esakal | जत्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Jatra

जत्रा

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

पै पाहुणी सगळी जत्रा म्हणलं की गोळा हुत्यात..! यंदा सुदा गावची मीटिंग बसली... मीटिंगमधी जत्रा भरवायची ठरलं; पण मागच्या वर्षीचं बकरी कापून देवाला रक्ताचा टिळा लावायचा न्हाय... सरकारी नियमानुसार त्येला परवानगी न्हाय, आसं जाहीर झालं हुतं... देवाला रक्ताचा टिळा लागतोच... जुनीजाणती माणसं वर्षानुवर्षं ह्यो उत्सव करायची. अचानक खंड पडला अन् पीकपणी नीट आलं न्हाय, तर सगळ्यांची आबाळ हुणार हुती... देवाचा राग परवडणारा नव्हता... तरीबी शासनाच्या निर्णयाच्या पुढं जायचं न्हाय, आसं पोरं म्हणत हुती; पण म्हातारी माणसं आयकायला तयार नव्हती... ''देवासाठी वेळ पडली तर जेलात जाऊ; पण छडगा हुयालाच पाह्यजे'' आसं म्हणत हुती... मीटिंगच्या शीवटी यंदा देवाला बकरं द्यायचं न्हाय आसं ठरलं आन् सगळ्यांनी घरची वाट धरली... एक-दोन दिवसांत मुंबई- पुण्यावाली गावाकडं यायला लागली... मंदिर धुतलं... ढोल्यावर शाय चढवली... पताकं लागलं... देवाची पालखी सजवली आन् मिरवणूक निघाली... पोरांनी वाजंत्रीचा पार घामटा काढला... रात्रभर गावातून फिरून रामपहारी देव देवळासमोर आला...! ढोलाच्या तालावर झाडांनी जोर धरला... एकामागून एकाच्या अंगात देव यायला लागला... माणसं गोळा हुयाला लागली... मानकऱ्यांनी देवाचा कौल घेतला... देव नाराज हुता... त्याला रक्ताचा टिळा लागला नव्हता... जत्रंत कायतरी इघनं येणार हुतं... माणसं भिली हुती... पण सरकारच्या पुढं कुणाला जाता येत नव्हतं..! झाडांची नाराजी हुती, त्यास्नी गोड निवद चालणार नव्हता; पण गावानं जमणार नाही म्हणून सांगितलं... देवाला कसंबसं शांत केलं; पण लोकांमध्ये भ्या हुतं... उद्या खेळणं हुतं.. तमाशा, पै पाहुणी हजार भानगडी हुत्या, सगळं येवस्थित पार पडायला पाह्यजे हुतं... सरपंचांनी रातोरात जत्रा कमिटी तयार किली हुती... त्यास्नी सांगून ठेवलं, दिवसभर लक्ष्य ठिवा, कुठंच काय व्हायला नाय पाह्यजे... गावात भागातली माणसं येणार, त्यांच्यापुढं शोभा जायला नगो हुती... देवाला नसला तरी माणसांना तिखटाचा घास भेटला हुता... घरात पंगती उठत हुत्या, देवळाखाली तमाशा रंगात आला हुता...

आन मधीच कुणीतरी पळत इवून म्हणलं, ''दिन्या डायव्हरनं जीव दिला, हिरीत उडी घितली...'' सगळी पळापळ झाली. कुणालाच कसलं भान राह्यलं न्हाय. पळताना सगळ्यांच्या मनात देवाचा कोप झाला ह्येच आलं... आजवर एवढ्या जत्रा खेत्रा झाल्या; पण कधीच आसं काय झालं नव्हतं... बघता बघता गावात बातमी पसरली, त्येच्या घरात रडारड सुरू झाली... तमाशा रद्द झाला... जेवणं आर्धीच राहिली... बाह्येरची माणसं आल्याल्या वाटंला लागली..

दिन्याला हिरीतनं बाह्येर काढलं... सगळं गाव गोळा झालं... लगीच पोलिसगाडी आली, पोलिसांनी पोस्ट मार्टमला बॉडी पाठवली... सगळी माणसं पांगली... स्मशानभूमीत लाकडं रचायची तयारी चालू झाली... तिथं मोठी माणसं पोरासोरास्नी शिव्या द्यायला लागली... पोरांनी गप्प माना खाली घातल्या हुत्या... दिन्याच्या घरच्यांनी गावाला वेठीला धरलं हुतं... अँम्ब्युलन्समधनं प्रेत गावात आलं... पोलिस सोबत हुते... त्यांनी संगितलं, ''काय न्हाय दारूच्या नशेत माणूस हिरीत पडलाय... अंगावर बाकी कसला वण न्हाय... त्यामुळं मारामारीची काय भानगड न्हाय... जास्त पेल्यामुळं पव्हायला आलं न्हाय, त्यामुळं बुडून मेलाय.'' दिन्या.... दिन्याला आगीन दिली.. आता म्हातारी सगळी गप हुती... दोन दिसांनी गावची मीटिंग बसली... म्हातारी माणसं म्हणली, ''पेला असला तरी गाव सुडून जत्रं दिवशी एकलाच रानात गेलाच कसं त्यो.. कायतरी देवाचं आसणार... ह्या पोरांमुळं गावचा माणूस गेला...'' पोरास्नी न जुमानता देवाला बकरी द्याची ठरली... देवाला या सगळ्यातनं गावाला सोडवायची इनंती किली... रक्ताचा टिळा लागला की झाडानं कौल दिला... आता गाव सुरक्षित हाय, कसलीच काळजी करायला नगो, सगळ्यांची काळजी देव घेणार...

आन् सकाळी तुक्याचं थोरलं पोरगं टॅक्टरखाली घावलं...!