esakal | ...आम्ही मोकळं झालो!
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

...आम्ही मोकळं झालो!

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

त्यांना म्हणलं होतं हुंडा घेणारा जावई नगो आपल्यास्नी... ह्येनी पयल्या बैठकीपासनं तसा रेटा लावला हुताच हुंडा द्यायला जमायचं न्हाय म्हणून... तिकडंची मान्सं बी म्हणाली, आम्हास्नी तरी काय कमी हाय, तुमच्याकडनं हुंडा घ्याला... तेवढं तुमच्या पोरीलाच दोन तोळ्याचं मंगळसूत्र घाला... आम्ही पोराला तेवढीच आंगठी आनं चैन करतो... बाकी लग्नाचा खर्च आर्धा आर्धा करू... आम्हासनी नगो, पण उद्या तुमच्याच पोरीला बाहेर कुठं जायच म्हणलं तर एखादी गाडी असली पायजेल म्हणून लय न्ह्याय एकांदी टू व्हीलर द्या घिवून... न्हाय हो म्हणत हे सगळं मान्य करत बैठक उठली हुती...

हुंडा नको तुमच्या पोरीसाठी करा म्हजी हुंडाच द्या पण हुंडा म्हणू नगा आसा कारभार चालू हाय सगळा...

तिचा बाप मोडकी सायकल रोज फाटलेल्या टाचंन रेमटवतो...तालुक्याला भाजीपाला इकायला गेला तर धा - इस रुपयं वाचावं म्हणून स्टॅन्डपासन मार्केट पावतर चालत जातो, रिक्षाचं भाडं नग म्हणून डोक्यावरनं ओझं वहातो...एकदा पीक बरं आलं म्हणून हरिभावची जुनी सायकल घेतली हुती, तिलाबी आता पंधरा वर्ष झाली...

कायदा आला आन कायबी झालं तरी माणसं काय बदलली न्हाईत गड्या...पोरगी सांभाळायचं डिपॉजिट घेतल्यागत सगळं मागून घेत्यात माणसं, आन पोरीच्या बापाला चार चौघात कमीपणा नगो म्हणून हे समदं देण भागचं हाय...

तसा गावाकडं पोरगी झाल्यापासन कमीपना हायच की... ती लेट आली म्हणून शेजाऱ्यांस्नी काळजी, ती शिकती म्हणून गावाला काळजी... ती कशी चालती, कशी बोलती, अंगावर काय घालती ह्या सगळ्यांची गावाला काळजी असती... जरा काय कानावर पडलं कि गावभर करत्यात...

ह्यांनी जमिनीचा एक तुकडा काढला... पोरीला मंगळसूत्र केल, जावयाला हुंडा नाही करत बदल्यात होंडा दिली...पिकासाठी काढल्याल्या कर्जात पोरीच्या लग्नाचा आर्धा खर्च केला... तरी बी भातात मीठ कमी, आन गुलाबजाम ग्वाड लागला न्हायचं माणसासनी...

पोरगी जाताना बापाचा कंठ दाटून आला. एखाद्या शेतकऱ्याला दिली असती तर, त्यानं एवढी मागणी केली नसती पण एवढं शिकवून आपली पोरगी चांगल्या नसली, तरी मोठ्या घरात गेली पायजेल आसं कुठल्याबी बापाला वाटतचं की... गावातला एकदा बेरोजगार उमदा तरुण पोरगा, आपल्या पोरीला आवडतो ह्ये काय बापाला ठाव नसतं का काय... पण ते पचवायची ताकद त्येज्यात नसती...

पुन्हा माणसांची तोंड गप्प करायची आन पोरीचं हाल झालं तर जन्मभर जीवाला घोर लागायला नगो असतो त्याला...

पोरगी गेलं त्या राती माझ्या पदराकडं ढसाढसा रडला माणूस... तिथंपसन ज्यो बोलला न्हाय त्यो आजून...

आता दर दोन दिवसांनी बँकेच्या गाड्या येत्यात... घरात असून घरात न्हाय, आसं सांगून मलाबी नको झालयं...

पण पैस आणायचं कुठनं... चार गुंठं हुतं त्यातलं दोन पोरीच्या लग्नाला गेलं दुसऱ्या दोन गुंठ्यात एकुलती एक असल्यामुळं पोरगीच वाटा मागतीय या नवऱ्यासाठी...

पिकासाठी आधीचं फेडल्याशिवाय बँक उभी करना, लोकांचं देण काय मागं सरना..! खायचं हाल हुया लागलं म्हणून एक वेळ जीवुन अन पाणी पिऊन दिवस काढावं म्हणलं.. त्याच पाण्यात अवशीद टाकलं एक दिवस कुणालाच कळू दिल न्हाय... लगीन, जिमीन, पोरगी सगळं हितचं राहीलं, आमी मात्र मोकळ झालो ह्यातन...!

loading image