
गावाकडच्या गोष्टी
सकाळच्या पारी पयल्या एसटीनं पाटलाचं गाव गाठलं...पाटील नुकतंच अंगूळ - खाणं उरकून बाहेर जोत्यावर बसला हुतं..मी नेहमी परमान उंबऱ्याच्या बाहेरूनच नमस्कार केला आन तिथंच च्या आला...
सकाळच्या पारी पयल्या एसटीनं पाटलाचं गाव गाठलं...पाटील नुकतंच अंगूळ - खाणं उरकून बाहेर जोत्यावर बसला हुतं.. मी नेहमी परमान उंबऱ्याच्या बाहेरूनच नमस्कार केला आन तिथंच च्या आला... पाटील म्हणालं ‘यंदा तमाशा जोरात झाला पायजे दहिवडीकर’ मी म्हणलं ‘आव यंदा असला फर्मास वग लिव्हलाय किनाय, की माणसं दुकानं उठली तरी जागची हलायची न्हाईत..., पाव्हणं घरी बोंबाललं, तरी माणूस घरला जायचा न्हाय बघा...''
पाटील म्हणालं हे झालं म्हाताऱ्या कोताऱ्याचं, तरण्या पोरांच काय..? न्हाय म्हंजी यंदा पोरी चांगल्या हायत कां, न्हायतर मागल्या वर्षीगत सगळ्या काळ्या कुळया म्हशी आणू नगासा...'' आस म्हणून पाटील मोठ्यांदा हासलं.. मीही नकळत त्येनंच्याबर हसलो खरा, पण आतून काळजाला घर पडली... चांगल्या पोरी म्हंजी गोऱ्यापान देखण्या पोरी...कलाकार म्हणून सगळी माझी लेकरं... पोटाची भूक साऱ्यासनीच आसती.. काळ्या पोरींनी जायाच कुठं... तरीबी सुपारी सोडून चालणार नव्हतं.. मी हो म्हणलो ''यंदा चांगल्या हायत पोरी...''
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
काळू - बाळू, रघुवीर खेडकर हे आमचे आदर्श. ह्यांच्या तमाशाला कवाच बाई बघून माणसानी गर्दी किली न्हाय...नुसती बतावणी, आन वग बघायला पंचक्रोशीतनं माणसांची झुंबड उडायची... पण आता जमाना बदलाय....! बायकांच्या अदा बघून फिदा व्हायला पोर पारं जवळ उभी राहत्यात... पैस दावत्यात, व्हिडिवो काढत्यात... नायच सहन झालं, तर एकादीचा हातबी धरत्यात... पब्लिक हाय वो, त्ये सहन करावंच लागत... मालकाचं मन सांभाळायला बाईला आन बाईच्या जीवावर पोट भरायला फड मालकाला...सहन करावच लागत...!
पंचायतीत मिटिंग झाली, सुपारी धरली अवघ्या २२ हजाराला...टेम्पोचं भाड, वाजीवणारी पोरं, वगाचं कलावंत, बतावणीची माणसं, आन सगळ्यात महत्वाचं, पोरींनी यंदा नाईट वाढवून मागितल्याली...सातशेच्या खाली न्हायचं म्हणल्या... सगळा हिशोब केला तर हाता- तोंडाची गाठ पडत नव्हती... पण सुपारी जाऊ द्याची नव्हती...
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मग उचलला इडा आन लागलो वाटला... दोन एक हाजार इसारत आली हुती... ढोलकीला शाई चढवली, चांगला पटकां घेतला, आन दीपालीबाईसाठी जरीच लुगडं घेतलं... तमाशाला दोघांचं नाव लागतं...तमाशा सुरू असताना चार आठ महिनं एकातच राह्याचं...तिनं कवा कुठल्या वर्षी दुसरा तमाशा धरला न्हाय कां, मला एकलं सोडल न्हाय... दिलं त्या पैशात काम करती, सुपारी धरायची असली तरी जोडीनं यती...!
बायकुला आन पोराला वाईचं खायला घिवून घर गाठलं...घरी बायकूंन कर्जाचं कॅसेट लावलं... म्हणलं यंदा कायबी करून फिडू कर्ज.. सुपारी चांगली घावंल... ह्ये आसं दर वर्षी तिला सांगतो.. अनं याज तेवढं भरून आजच मरान उद्यावर ढकलतो...!
