esakal | स्विस 'आल्प्स'वर 'भैरवी'चे सूर..???
sakal

बोलून बातमी शोधा

roger federer

स्विस 'आल्प्स'वर 'भैरवी'चे सूर..???

sakal_logo
By
नितीन मुजुमदार

रॉजर फेडरर हे टेनिसमधील एक महाकाव्य आहे. टेनिसमधील हा महामानव साधारण महिनाभराने म्हणजे ८ ऑगस्ट रोजी वयाची चाळीशी पूर्ण करेल. या वर्षी विम्बल्डनमध्ये स्वारी सरळ तीन सेट्स मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी,२४ वर्षीय हबर्ट हरकाझ कडून, म्हणजेच आपल्यापेक्षा खूप तरुण वयाच्या खेळाडूकडून पराभूत झाली आणि साऱ्या जगातील क्रीडारसिकांच्या मनात कुठेतरी मैफिलीतील भैरवी डोकावली. विम्बल्डन च्या ग्रास कोर्टवर आपण पुन्हा फेडररला खेळताना बघू की नाही ही शंका उगाचच मनाला सतावू लागली. काहीही झालं तरी तिसऱ्या सेट मधील ६-० हा स्कोअर मनाला पटत नव्हता. फेडरर ने सुद्धा या सामन्यानंतर पुढे काय या प्रश्नावर बोलताना, 'मला माहित नाही' असे काहीसे सूचक उत्तर दिले, कदाचित ऑलीम्पिक स्पर्धेचे विचार त्याच्या मनात असावेत. फेडररची ही 'विम्बल्डन' मधील १८वी क्वार्टर फायनल होती. बऱ्याच वेळा हा माणूस आपल्याला अचंबित करतो एवढे सुपर ह्यूमन एफर्ट्स त्याच्या कामगिरीत सातत्याने दिसतात. अफाट गुणवत्ता,अमर्याद प्रतिभा, कमालीची जिद्द, कारकिर्दीचे विमान हजारो फुटांवरून उडत असतांना माणुसकीचा कंट्रोल टॉवर जमिनीत घट्ट रुतलेला आणि हे सारे कमी म्हणून की काय, कुटुंब वत्सल अशी याची जीवनशैली!!! साऱ्या जगाने सर्वकालीन महान व्यक्तिमत्व म्हणून याची दखल घ्यावी असा याच्या कारकीर्दीचा आलेख आणि त्याच्या देशातील, स्वित्झर्लंड मधील 'आल्प्स' च्या उंचीला कैक योजने मागे टाकेल अशा उंचीवरून चाललेले याच्या लोकप्रियतेचे उड्डाण!!!कोणालाही भारून टाकेल असे हे तुमच्या आमच्या सारखे हाडा मांसाचेच पण 'सुपर ह्यूमन' क्षमता सिद्ध केलेले रॉजर फेडररचे व्यक्तिमत्व, आपल्या अचाट कामगिरीने 'लार्जर दॅन लाईफ' झालेले!

रॉजर फेडरर बद्दल काही महान टेनिसपटूंची मते ऐकली तर रॉजर फेडररला खेळतांना पाहणाऱ्या सध्याच्या जनरेशन्स किती भाग्यवान आहेत याचा अंदाज येतो. ८० च्या दशकातील टेनिसमधील एक मोठं नाव म्हणजे जिमी कॉनर्स. तो म्हणतो,"आधुनिक टेनिस युगात एक तर तुम्ही क्ले कोर्ट स्पेशलिस्ट असता किंवा तुम्ही ग्रास कोर्ट स्पेशलिस्ट असता किंवा तुम्ही हार्ड कोर्ट स्पेशलिस्ट असता आणि तुम्ही यातले काहीही नसून जेते असाल तर तुम्ही केवळ आणि केवळ रॉजर फेडरर असू शकता!" सेरेना विल्यम्स ही रॉजरची समकालीन महान टेनिसपटू म्हणते," रॉजरला टेनिस मधीलच नव्हे तर सर्व खेळांमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणायला पाहिजे" ट्रेसी ऑस्टिन म्हणते," रॉजरच्या काही फटक्यांना बेकायदेशीर म्हणून घोषित केले जावे!"

