आंतरराष्ट्रीय राजकारणात माहितीयुगामुळे बदल!

इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये, युगाचा शेवट (युगांत) नेहमीच भीती, गैरसमज यांनी भरलेला असतो कधीतरी त्यात दहशत व दरारा याचाही सहभाग असतो.
आंतरराष्ट्रीय राजकारणात माहितीयुगामुळे बदल!
Summary

इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये, युगाचा शेवट (युगांत) नेहमीच भीती, गैरसमज यांनी - भरलेला असतो कधीतरी त्यात दहशत व दरारा याचाही सहभाग असतो.

- नितीन पै

इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये, युगाचा शेवट (युगांत) नेहमीच भीती, गैरसमज यांनी भरलेला असतो कधीतरी त्यात दहशत व दरारा याचाही सहभाग असतो. एका युगातून दुसऱ्या युगाकडं जाताना दुसऱ्या काळातील संक्रमणामध्ये नेहमीच अनिश्चितता असते. अशा काळात जगणाऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. सत्ता, संपत्ती आणि समाजात निश्‍चित असे काही स्थान आहे ते असेच कायम राहील काय याविषयी या सर्व गोष्टी असणाऱ्यांच्या मनात काही शंका असतात. बदल होण्यापूर्वीच्या समाजातील मूल्यं, नियम आणि कायदे बदलतील का ? आपण ज्याला योग्य आणि अयोग्य समजतो ते असेच राहतील की बदलाच्या वाऱ्यात उडून जातील? आणि शेवटी आपलं आयुष्य, उदरनिर्वाहाची साधनं आणि आपलं घरदार सुरक्षित राहील का, याची खात्री आहे का ?

सामाजिक सलोखा, आर्थिक वाढ आणि उन्नतीच्या दिशेनं सुरू असलेली मार्गक्रमणा या गोष्टी गृहीत धरलेल्या भारतीय पिढीच्या मनातून हे प्रश्न फार दूरचे आहेत. पाकिस्तान, चीनबरोबरचं युद्धं आणि फाळणीची भीषणता या बाबी आपल्याकडील जनतेला सहन कराव्या लागल्या असल्या तरी युरोप, पूर्व आशिया आणि उत्तर अमेरिकेमधील नागरिकांनी ज्या हिंसाचाराच्या झळा सहन केल्या तशा झळा भारतीयांना बसलेल्या नाहीत. त्यामुळं बाह्य जगातल्या घडामोडींकडे आपण बारकाईनं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. एक अभूतपूर्व नवं युग उदयाला आलंय, आणि आपल्यासाठी प्रचंड आव्हाने समोर ठेवत असून त्यावर आपल्याला मात करायची आहे. जर आपल्याला संधींचा फायदा घ्यायचा असेल तर या आव्हानांवर मात केलीच पाहिजे.

अमेरिका ही आत्तापर्यंतची सर्वांत मोठी जागतिक शक्ती आहे. चीननं गेल्या ३५ वर्षांत प्रभावी प्रगती केली आहे, परंतु शी जिनपिंग यांनी डेंग झियाओपिंगचा विजयी फॉर्म्युला बदलून प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अमेरिकेचे याआधीचे अध्यक्ष बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कालावधीचा विचार केला तर अमेरिकेने आपला आत्मगौरव गमावला आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आपलं तेज मावळत चाललेला सुपरस्टार आणि चीनला भविष्यातील महासत्ता मानणे मूर्खपणाचे ठरेल. रशियाच्या विघटनानंतर उदारमतवादी लोकशाही, मुक्त बाजारपेठ आणि जागतिकीकरण याबाबतीत अमेरिकेला सध्या स्पर्धा होत आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडींना आकार देणाऱ्या अमेरिकाप्रणीत कल्पनांना आव्हान मिळत आहे, आंतरराष्ट्रीय राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक निकषांमध्ये झालेल्या बदलांचा विचार केला तर जागतिक पातळीवरील सत्ता समतोलातील बदल ही आपल्या काळातील मोठी गोष्ट आहे. पण सर्वांत मोठी गोष्ट नक्कीच नाही.

