Mumbai Chawl
Mumbai ChawlSakal

पोरगं आहे म्हमईला!

गणपतबुवाचं पोरग ममईला जाणार म्हणून समदं गाव येशीपोतर सोडायला आलं हुत... इज तयार करनारं धरण झालं बुडाजवळ पण गावाचं अजून काय लोड शेडिंग संपलं नव्हतं...

गणपतबुवाचं पोरग ममईला जाणार म्हणून समदं गाव येशीपोतर सोडायला आलं हुत... इज तयार करनारं धरण झालं बुडाजवळ पण गावाचं अजून काय लोड शेडिंग संपलं नव्हतं... त्यात पोरग डोंगर उतरून पलिकडच्या गावाला जाऊन शाळा शिकलं हुतं...आता लगीन करून बायकूला घिवून मुंबईला निगालं हुतं.. प्रभादेवीच्या कामगार नगरात भाड्यानं एक खुली घेतली हुती... चाळीतच धा-बाय-धाची खोली व्हती पण पोरानं म्हमईत खोली घेतली ह्यातच गावाला मोठेपणा हुता... बायकूसुदा चार बुक शिकल्याली किली हुती...दोघ राजा - राणी जीवाची ममई करतील म्हणून बापान मोठ्या तोऱ्यांन घरातलं धान्य पोराच्या गाठीला बांधून दिल.. गावाच्या वर असल्याला रस्त्यावर गावातल्याच माणसाचा दुधाचा टेम्पो उभा हुता... सकाळच्या पारी उठून सगळं आवरून बिऱ्हाड निघालं हुत, तरी गावकरी जमली त्याला सोडायला... गावाकडं खोकल्याचा आवाज आला तरी माणूस धावून येतो तिकडं शहरात बंद घराआड मेला तरी खबर हुत न्हाय...दोघांनी आयबापाच्या पायाला आन मग डोळ्याखालच्या पाण्याला हात लावला आन पाठ फिरवली ...टेम्पोतल्या माणसांनी दोघांसानी वर घेतलं...धुरळा उडवत टेम्पो गणपतीबुवाच्या डोळ्यातल्या पाण्याबरोबर अंधुक होतं नजरआड झाला...

गणपतबुवानं कारभारणीला घिवून घरचा रस्ता धरला... ममईसनं कुणी आलं म्हजी पोराची खबरबात कळायची... एक बारका फोन दिला हुता त्याला... पवाळीच्या रानातल्या मोटया जांभ्या दगडावर उभ राहील कि वायचं दोन कांडया याच्या... मग राती आट साडे आट वाजलं की जेवणं खावण उरकून तिकडं जायचं... कारभारणीला घिवून डोक्यावर एक बॅटरी लावून अंधारातन वाट काढत जायचं, हळू हळू... राती रानात माकडामाग गेल्याली माणसं इचारायची... "पोराला फोन करायला व्हय..." हो म्हणतच गणपती बुवा पुढं जायचं... दिवभर रानात असूनबी कवा पोराला कामात ताप नगो म्हणून फोन लावायचं न्हाय... मुरडाला गुरवारच्या बाजारला गेलं कि फोनात पैसे टाकून आणायचं... सकाळी जातानाच मालुशीत राशनला राकेलसाठी लायन लावून ठेवायच... पोराचं नाव तिकडं नसल्यामुळं त्याला काय राकेल मिळायचं न्हाय... मग बाजार झाला की त्ये भरल्यालं कॅन निवून ममईच्या गाडीत ठेवायचं... डायव्हरला च्या - पाण्याला चार पैसे हातावर ठिवलं म्हंजी मग त्यो पोराकडं सारं पोहचवायचा...

कवा बी फोन केला तरी पोरगा कायतरी संपलंय म्हणून सांगायचा...आपल्या पोराला आपुन असताना कायतरी कमी पडतंय ह्या इचारानं रातभर झोप यायची न्हाय... पोराला खोली भाड्यानं घ्याची तवा धा हाजार गणपत बुवानं त्याच्या हातावर ठेवलं हुत...एका पोरांसाठी दुसरी दोन पोर दिल्यागत त्यादिशी गणपत बुवाला झालं...पर मुलकात पोरगं बायकू घिवून राहतंय म्हणल्यावर बापाच्या जीवाला घोर लागायचंच...तरी डाळ तांदूळ, सगळं सगळं अगदी जमलं तर गणपत बुवा पोहचवायचं... कुणी ममईला जाणार दिसलं की त्याज्या हातापाया पडून कायतरी पण द्याचंच... एक दिशी सद्या रानात गुरं चारताना म्हणला... ‘‘ तसं नव्ह बुवा पोरग्याला एवढं देतायच नुसतं पोरग कवा काय चार पैसे धाडत का न्हाय..?

त्याच्यावर बुवा म्हणलं ‘‘आपल्या जीवात, जीव हाय तवर आपुन द्याचं, पुन्हा त्यालाबी आपल्या जाग्यावर याचंच हाय की... त्यानं त्याच्या पोराचं केलं तरी बास झालं की...’’ आपला उभा जन्म असतोच कुणासाठी, आता इस गेलं अन धा राह्यलं..." तो पुढं म्हणाला ‘‘ एकदा पोरगं सुराला लागलं कि काळजी मिटली... आपून आपलं डोळ मिटायला मोकळं..."

आसं म्हणतच दुसऱयाच्या वावरात घुसणाऱ्या म्हशीला माघारी हाणायला बुवा पळालं...

सद्या पटदिशी म्हणला... खावद्या कि चार घास खाल्लं तर... त्याच्यावर बुवा मागं फिरून म्हणलं.. ‘‘ इमानाच चार काय धा खावू दे पण कुणाच्या बेमानीचा रुपया नगो...!’’ पुन्हा लय दिस पोराची खबरबात न्हाय... फोनबी लागला न्हाय... लागला तरी उचलला न्हाय... पोरग कामात हायं म्हजी सुराला लागलं आस म्हणून बुवा निवांत झालं... आन एक दिवस डोळं मिटलं... पण चेहरा पडल्याला नव्हता हसरा हुता... गावातली माणसं गोळा झाली, कुणीतरी लगीच पोराला फोन लावला.. पोरगा अग्नीला जमणार न्हाय मातीला यीन म्हणला...!

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक-दिग्दर्शक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com