esakal | फी त्या साळंची...
sakal

बोलून बातमी शोधा

School

फी त्या साळंची...

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

आठवीतून कसंबसं पास होऊन नववीला गेलो... शाळा म्हणलं की माज्या अंगावर काटाच याचा... कांबळे मास्तर गुरागत मारायचं.. तसा मार खाऊन मी बी निबार झालो हुतो.. मला तरी कुटं काय फरक पडत हुता म्हणा... आदल्या दिवशी दुपारीच पळून गेल्यामुळं प्रार्थनेला निबर मार बसायचा... पीटीला चोकाकर सर वल्या फोकनं हाणायचं... सगळ्या शाळंपुढं मार खायाला लागायचा... म्हणून प्रार्थना संपली की हळूच लायनीत शिरायचं... तवा वर्गशिक्षक हुत्या पाटील मॅडम... गावातल्याना मी हायस्कुलात कसा गेलो ह्याचंच आप्रूप वाटायचं... त्यांच्या मते मी पाचवीसुद्धा पास हुयाच्या लायकीचा नव्हतो... उगाच बापाचा पैसा फुकट घालवत हुतो... आता बापाकडं तरी कितीसा पैसा हुता म्हणा... आज जेवून हात धुतला की उद्याचा इचार डोसक्यात याचा.. पाटील मॅडम रोज म्हणायच्या उद्या फी भरली न्हाय तर शाळेत बसू देणार न्हाय आन् रोज मी ते आयकून बापाच्या मागं लगायचो तवा त्यो बी उद्या कायबी करून देतो आसं म्हणायचा... मला दोघांचबी खरं वाटायचं... पण ना बाप कधी पैसे आणायचा, आन् ना कधी मॅडम वर्गाबाहेर काढायची... असं करता करता अर्ध वर्ष सरलं हुत... मला वाटायचं कवा एकदा शाळा संपून मी कामा धंद्याला लागतूय... कुणी इचारणार नगो, आण कुणी आडिवणार नको...

बगता बगता नववीची परीक्षा आली... मॅडम म्हणाली आता परीक्षेची फी भरली न्हाय तर परीक्षेला बसू देणार न्हाय... आन यात कुणाची हयगय हुनार न्हाय... मला बरंच हुत.. परीक्षा न्हाय, म्हंजी अब्यास न्हाय, आन अब्यास न्हाय म्हजी मज्जा हाय... बापानं न्हाय दिल पैसे, की पैसे दिलं न्हाय म्हणून माजी परीक्षा राह्यली आसं सांगून शाळा तरी सोडता यील... बापाच्या कानावर घातलं त्येनं नुसतं आयकून घेतलं... माज्याबरंच्या दिन्या आन तुक्यानं सुदा फि भरली... परीक्षा जवळ आली तस मॅडम अभ्यासावर जोर द्यायला लागली... वर्गातलं कुणी नापास व्हायला नगो हुत...

आता त्येनी घरी आमच्या सारक्या पोरांसाठी एक क्लास सुरु केला... नाइलाजानं त्या क्लासला बसावं लागायचं... मॅडम लय मनापासन शिकवायची.. तिज्या क्लास मधलं कुणी नापास झालं नव्हतं आजवर... एक दोन दिवस क्लासला जायला लागलो... म्हणलं आपल्यासाठी एवढं करत्यात आपुन जाऊन बसू तरी नुसतं... त्यांच्या घराच्या आतल्या खोलीतन एका पोराच्या वरडण्याचा आवाज याचा... एक दिवस त्यो पडला म्हणून पोरांसकट मॅडम सगळी आत गेलो... तर एक आमच्याच वयाचं पण एकदम विशेष पोरग तिथं हुत... त्याज सगळं करायला एक बाई हुती... त्याला धड बोलता यायचं न्हाय नं, न काय करता याचं ... नवरा बायको रोज कामाला जायचं तवर घरी ही बाई त्याला सांभाळायची... मॅडम म्हणाल्या दोघ शिक्षक असून पोराला शिकवू शकत न्हाय.. कारण ते शिकू शकत न्हाय... म्हणून आमचं पोरग तुमच्यात बघतो.. तुम्ही शिकला की आमचा उर भरून येतो..त्या दिवसापासन रोज मनापासन क्लास पुरा केला... अभ्यासात मन लागलं...आजवर नव्हतं वाचलं ते सगळं वाचून काढलं... यळ मिळाला की मॅडम च्या घरी जाऊन त्या पोराबर खेळायला लागलो... लईच मज्जा यायला लागली... एवढं शिकायला कवाच आवडलं नव्हतं... आता शाळेतन पळून जात नव्हतो... सकाळी प्रार्थनेला थांबायला लागलो...मागल्या बेंचवरनं पुढल्या बेंचवर आलो...

परीक्षा जवळ आली पण फी काय भरली नव्हती... बापाच्या रोज मागं लागलो पण पैसा कायं यत नव्हता... काय करावं कळत नव्हतं... आधी परीक्षा द्याची न्हाय म्हणून बरं वाटलं हुत पण आता मला सगळं यायला लागलं हुत... वाटलं मॅडम च्या मनात हाय तस आपुन पास हून शिकून दाखवायचं... पण फी भरायची कशी? आन कुटणं... काय कामं पण मिळत नव्हतं... बारक्या पोरांनी कामं करायच न्हाय आसा कायदा नवीन आला हुता..कायचं सुचत नव्हतं... मॅडमनी हॉल तिकीट द्यायला सुरवात केली.. सगळी नाव घितली पण माज नाव काय आलं न्हाय... सगळी पोर अब्यासाला लागली मला समजलं आपल्याला यंदा परीक्षा देता यनार न्हाय.. तास संपला मॅडम निघून गेल्या... पुढचा तास सुरु झाला पण माझं मन लागत नव्हतं.. एवढ्यात शिपाई आला, मॅडमनी स्टाफरूम मधी बोलवलं हुत...

बाहेरूनच हात पुढं करून आत येऊ का इचारलं... त्या हो म्हणाल्या... मी जाऊन कोपऱ्यात उभा राहिलो... मॅडमनी हॉल तिकीट हातावर ठेवलं... मी फी कवाच भरली हुती म्हणाल्या... तुझ्याकडन होतंय का बघायचं होत, पण नाही झालं तरी तुझी परीक्षा चुकणार नव्हती...कुणाला सांगू नकोस की मी भरली म्हणून ... जा आता...

माझ्या डोळ्यात पाणी उभं राहीलं... तसाच स्टाफ रूमच्या बाहेर पडलो... पुन्हा अभ्यासाला लागलो... त्या वर्षी वर्गात दुसरा आलो... पुढं जाऊन मी चांगल्या पदावर कामाला लागलो...सगळ्यात आधी पेढे मॅडम ला दिले... त्यांना म्हणलं यापुढं जोवर मला जमलं तवर तुमच्या पूर्ण वर्गाची फी मी भरणार हाय...त्यानंतर दहा एक वर्षात मॅडम आणि सर दोघं देवाघरी गेल... तरीबी आजबी त्यांच्या वर्गाची फी मी भरतो आन त्याचा पोरगा आता माझा भाऊ म्हणून सोबत राहतो... तरीबी मॅडमनी भरलंल्या त्या एका वर्षाच्या परीक्षेची फी मी परत करू शकेन एवढा मोठा नाय होऊ शकलो ...!

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यूब’वरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)

loading image
go to top