आपल्या काळातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे औद्योगिक युगापासून माहिती युगाकडे वेगाने होणारे संक्रमण. शिकार करणे आणि त्यासाठी भटकणे यातून कृषी युगात जाण्यासाठी मानवाला हजारो वर्षे लागली असतील. मात्र औद्योगिक युग पश्चिम युरोपमध्ये सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सुरू झाले, उर्वरित जगाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दोन शतके लागली. माहितीयुग मात्र ३०-४० वर्षांपूर्वी सुरू झाले, आणि अत्यंत कमी कालावधीतच त्यानं जग व्यापले आहे. जगातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येशी इंटरनेटचा संबंध आलेला आहे आणि या सर्वांवर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. माहितीशास्त्रानं केवळ स्वत:चे उद्योगच निर्माण केले नाहीत, तर आधीच्या उद्योगात परिवर्तन घडवून आणलंय. देश, कंपन्या आणि व्यक्तींचं नशीब बदललं आहे. अचानक झालेल्या या सामाजिक बदलाचे परिणाम आपल्या आयुष्यावर तर झालेच आहेत पण भारताचे जगाशी जे संबंध आहेत त्यावरही मोठे परिणाम करणारे ठरले आहेत.

आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, मुळात ती समजून घेतली पाहिजे की सायबरच्या क्षेत्रात आपण एक मोठी शक्ती नाही. मला मान्य आहे की आपल्याकडे आयटी उद्योग खूप मोठा आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत त्याचं मोठं योगदान आहे आणि लाखो लोकांसाठी रोजगार निर्माण कऱणारा हा उद्योग आहे. खरंच, हा उद्योग आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मात्र याचा अर्थ आपण खूप मोठे म्हणजे जागतिक उद्योगात ‘बिग प्लेयर्स’ आहोत असे नाही. माहितीच्या युगात आपल्या देशानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये योग्य धोरणात्मक निवडी केल्यास एक मोठी जागतिक शक्ती बनण्याची आपली क्षमता आहे. यासाठी आम्ही आयटी मध्ये ‘जगातली महासत्ता आहोत’ हे समीकरण आपल्या मनात रुजलेलं आहे ते काढून टाकलं पाहिजे.

सध्याच्या माहितीच्या या युगात आपल्याला खूप काम करायचे आहे त्यातील आर्थिक क्षेत्रात बरचं काही घडलंय पण तर राजकीय क्षेत्राचा विचार केला तर देशासमोर तात्काळ सोडवली पाहिजेत अशी बरीच आव्हानं आहेत. गेल्या काही वर्षातले वाद आणि महत्त्वाच्या बातम्या आणि सोशल मिडीयावर केला जाणारा प्रचार याचा विचार केला तर दुसऱ्या देशाच्या राजकारणावर गंभीरपणे प्रभाव टाकणे शक्य आहे. सार्वजनिक वादविवादाला वळण देण्यासाठी तसेच निवडणुकांमधले प्रवाह बदलण्यासाठी, हिंसाचाराला चिथावणी देण्यासाठी ‘इन्फॉर्मेशन ऑपरेशन्स’चा उपयोग करता येतो. यातून ‘आभासी वास्तव’ उभे केले जाऊ शकते.

आपल्या सशस्त्र दलांनी आपल्या देशाच्या सीमांवरून होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी ते सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र देशाच्या आंतरिक आणि मानसिक पातळीवरच्या सीमा असुरक्षित आहेत. आपले परराष्ट्र धोरण प्रभावित करण्यासाठी किंवा आपल्या देशातील एकसंध समाजात गैरसमज पसरवण्यासाठी शत्रू सहज काम करू शकतो. या जगात आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्याला सामाजिक ऐक्य, आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याची गरज आहे. हे सगळं करण्यासाठी जरा सभोवताली नजर टाका ! काय दिसतं तुम्हाला? सभोवतालचं राजकारण, संस्कृती आणि माध्यमं हे करताना दिसत आहेत का ?

प्रिय वाचकहो, माहितीयुगातील भौगोलिक राजकारण कसं असेल याबद्दलच आपण या सदरातून चर्चा करू. आहोत आणि या युगान्तामध्ये आपल्या देशासाठी म्हणजे भारतासाठी सर्वोत्तम काय निवडायचं तेदेखील पाहणार आहोत.

(सदराचे लेखक शिक्षण आणि नागरिकांसाठीच्या विविध योजना यासाठी संशोधन करणाऱ्या तक्षशीला इन्स्टिट्यूट या संस्थेचे संचालक व सहसंस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com