esakal | ...त्याची ताय !
sakal

बोलून बातमी शोधा

pune

...त्याची ताय !

sakal_logo
By
नितीन पवार

बन्या बापूची सून सुमी आज घरातलं समदं उरकून पहाटच्या यसटीन बाजारला आली... दिसायला सावळी असली तरी बघणाऱ्याची नजर क्षणभर टिकलं आशी दिखनी हाय ती...आज बाजारचा दिस म्हणून सकाळच्या पारी टोमॅटो आन मिरच्या तिनं तुडून आणल्या हुत्या...

बाजारात सीजन मूळ सगळीकडे लालभडक टमाटी आन हिरव्यागार मिरच्या... कुणी इसन रेट लावला तर कुणी पंधरान... पण सुमीच म्हणणं एवढं लेकरागत मोठं करायचं आन कवडी मोलात कस काय इकायचं म्हणून तिनं रेट पाडला न्हाय... ती इसच्या खाली आली न्हाय... माणसं यायची सुमीच्या टोपल्यातल्या मिरच्या आणि टोमॅटोकडं बघायची आन पुढच्याची पंधराची आरुळी आयकली कि म्होरं हुयाची... बगता बगता त्या पंधरावाल्याची टुपली रिकामी झाली पण टमाटी आन मिरच्या अर्ध्याच्यावर तश्याच हुत्या... भर उन्हात उभ राहून तिज पाय दुकाय लागलं... काय न्हाय पाच रुपयांन गळल्याला घाम न्हाय पण घासाला दाम तर यील म्हणून ती पंधरावर आली... चार दोन गिराइक न्हाय झालं की लगीच त्या माणसानं धा रुपय किलो केलं... शेतकऱ्यांकडन कवडी मोलात वावरातनं माल उचलणारा मोटा व्यापारी हुता त्यो... वायचं न्हाय, अर्धी गाडी भरून माल आणला हुता आण त्यो कसा संपवायचा हेबी त्यो ठरवून आला हुता... अगदी ह्या बाजारात न्हाय झाली तरी गाडी घिवून त्यो उद्या दुसरा बाजार गाटणार हुता...पण सुमीला ह्यो एकच बाजार हुता... आज कायबी करून माल संपवायचा हुता पण धा रुपयान हाता तोंडाची गाट पडणार नव्हती...हे तिला म्हायती हुत...

दुपार टळून सांज झाली तरी पाटी मोकळी झाली नव्हती.. आता धा रुपयान माल दिल्या वाचून उपेग नव्हता... शेवटची यसटी गिली तर हितच रहायची पाळी यनार हुती... आन हित आपलं कुणी नात्यातलं ना गोत्यातलं.. त्यामुळं सुमीची लगबग सुरु झाली... पटापट धा तर धा ला तिनं माल द्याला सुरवात किती पण अंधार पडला तस गिरायक कमी झालं हुत... हळूहळू माणसं पांगली आन बाजार उटला...

अंधार पडला तसं सुमीच्या काळजाच पाणी हुत हुत.. एवढा सोन्यासारखा माल घरी निवून फुकट द्याला लागल, न्हाईतर टाकून द्याला लागल... हे दुनी सुमीला मान्य नव्हतं... ती वाट बगत राहिली पण कायचं उपेग झाला न्हाय... तिनं आजून कडं काढला आन राहील्याली एक दोन गिराइक किली.. चार दोन किलो माल घिवून ती यसटी कडं पळाली..तवर यसटी वाटला लागली हुती... वडाप सुद्धा पुन्हा बसल्याली माणसं उतरत्याल म्हणून शेवटच्या यसटीच्या आधी गिली हुती....आता सुमीला काळजी लागली नवरा हित नसतो.. घरी सासू सासरा आन दोन पोर... ह्या बाजाराच्या जीवावर घर चालायचं...माणसं वाट बघत बसली असत्याल, सासरं काळजी करत असत्याल... बाईच्या जातीन आस कुठं जावं.. कुट रहावं... कायचं कळत नव्हतं... सुमी जमलं तेवढ गावाच्या दिशेने पावलं टाकायला लागली.. मनात एकच की वाट उरकून... एकादं वळकीच माणूस घावंलच तर घरी सोडल... न्हायतर गावच्या जवळ तरी... फोन तरी कुठ कायं हुता तिज्याकड, ती कुणाला कळवलं म्हजी न्हायला यील...

झपाझप पावलं टाकत पुढं येताना पुढणं एक मोटर सायकल येताना दिसली... तिजा लायट तिज्या डोळ्याव पडला तशीच ती थांबली...

काय कळायच्या आत एक माणूस मोठयान आवाज देत म्हणला...

‘‘काय व पावणीबाय एवड्या राती कुणीकड...’’

ती कायचं बोलली न्हाय पूड चालत राहिली.. गाडी आता हळूहळू तिज्या माग लागली...

ती पुरती भिली हुती... काय करावं कळत नव्हतं... सोसाट्याचा वारा असून तिला घाम फुटला हुता...तसचं त्या अंधारातन मोटरसायकलच्या उजेडात एक घर दिसलं... तिनं पळत जाऊन घराच दार वाजीवलं... एक बाय पुढं आली.. तिला सगळं सांगितलं तस त्यो गाडीवाला घरापाशी थांबला.. गाडी लावली अन तिज्यापाशी आला...त्या बाईला म्हणला... "कारभारने तायची गाडी चुकली वाटतं...रातची रात राव्ह दे आपल्यात... सकाळनं जातील घरला... भाकरी तुकडा आसल तर वाड..माझ्या हाकला काय व दिली न्हाय म्हणलं घरापावतर यावं बायच्या जातीला कस एकलं सोडायचं न्हाय का...?

आस म्हणून त्यो माणूस पुन्हा गाडी घिवून गेला.. त्यजी बायकू म्हणली "धनी हायत माज...ताय म्हणलय तुमास्नी, काळजी करू नगासा....आता तुमी आमची मानस हाय.."

त्या बायन राती पुन्हा दोन भाकऱ्या थापल्या सुमीच्या पाटीतल्याच टमाट्याच कालवण केल... पोरा बाळाबरं सुमीन बी चार घास खाल्लं... "

सकाळी जायला निगाली...सुमीन पाटीतल्या एक दोन किलो मिरच्या आन टमाटी तिज्या हातावर ठिवल्या... आन येते म्हणलं तिनं शंभराची नोट हातावर ठिवली आन म्हणली...

बरं तुजी यसटी चुकली, माजाबी कालचा बाजार चुकला हुता...

पुन्हा यसटीत बसून घराकड जाताना सुमीची पाटी रिकामी हुती सगळा माल खपला हुता...

loading image
go to top