किश्या खोत

नितीन पवार koripati.production@gmail.com
Sunday, 24 January 2021

गावाकडच्या गोष्टी 
किश्या आन मी शाळंपासनं दोस्त...त्याच्या घराच्या भित्तीला लागून माझी भित्त...समदं संगतींन केलं सणवार, धावं- तेराव...! प्रसंग कसला बी आसो, निभावून नेला...पेरणी, काढनीला बी कवा दोन औत जुपली न्हायत, का वजी आणायला  दोन बैलगाड्या..एकाचंच समंद...!

किश्या आन मी शाळंपासनं दोस्त...त्याच्या घराच्या भित्तीला लागून माझी भित्त...समदं संगतींन केलं सणवार, धावं- तेराव...! प्रसंग कसला बी आसो, निभावून नेला...पेरणी, काढनीला बी कवा दोन औत जुपली न्हायत, का वजी आणायला  दोन बैलगाड्या..एकाचंच समंद...!

खोत म्हणजे गावचा रुबाब,काय तोऱ्यात चालायचा, शेतीवाडीचा दरारा....नजर कायम समोर, झुकती कवाच न्हाय...ह्यो आसा मिशीवर ताव द्यायचा... गावातली जुनी जाणती माणसं आसू न्हायतर तरणी पोर, किश्याला नमस्कार केल्या शिवाय कुणी पुढं जायचं न्हाय... किश्या सुद्धा अनेकांच्या आडीनडीला उपेगी पडायचा... कवा त्यानं पैशाचा माज केला न्हाय, का कुणाला दुखावलं न्हाय... देवाच्या दयेनं मिळालं आन त्यानं सुद्धा बापाच्या मायेनं संभाळलं सगळं...!
पण उतरती कळा लागली... पैसा, अडका गेला... वाडा गेला आनं साध्या मातीच्या घरात रहायची वेळ आली...तवर पोर मोठी झाली त्यास्नी हे मातीचं घरं काय जमल न्हाय...!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किश्या खोताला दोन पोरं हुती ...दुनीबी चांगली शिकली, शहरात गेली हुती ...शाळेला आस्ताना माझ्याच पोरांतनी खेळायला असायची...आता मात्र त्यांचं येणं व्हायचं न्हाय... तिकडं शेहरात म्हण, चांगल्या चार आकडी पगाराच्या नोकऱ्या हायत  दोघांसनी ...तिकडंच लगीन करून फ्लाट का काय घेतलं म्हण...

पडक्या  घराचा ''टुमदार बंगला'' झाला एवढाच काय तो पोरांनी केल्याला बदल...घराला बाहेरून कम्पाउंड आलं तसं त्यांच्या मनाला बी...! आता साखर मागायला, कालवन मागायला जायची सोय रायली न्हाय... गावात कुठला कार्यक्रम असला की बाहेरनं आवतांन द्याच...आत जायची कुणाची हिम्मत न्हाय झाली... किश्या खोतानं सिनेमातल्यागत कुत्री पाळल्याली, गेटपशी माणूस दिसला तरी आंगावर यायची...
पोरं जत्रा आन दिवाळी अशी वर्षातनं दोनदा याची... तेवढ़यासाठी हितं एवढा मोठा बंगला बांधला...आन ह्या बंगल्यात राहतं सुद्धा नाह्यत, का? तर अजून मुंबईतल्या खोलीचं हफ्त जायाचं हायत...त्यासाठी काम करत रहावं लागत...म्हंजी बंगला बांधायला गाव सोडून शहरात जायचं, कष्ट करायचं, आन पुन्हा कामातनं सुट्टी न्हाय म्हणत, त्यात रहायच बी नाय...

सप्तरंगमधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

किश्या अन म्हातारी पाच वर्ष हितं एकली राहिली... त्याला तरी काय, त्या बंगल्यात  करमतं हुतं व्है...पोराला सांगितलं आनि पोरानं नेलं की दोघांसनिबी मुंबयला...म्हणलं, मानल राव आशी असावी पोर...गावात तर किश्या खोताच्या पोरांचं उदारण द्यायला लागली माणसं...!
खालच्या आळीच्या चंद्याची आय मुंबईवरनं आल्याला सुनंकडं  बघत पोराला म्हणाली "बघ कस घर घेतलं की लगीच आयंबापाला नेलं मम्हयला... न्हायतर तुम्ही, हितचं मेलो तरी बघायचा न्हाय.."
एकदा मुंबईला किश्या खोताच्या घरी उतरलो तवा कळंल...पोरगा आन सून दोगंबी  कामावर जात्यात...किश्या खोत गळ्यात पडून ढसढसा रडला आन म्हणला " मी दिवसभर पोर सांभाळतो, आन कारभारीन् सयंपाक करती... पोराचं पाळनाघर आन कामवाली बाई दोन्हीचं पैसा वाचत्यात..."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किश्यानं पोराला मांडीवर घेऊन बसलेल्या खोतीनीला हाक मारून च्या करायला सांगितला...खोतीणींनं कसंबसं उठतं पोरगं किश्याकडं दिलं.. आन आत च्या करायला गीली... ती आता गेल्यापासून किश्या पोराला उगाचच खेळवायला लागला... माझ्याकडं बघेनसा झाला.. मलाही त्याच्याशी बोलायचं धीर होईना... दोघंही शांतपणे च्या ची  वाट बघायला लागलो... साखर अन् च्या - पावडरच्या डब्याचाच काय तो आवाज, बाकी घर शांत झालं हुतं...! मला त्या दिवशी पहिल्यांदा च्या गोड लागला न्हाय...तो जेवायला थांबतोस का ?  हे इचारायच्या आधी मी जिन्यातून खाली उतरता झालो...
भरल्या डोळ्यानी गावात परत आलो, गावाच्या वेशीलगत किश्याचा बंगला मात्र अजुन तसाच हाय बरंका, टुमदार...!
(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यब’ वरील बेवमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Pawar Writes about Village stories