दीपालीला तारीख धरल्याच कळवलं, तीन सगळ्या पोरी गोळा केल्या...मिबी वाजप मंडळी, वगाची म्हातारी आन टेम्पो वाल्याला तारीख दिली...
तालमीला समदी टायमात आली... यंदा वग जोरात झाला हुता... पोरींनी सुदा नाचायची चांगली प्रॅक्टिस किली हुती...दीपाली म्हणली, ‘तुम्ही नवी ढोलकी घ्या, फड मोठा करू, तुमचं घर बांधू आन यंदा कर्ज फिडूनच टाकू..!’
ठरलेल्या तारखेला गावात आलो सकाळी ११ वाजता तमाशा उभा राहिला... पोरांनी गवळण सुद्धा नीट हू दिली न्हाय ‘‘गाणी लावा म्हणली.. पब्लिक हाय, त्येंचं गाव म्हणल्यावर हुकूम सुद्धा त्येनंचाच चालायचा... पोरी नाचायला लागल्या...एक दोन टाळकी ताल धरायला लागली...दोघांनी दारू ढोसल्याली हुती... आमच्यातल्या रुपाला डोळ मारायला लागली... तिनंबी दाद म्हणून माघारी डोळा मारला... तशी पोरांची हिम्मत वाढली... तिज्या अदांवर पोर फिदा झाली हुती... आजून जवळ स्टेजला खिटून उभी राहिली...हाताने नको तसलं इशारं करू लागली... मी खुणवून तिला आत धाडली अंन दुसरीला बोलावलं... तसं पोरांनी कालवा केला.. तीच पायजे म्हणली.. न्हायतर बंद करा...!
ह्ये आसं प्रसंग जत्रा म्हणलं की घडायचं, आम्ही जत्रा कमिटीच्या कानावर घातलं पण त्येसनी सुद्धा ही पोर आयकली न्हाईत... मग रुपाला पुन्हा बाहेर बोलवली... रुपाला बघून एकजण स्टेज वर चढला... तिच्या सोबत नाचता नाचता अंगाला खेटू लागला... तिच्या अंगाला हात लावू लागला... माझ्या हातातली ढोलकी ठेवली आन् दादाच्या पाया पडलो पण दादा ऐकायला तयार न्हाय... मग माग सरून आशी सानकन लावली, दादा स्टेजवरनं खाली दोन उड्या खाऊन पडला...! दुसरा ह्ये बघूनच पळाला... बराच वेळ सगळे शांत होते... पोरांनी दादाला घरी नेला... तमाशा यवस्थित पार पडला.. लोकांसनी वग आवडला... कमिटीने पैस चार दोन हजार वाढवून दिल...
पयलाच डाव चांगला रंगला हुता...सगळी खूष हुती आन महत्वाचं,आजच्या माझ्या हिमतीवर पोरींसनी हायसं वाटलं हुत...! कसंय तमाशा चालवायचा म्हजी, अंगावर आल्याली पोर शिंगावर सुदा घ्याला आली पायजेत...!
सगळं सामान आवरून टेम्पोत भरलं हुत, शिळी भाकरी आन पाहुण्यांकडनं राहिल्यालं कालवण खाऊन सगळी फडातच झोपलो हुतो...
रातच्याला डोळा लागलाच हुता की मोठ्यानं कुणीतरी वरडलं...आग लागली म्हणून... बाहेर आगीचा आगडोंब उसळल्याला.. पाणी टाकून इजवायच्या बाहेरचं हुत समंद...भरल्या डोळ्यांनं आधी माणसं बाहेर काढली... आगीपासन लांब जाऊन, उभा फड जळताना बघीत हुतो...
मोठा फड, नवं घर, डोकयावरचं फेडलेलं कर्ज...नवीकोरी ढोलकी सगळी सपनं डोळ्या देखत जळून ‘खाक’ झाली हुती... मगाशी कौतुक वाटणाऱ्या माझ्या फडाची आता फक्त ''राख'' हुती...
(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यब’ वरील बेवमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)
Edited By - Prashant Patil