झोपडीतलं सुख...

Village
Village

लग्नासाठी पाव्हणे बघायला आले आन मी सुखावले... लग्न जसं पोरांसनी आवडतं असतं तसं आम्हा पोरींनाबी ... पोराला जितकी बायकू हवी असती, तेवढाच आम्हासनी देखील नवरा... लग्नाआगुदर फोनवर बोलण हुयाचं... ओळख वाढली आन भेट सुदा झाली... त्यांचं घरी येनं जाणं व्हायला लागलं, ह्या ना त्या कारणावरनं भेटी झाल्या... तसं आधी प्रेम झालं हुत एकदा माझं, पण आता ही मातर यगळीच ओढ हुती... ती माणसं मोठ्या घरातली...थोरा - मोठ्या लोकांत उटण्या बसण्यातली हुती... माझा कसा निभावं लागलं..? मी कसं अॅड्जस्ट करीन..? आसलं कायं बाय याचं माझ्या मनात... पण हे लय भारी, त्यांनी मला कवाच मी गरिबाघरची हायं आसं दाखवून दिल न्हाय... म्हटंलं बरंय की आपल्याला ज्या माणसाबरंबर संसार करायचाय त्यो चांगला असला म्हंजी झालं... आता गप्पा वाढल्या हुत्या... रातीचा दिस आन दिसाची रात कधी झाली ते कळायचं न्हाय... लगीन जवळ आलं, म्हणता म्हणता, झालं बी... देव - देव झालं. सगळी माणसं पांगली... नव्याच नवं दिवस जाऊन खरा संसार सुरू झाला... ह्ये कामाला लागले... मी सासू -सासऱ्यात, दीर-जावात रमायला लागले खरी, पण त्यांनी मला कवा आपली म्हणलं न्हाय...! मोठी लोकं खोटी असत्यात ह्ये त्यास्नी बघून कळलं हुतं मला, पण माझा नवरा तसा नव्हता... त्याच्या जीवावर घर चालायचं पण कवाच त्यानं त्याचा गवगवा केला नव्हता...

दोन भाऊ, एकाला नोकरीं, दुसऱ्याला धंदा टाकून दिला हुता... गावात, घरात नवऱ्याला मोठा मान हुता... मलाबी वाटायचं कुण्या गरीबाची पोर मी, नशीब काढलं बाई... पण मग नवरा मला यळं दीना, कामात गुंतला...घरात सगळं हुत पण माझं मन लागायचं न्हाय, राती कवाबी याचा, कायम काळजीत असायचा...मग एक दिवस, कुणास ठाऊक काय झालं, कुठं माशी शिकली आन ह्येनचं कामं गेलं... घरी बसून चार दिवस चांगलं गेलं की मागनं बोलण सुरु झालं... नुकरी धंद्यावाल्यानी कसला हातभार लावला न्हाय का चौकशी केली न्हाय... कामं शोधून रोज निराश चेहऱ्याने नवरा घरी याचा... नाकासमोर चालणारा नवरा, आज ह्या आन त्या कंपनीच्या टाचा झिजवत हुता... दुसरीकडं कर्ज वाढत हुतं... 