बिटरिझ टिनोको या रॉजर फेडरर च्या चाहतीला कॅन्सर ने ग्रासले होते, साल होते २०११/१२. तिने रॉजर फेडररला विम्बल्डन येथे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ती इच्छा मान्यही झाली. रॉजर ने तिला केवळ एक पारंपरिक हस्तांदोलन करून काही स्मृतीचिन्हे देणे अपेक्षित होते. तिला फेडरर बरोबर 'विम्बल्डन' ची प्रदीर्घ टूर इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह करायला तर मिळालीच शिवाय फेडरर बरोबर भरपूर वेळ बातचीत देखील करता आली. फेडरर मधील संवेदनशील माणूस दिसणाऱ्या त्या संस्मरणीय अनुभवाबद्दल ती ट्विटर वर छान व्यक्त झाली आहे.एका पत्रकाराने फेडरर ची मुलाखत मागितली. आठ तासांत तो फेडरर समोर संवाद साधण्यासाठी सज्ज होता. खोलीत दोन खुर्च्या होत्या, एक आर्म रेस्ट्स असलेली,गुबगुबीत कुशन वाली आणि दुसरी सरळ पाठ असलेली आणि अगदी साधी. मुलाखतीसाठी फेडरर आला आणि त्याने त्या पत्रकाराला काहीसे अडखळत विचारले, "मी सामना खेळून खूप दमलोय , मी त्या कुशनवाल्या आरामदायी खुर्चीत बसलो तर चालेल का?"खेळाडू म्हणूनच नव्हे तर तो माणूस म्हणूनही किती उंचावर होता याची पुरेशी प्रचिती या उदाहरणामुळे येते.

"I fear no one, but I respect everyone" हे फेडररचे उदगार त्याच्या व्यक्तिमत्वाची आणखी ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहे .जोकोविच हा फेडरर चा समकालीन,तो म्हणतो,'तुम्ही जर फेडरर असाल तर आणि तरच तुम्ही तुमचा खेळ परिपूर्णतेकडे नेऊ शकता.' अँडी मरे ने २०१० साली ऑस्ट्रेलियन ओपन च्या अंतिम फेरीत फेडरर कडून पराभूत झाल्यावर उदगार काढले होते,'मी फेडरर सारखा रडू शकतो पण त्याच्या इतके छान खेळू शकत नाही याची मला लाज वाटते'.

सायमन कूपर या नामवंत ब्रिटिश पत्रकाराला झुरिच ते माद्रिद या प्रवासादरम्यान स्वतः च्या खाजगी जेट मधून ४०००० फूट उंचीवरून जाताना मुलाखत देताना फेडरर काहीसा भावुक होत सांगतो,"आजही मला ते दिवस आठवतात,तेव्हा माझे आई वडील सीबा गायगी या फार्मा जायंट कंपनीत नोकरीला होते, बसेल हे स्वित्झर्लंड मधील फ्रान्स च्या सीमेवर असलेले आमचे शहर,वयाच्या १४ व्या वर्षी मी दर रविवारी संध्याकाळी ६ वाजता अकादमी मध्ये जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसायचो, घर सोडताना खूप वाईट वाटत असे, प्रसंगी मी खूप रडत देखील असे पण माझी तक्रार नव्हती, तो निर्णय माझा स्वतः चा होता'.

स्वतःच्या कुटुंबियांबद्दल तर रॉजर खूप हळवा आहे,तो म्हणतो," मला अनेक वेळा माझ्या कडे दोन घड्याळं असल्यासारखं वाटते,एक माझ्या साठी आणि एक माझ्या कुटुंबियांसाठी! प्रत्येकाचे शेड्युल मला नीट माहिती असते,मुलं कोणत्या वेळी काय करत असतील,त्यांच्या झोपायच्या वेळा काय आहेत ,सारे सारे मला ठाऊक असते!,टूर वर असताना मी माझ्या सामन्याच्या वेळे आधी किमान ४५ मिनिटे मुलांशी बोलतोच बोलतो!!"."बऱ्याच वेळा मी टूर हून परतल्यावर मुलं विचारतात,'डॅड, लेगो खेळायचं का?माझं मन अनेकदा स्पर्धास्थानी असतं पण मी मुलांच्या सांगण्याकडे प्रामाणिकपणे पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न करतो!'

वयाच्या १५ व्या वर्षी जेव्हा कोवळा रॉजर फ़्रेंच रेस्टॉरंट्स मध्ये एकटा बसायचा तेव्हा त्याला एक आगळा छंद जडला होता काय तर म्हणे तेथील पेपर नॅपकिन्स वर स्वतः ची स्वाक्षरी गिरवायचा ,कारण काय तर म्हणे," न जाणो यदाकदाचित मी प्रसिद्ध टेनिसपटु झालो तर!!!"

