरेंद्रचा मला फोन आला आणि मीच त्याला सांगितलेलं नाव त्यानं मलाच सांगून विचारलं : "हे कसं वाटतंय?'
ते नाव होतं : विष्णुपंत दामले : बोलपटांचा मूकनायक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin dixit write prabhat film company article in saptarang