सगळ्यांनी हळूहळू साथ सोडली... आई - बापाला घेऊन मधला यगळा राहिला... नवऱ्याला मसं वाटलं थांबवावं त्यांस्नी, पण सांभाळायचं कसं ? ह्यो सवाल हुता... दिवसेंदिवस घर मोकळं हुत गेलं, तसं माझं दागिनं गहाण पडलं... त्यांनीचं केलं हुतं, आन माझा दागिना बरोबर असताना मला कसलं आलंय, त्या खोट्या सोन्याचं कवतीक. खरं सोनं नवरा आन खरा दागिना नवरा, एवढंच आईन मला शिकीवलं हुत... त्या दिवशी ते ऐकलं हुत.. त्यांच्या डोळ्यात मला पाणी दिसत हुतं माझ्या जवळ ते आलं... हलकेच मला जवळ घेत म्हणलं... माझं काय हुनार, म्हायती न्हाय... रोज देणीदार, सावकार आन उधारीवालं, दारात येत्यात, तुझ्या देखत कायबाय बोलत्यात. तू आसं कर, सगळं नीट हुस्तवर माहेरी जा... मी सगळं नीट करतो मग तू ये... आसं म्हणून मला काय पायजे, ते इचारायच्या आतच नवरा आतल्या खोलीत गेला...दार लावून घेतलं ते वाजवायची माजी हिम्मत झाली न्हाय... मला कसंतरीच झालं हुत... माझ्या नवऱ्यानं मला वळखल न्हाय का...? आशा परिस्तिथीत कुठली बाय आपल्या नवऱ्याला ऐकली सोडलं काय? मला वाटायचं, त्यानं मोकळ व्हावं... सगळं बोलावं माज्याशी. पण त्यो आतल्या आत कुढत राहिला. कवाच काय बोलला न्हाय. जरा वेळानं दार उघडलं. शान्त, एकटा नवरा भीतीला टिकून बसला हुता... मी जवळ गेले म्हटंलं, काळजी करू नका... मला न्हाय जायचं माहेरी मिळून करू कायतरी... श्‍यात हाय आपल्याकडं. मिळून करू... काय मिळलं ते मिळलं... दोन घास खावं, हे घर इका...त्यातनं लोकांची देणी द्या...रानातल्या घरात राहू, दोघांसनी किती जागा लागतीय... कायबी हुत न्हाय... पैसा अडका, म्हजी जगणं न्हाय. एकमेकाला साथ म्हंजी स्वर्ग हाय...

नवरा जवळ आला आणि  मला घट्ट मिठीत घेतलं, लय यळ तसाच हुता. अशी मिठी मी पयल्यांदा बघितली...आजवर कवा इतकं मनापासनं जवळ घेतलं नव्हतं... एखादं घाबरल्यालं बाळ, आयला बिलगत तसा नवरा बिलगला हुता... म्हणल्या प्रमाण केलं सगळं, गावांतलं घर इकलं, रानात आलो. शिती करायला लागलो... त्यास्नी कायचं ईना, मी सांगायचं आणि त्यांनी करायच... मिळून कामं करताना लय रंगत येत हुती...कामं गेलं तवा सासू सासरं म्हणालं, पोरीच्या पायांन सुख गेलं... पण माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात मला सुख लख्खं दिसत हुत... आता हातरूनावर पडलं की निवांत सुखाची झोप हुती. कसली काळजी नव्हती... निवांत यळी, नुसतं माझ्यापाशी बसून रहायचं... दिवसभर दोघात मन गुंतून जायाचं.. मला आधीपेक्षा ह्यो गरिबीतला संसार आवडला हुता, भावला हुता... 

बरं झालं मी गरीबाच्या घरी जल्मले, न्हायतर ही शिती- भाती आणि जगाच्या रीतीभाती कश्या जपायला आल्या असत्या... नवरा म्हणतो, मी मोडून पडल्याला संसार पुन्हा उभा केला. मला वाटतं, मी माझ्या संसारात नवऱ्यास साथ दिली, संसार कुना एकाच्या खांद्यावर उभा राहत न्हाय..त्यांनी शितीत नवं आणलं, आज आदर्श शेतकरी हायंत... मोठं घर नव्हतं, ऐशोआराम नव्हता, पण जे काही हुतं ते आपलं हुत....बापजाद्यांकडून मिळालेलं नव्हतं... जे हुतं ते आपलं हुत... संसारात तुझं माझं नसावच, आपलं असलं की सुख लागत... सुखं आज बी गावातल्या घरात न्ह्याय, तर रानातल्या झोपडीत लागतयं.

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यब’ वरील बेवमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com