२००४ ते जाने २०१० दरम्यान फेडरर ने एकूण कारकिर्दीतील २० पैकीतब्बल १५ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली.एकूण कारकिर्दीत त्याने ८ विम्बल्डन,६ ऑस्ट्रेलियन ,५ यु एस ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत तर एक फ़्रेंच ओपन अजिंक्यपद त्याच्या नावावर आहे.वयाच्या मात्र २००९ मध्ये त्याच्या जुळ्या मुलींचा जन्म झाला आणि फेडरर चे विश्व काही काळापूरते बदलले,फेडरर म्हणतो,'२०१०/२०११ चे स्पर्धा रिझलट्स मला फार आठवत नाहीत,त्या काळात मला आठवतात त्या फक्त माझ्या मुली!'

रॉबर्ट आणि लिनॅट या फेडरर दाम्पत्याचा रॉजर हा मुलगा, रॉजर चा जन्म ८ ऑगस्ट १९८१ रोजी झाला. आपल्या कारकीर्दीत शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला रॉजर लहानपणी काहीसा तापट होता. रॉजरच्या वडिलांनी, त्याच्याशी खेळत असलेला एक सामना मध्येच अर्धवट सोडला होता कारण सामन्यादरम्यान लहानग्या रॉजरचे कोर्टवरील वर्तन त्यांना आवडले नव्हते. रॉजरची आई लीनॅट सांगते,"आम्ही त्याला सामन्याच्या निकालाबद्दल कधीही बोललो नाही. मात्र त्याचे वर्तन खटकले तर जरूर बोललो आहोत".

रॉजरची पत्नी मिरका ही स्वतः आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मात्र आता पूर्ण वेळ गृहिणी आणि फेडरर ची पी आर मॅनेजर देखील. तिचे तुझ्या आयुष्यातील स्थान काय या प्रश्नावर रॉजर उत्तरतो,'रोज सकाळी जाग आल्यावर ती मला समोर दिसायला हवी , That's what matters!! 'आई- वडील, दोन जुळी मुले आणि दोन जुळ्या मुली आणि पत्नी मिरका एवढे सारे कौटुंबिक विश्व रॉजर फेडरर चे आहे,दौऱ्यावर असताना हा दिवसातून किमान ३ वेळा घरी बोलणारच!! कोरोना काळात 'बायो बबल' मध्ये राहण्याबाबत तो म्हणतो,'मला स्वतःला हे शक्य झालं पण मुलांना एवढ्या प्रदीर्घ काळ हे शक्य होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे'.

हे सारे कुटुंब एकमेकांमध्ये छान मिसळून परीपूर्ण आयुष्य जगताना दिसत आहेत. रॉजर फेडरर फौंडेशन चे सामाजिक कार्य देखील थक्क करणारे आहे. फौंडेशन ची जोहांसबर्ग येथील रिजनल डायरेक्टर ईना मोजहेनदी आपल्या ब्लॉग मध्ये लिहिते,"रॉजर फेडरर बरोबर शिक्षण व खेळांच्या प्रसारासाठी मी झांबीयात होते,चार दिवसात मी विनम्रता म्हणजे काय हे फेडरर मुळे नव्याने शिकले. त्या गरीब मुलांबरोबर त्यांच्याप्रमाणेच वर्गाबाहेर पायांतील बूट काढून ,मांडी घालून बराच वेळ बसलेला फेडरर मी बघितला,त्याची या मुलांच्या उन्नतीबद्दल तळमळ मी स्वतः बघितली आणि थक्क झाले"

रॉजर फेडरर फौंडेशनच्या वेब साईट वर गेल्यावर रॉजर फेडररच्या फौंडेशनने आफ्रिकेतील दक्षिण भागात केलेल्या कार्याची नीट कल्पना येते. बिल गेट्स, रोलेक्स अशी अनेक बडी नावे फौंडेशनने या कामात सहभागी करून घेतली आहेत. गत वर्षाच्या अखेरीस सुमारे १५,५०,००० मुलांना फौंडेशन च्या कार्याचा थेट लाभ झालेला आहे.प्रसिद्धी,पैसा आदी गोष्टींच्या पुरात वाहून न जाता जीवनाची नौका जरूर तेव्हा सामाजिक जाणिवेच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवू शकणाऱ्या या टेनिसमधील महान व्यक्तीमत्वास अधिक परिपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा!

loading image