esakal | शाळा लय शिकवती!
sakal

बोलून बातमी शोधा

Education

शाळा लय शिकवती!

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

जांभूळवाडीत एका दोस्ताकडं कामं हुतं म्हणून आलो हुतो... बघितलं तर तिथं रस्त्याचं कामं चालू हुतं... आधीची पाऊल वाट खनून आजूबाजूची वावर आत घिवून रस्ता रुंद करायचं कामं सुरू हुतं... सगळीकडं नुसता धुरळा उडाला हुता... कुठनं तरी बाहेर गावातनं आलेली माणसं तिथं कामं करत हुती... मळकीच पण भरजरी कपडे नेसलेल्या बाया, कानात मोठाली डूल, गळ्यात लोढना बांधावा तसा बांधलेला साडी इतकाच भरजरी हार...ही मोठाली घम्याली उचलताना त्यांचा होणारा आवाज लक्ष वडीत हुता...! बायका भरून द्याला अन् गडी माणसं रस्त्यावर आणून वतायला हुती... सगळ्यांच्या टू व्हीलर थोडा वेळ थांबवल्या हुत्या, मोठ्या गाड्या आधीच दूर उभ्या केल्या हुत्या... उभ राहून मी सगळं न्याहळत हुतो... तिथल्या माणसाला भेटून एकदा शिकवणी क्लास सुरू करावा म्हणीत हुतो... धुरळा व्हायचं कमी झालं आन् रस्त्याला लागत दोन्ही झाडाला बांधल्याला झोपाळा नजरेला पडला...

त्या झोपाळ्यातून बाळ रडायचा आवाज हलकाच आला म्हणून खाली उतरून गेलो... तसा ह्यो आवाज नवा नव्हता, पण अशा दोन झोपाळ्यांत दोन बाळं दिसली... सोबत थोडा कळतेपणा असलेली एक पोरगी आणि पोरगा दोरीनं त्या बाळाला झोका देत होता... अजून पुढे जाताच मला आणखी पोर रस्त्यावर कामं करताना दिसली... त्यातली काय काय तर दगड फोडत हुती... अंगावर फक्त एक चड्डी आन् हातात मोठा हातोडा हुता.. अंगात आसल नसलं तेवढा जीव खाऊन पोर दगडावर हाणत हुती...

खरं म्हंजी जाता - येता अशी लय पोर मी बघितली हुती... त्यांना पर्याय न्हाय आस वाटायचं... पण आता माझ्याकडं शिक्षकाची डिग्री काय आली मला वाटायला लागलं जग सुदरलं पायजेल...

थोड्या टायमानं त्यांचं कामं थांबलं, गाड्या पुढं निघाल्या, तसं रस्त्याबर मनात इचार पळू लागलं... नोकरीसाठी किती हेलपाट घातलं... माझ्यागत किती तरी डी.एड, बी.एड पोरं पडल्यात... कुणीतरी कंत्राटी शिक्षक हाय, तर कुणी प्रायव्हेट क्लास काडून बसलंय... कुणालाच मनासारखं काम करायला मिळना... स्पर्धा वाढली तसं शिक्षणाचा बाजार झाला हुता...

ही डिग्री घेताना मनात उमेद व्हती, गोर गरीब कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची पोर शिकली पायजेत, पण ही रस्त्यावरची पोर कुठल्या शाळेत जात असत्याल... काय शिकत असत्यालं आन् न्हायचं शिकली तर... पुन्हा हेच खोर आन् टिकावं ह्यांच्या हाती यिल.. मग जगाच्या स्पर्धेत ह्यांचा टिकावं कसा लागलं...? इचारानी डोस्क बधिर झालं... कायतरी करायला पायजे म्हणलं... मनातल्या मनात सरकार अन् यवस्थेला चार शिव्या घालून झाल्या कारण त्याच्या पेक्षा सोप्पं कायचं नसतं.. मग अवघड कामं करायला आपलं सगळं पणाला लावणार कोण... डिग्री घ्याला, घातलेलं पैसं आधी काढायचं, हे बापच आपल्याला सांगत असतो.. अशावेळी ही समाजसेवा आपल्याला परवडणारी नव्हती, पण मन राहत नव्हतं... आतून कसंतरीच झालं हुतं... दोन येळच्या जेवणाची आबाळ असली की शिक्षण महत्त्वाचं राहत न्हाय, पण शिक्षण आसल तर ती आबाळ कवाच हुनार न्हाय ह्ये बारा आणे खरं हुत...

रात्रीच्या एक वाजता दीप्याला फोन लावला... झोपतच दचकून त्यो काय झालं म्हणला...! म्हणलं आपल्याला शाळा सुरू करायची हाय.. त्यज्या डोसक्यात काय ट्यूब पिटली न्हाय... पुन्हा सकाळी त्याज्या सोबत डी.एड च्या बॅचला असणाऱ्या अजून दोघांना बोलावलं... त्यांनी पगारपाणी काय...? शाळेचा आपल्याला काय फायदा..? असा सवाल केला... पण दिप्या म्हणला.. डिग्री महत्त्वाची न्हाय, ती का घितली ह्ये महत्त्वाच हाय... भटक्या पोरांसाठी फिरती शाळा काढायचं ठरलं... एक दोस्ताचा ‘छोटा हाथी’ डिझेल टाकायच्या वायद्यावर घेतला... त्यात मागून ओपन करून सगळी यवस्था किली, फळा-फलक सगळं लावून घेतलं... दिवसभर फिरलो, तवा एक पोरगं शाळेला आलं...त्यानं मनापासनं पाटी गिरवली... चार दोन दिवस माश्या मारल्यावर पाचव्या दिवशी आजून एक मुलगी येऊ लागली, हळूहळू शाळा सुरू झाली.

... पोरं मनापासनं शिकू लागली... त्यांचा तळ पडलं तिथं शाळा फिरू लागली... घरनं इरोध ठरल्याला हुता... शिवाय आर्थिक चणचण वाटायला लागली... रोज गाडी फुकट कोण देणार हुतं, आन् एवढा यळ दिवून हाताशी काही नव्हतं, तरी आम्ही मागं सरायचं न्हाय म्हणलं... फेसबुक वर सगळ्या शाळेचा एक लाइव्ह विडिओ केला. आम्ही कशी शाळा चालवतो ते दोस्त मंडळींनी पाहिली, आन् मदतीचा ओघ सुरू झाला... देशातून देशाबाहेरनं पैसं यायला लागलं... आता आम्ही जेमतेम पगारावर शिक्षक नेमल आणि अजून गाडी वर शाळा तयार केल्या... आता आपल्या चार शाळा हायत... कशाची कमी न्हाय.. सगळीकडे ह्यो उपक्रम गाजतूय आन् महत्त्वाचं पोटा-पाण्याचा प्रश्‍न सुटला हुता आमच्या आणि ह्या पोरांच्या सुद्धा.. शाळा लय शिकवती. फक्त पोरास्नी न्हाय शिक्षकाला सुदा...

स्वतःची शाळा आसंल आसं डिग्री घेताना वाटलं नव्हतं, डिग्री कशासाठी घितली असा इचार केला, की आज समाधानाची झोप यत हुती...