esakal | कवा हुनार लगीन...! Marriage
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

कवा हुनार लगीन...!

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

‘एमआयडीसी’त चांगली नौकरीं लागली म्हणून गावात लै कवतुक झालं... आता हितली एमआयडीसी म्हंजी चार जागासाठी चारशे पोर येनार... आधी गावाजवळच्या कंपनीत हुतो पण सा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट... त्ये संपलं की पुन्हा बेरोजगार... तसं शेती हुतीच की पण शेतीला धंदा मानत न्हायत आपल्याकडं... त्यो कुणाच्या खिजगिनतीत पण नसतो... मग हितल्या कंपनीतनं हाकललं म्हणून पुन्हा एमआयडीसी गाठल्याली... सगळ्यांस्नी पेढं वाटायला पाचशेची नोट गेल्याली...त्यामुळं मला काय एक पेढा खावं वाटला न्हाय... आमच्या लहानपणी ईस रुपयला पावशर पेढ याच...तवा बापाला दोन हजार पगार हुता... आज पेढा सत्तर रुपयं पावशर झाला तरी मला पगार चार हजार हाय...माणसं म्हणत्यात सगळं वाढलंय तर पगार सुदा वाढलाय की... पण शहरात वाढल्याली वस्तू हित येती पण आमच्या कामाला किंमत तेवढी येत न्ह्याय... शाळा जशी सुटली, तवापासन नोकरी धंद्याच्या मागं हाय... मनात लय हाय... ह्या असल्या परिस सुखानं शेती करावी.. पण शेती करणायला पोरगी कोण देणार? आन लगीन न्हाय जमलं तर नोकरीं कुणासाठी करायची.. दोन येळच्या पोटाची अडचण न्हाय राहिली आता.. वयाची तिशी पार हुईल यंदा... आय बापानं किती पै पाव्हण्याच उंबर झिजवल... चपला झिजवल्या.. पण पोरगी काय मिळना...बायोडाटा बघितला की डोक्यातन मुंग्या येत्यात... ‘‘ पुण्यात न्हायतर ममईत स्वतःच घर...नोकरीं करणारा हवा...’’

गाव सोडूनसुदा पुण्यात आन ममईत घर व्हायला उभी हयात जायची... आन आस लिहणाऱ्याला पोरींच्या बापानं आन भावांन तरी कुट घेतलंय घर पण तसं न्हाय... आपल्या स्वतःच्या भावालासुदा ह्याच कारणामुळ स्थळ येईना ह्येबी कळत न्हाय त्यास्नी... म्हजी सगळी स्वतःच घर असल्याली आणि शहरात नोकरीं असल्याली झाली की मग आपला नंबर लागायचा... लागायचा का न्हाय...?

रोज इचारात दिवस रात जातो... कवा हुयाच लगीन..? कुणाला बोलावं तर म्हणणार बघा स्वतःच लग्नाला उतावीळ झालाय आन न सांगावं तर कोण पोरगी देईना म्हणून अडलंय... कवा कवा वाटत हुईल तवा हुईल... न्हाय झालं तरी काय फरक पडतो...? पण फरक पडतो ... कुणाला वाटतं न्हाय आपल्याला संसार असावा बायकांपोरांनी घर भरावं... आता म्हातारी थकलीया पार... एकलीच कोपऱ्यात बसून असती.. मला जमलं तसं मी करतो... चुलती हाय एक, ती येती आधनं मधनं... वाटतं सोडावा लग्नाचा इचार हाय आस चालू द्यावं... पण दुसऱ्याचा संसार बघितला पोरबाळ बघितली की रडू यत...

आजून चार पाच वर्षानी चांगली नौकरी लागलं पण वय गेल्यावर पोरगी कोण दिल..? वय वाढलं तस इचार वाढत्यात.. नको तसल्यांची झांली आपुनच काय पाप केलंय कळना असं झालं... आता वाटत कसली पण द्या पण मला पोरगी द्या... म्हणलं आपल्यागत गरीबाची करावी तर तिला कुठं पायजे ह्यो गरीब... खरंतर कुठल्याच पोरीला नको असतो गरीब.. आयुष्यभर गरिबीत काढल्यावर मोठं घर पायजे आसत तिला..पण मग आम्ही जायचं कुठं... फुकट हेलपाटा झाला का काय आस वाटतं... एका ठिकाणी नाव नोंदवल आन गेलो मेळाव्याला.. बघून व्हायचं बरं वाटलं की आपण एकटाच न्हाय चार पाचशे आपल्यागत हाईत... पण ते बरं वाटनं लय येळ राहील न्हाय.. इचार आला आज इतक्या पोरांची लग्न राहिल्यात... त्यांनी कुठं जायचं..?

मामानं पाठच फिरवली, आत्यान पोरगी उजवली, कुणी प्रेमात पडलं तर कुणी नेमात नाय बसला म्हणून सोडल... सर्गात जोड्या बनत्यात म्हण मग ह्या जोड्या इसकटल्या कश्या... चांगलं असणं, जीव लावणं, आयुष्याला जाणं महत्वाच राहयलंच न्हाय... राहिलंय ते फकस्त घर आन पैसा.. तेवढीच अपेक्षा मग उभा जल्म कसा का जायना...!

यळ हुती तवा कुणाला तरी गळ घातली पायजे हुती का? का एखादीच्या रोज मागं मागं करून पदरात पाडायला पायजे हुती... पण मागं लागून पटल्याल्या पोरी लग्नाच्या येळी आपल्या मागं कवाच उभ्या राहत न्हायत हे बी खरं...! प्रेम कुणावरबी करतील पण लगीन.. आहा... अजिबात न्हाय..! तवा सगळंच बघायच आसत...!

कुणी म्हणतं पोरीचं न्हायत... पोरी गेल्या कुठं? कुणी पोटात संपवल्या...? शेतकरी नगो कारण शेतीचा भरवसा न्हाय... कुणी जमिनी नासवल्या? लगीन लगीन करून आयुष्य निघून जाईल का? लगीन न्हाय झालं, म्हणून जीव देणारा मी न्ह्याय पण लगीन न्हाय झालं तर जीव जगवायचा तरी कशासाठी...?

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकचे लेखक - दिग्दर्शक आहेत)

loading image
go to top