esakal | गुरुजी आले आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

Education

गुरुजी आले आणि...

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

लगीन ठरल्यापास्नं फोनवर बोलायला सुरुवात झाली... आता सुपारी फुटल्याली हाय, त्यामुळं अडीवणारंबी कुणी नव्हतं... लय वाटायचं... आपलं आयबाप गरीब... कड्याकपाऱ्यांतनं चार-चार किलोमीटर रोज चालत जाऊन मी शाळा शिकली... सरकार बलवत्तर म्हणून पोरीस्नी कशालाच पैसं मोजावं लागत न्हाय... काय जानावं म्हणून आयबापानं कवा शाळा सोडवली न्हाय, का लग्नाचा रतीब लावला न्हाय... जवर मनाला वाटंल तवर शिक म्हणले... भांगलायला कुठं आय गेली म्हंजी बायका म्हणायच्या, "आगं तिज्याबरच्या पोरी लगीन हुन संसारात रमल्या... त्यास्नी आता पोरं हुत्याल आन् ती शाळंत जात्याल आन् हिजी आजून शाळा हुयना, आसली कसली शिकतीय म्हणायची..." आयबी त्यासनी म्हणायची, "ती काय शिकतीया ह्ये आपल्यास्नी कळत न्हाय म्हणून तर पोरीला शिकवायची हाय... उद्या तिजी पोरंबाळं काय शिकत्यात ह्ये तिला कळलं पाह्यजे आन् शिकीवताबी आलं पाह्यजेल..."

त्या राती आमी बारा वाजेस्तवर बोलत हुतो... स्वयंपाक यतो का... घरातली कामं यत्यात का, ह्ये समदं बोलणं लगीन ठरवायला माणसं आली तवाच बोलून झालं हुतं... मी थेट इचारलं, लगीन झाल्यावर मला कामाला जायचंय... त्यांनी लगीच हो म्हणून सांगितलं... त्या दिवशी मला वाटलं... लव्ह मॅरेज म्हंजीच सगळं नसतं... आसं ठरवून केल्याल्या लग्नातसुद्धा मनासारखं वागणारा आन् मनासारखं वागवणारा नवरा भेटू शकतो... ती रात इचारातच गेली...

बघता बघता डोक्‍यावर आक्षता पडल्या आन् मी त्या घरची सून झाली... दोन-चार महिनं घरबार कळायलाच गेलं म्हणून मीबी लय मनावर न्हाय घेतलं... पण घरातली पोरासाठी हट्ट धरायला लागली, मग मला वायच काळजी वाटली... मी त्यास्नी हलकंच म्हणलं... त्ये मला नुकरी करायची हाय... यावर, मग कर की, कुणी आडीवलंय... पण त्ये घरातली पोराबद्दल... यावर त्ये मला मधीच थांबवत म्हणले, "आगं मग, त्येंच्या जागी त्येंचं बराबरच हाय की... घरात लहानगं पोरगं न्हाय. मीच सगळ्यात थोरला आसल्यामुळं वाटतं त्यास्नी... पोरगं झाल्यावर काय कामधंद्याला जायचं न्हाय आसं कुणी म्हणलंय का... एक डिलिव्हरी हुन जाऊ दे म्हणले... आयुष्य पडलंय आन पुन्हा तुला कुणी आडीवणार न्हाय... मी हाय ना... यावर मी तिथंच थांबले... पुन्हा चार-सहा महिन्यांत गोड बातमी दिली... पोरगं लहान हुतं... मला आय हुयाचं सुख घ्यायचं हुतं... त्या सगळ्यात चार-दोन वर्षं गेली. आता पोरगं एकटं राहायला लागलं हुतं... मी जेवताना सासू, सासरं, हे आन् दीर आसताना मुद्दाम इषय काढला... यावर सासरं आपल्याला काय कमी हाय म्हणलं... सगळं यवस्थित भागतंय, मग सुनबाईच्या पैशाची काय गरज हाय... यावर मी म्हणलं, पैशासाठीच न्हाय फक्त माझं शिक्षण...

यावर सासू म्हटली, पोराला शिकीव की आता घरी... ती नुकरी मोटी आसतीय... तू बाहेर कामाला गेल्यावर पोराकडं कोण बघायचं... घरातलं काय, मी करीन समदं, पण पोरगं... ह्यांनीबी मी समजवतो आसं इशारा करून यळ मारून नेली... पुन्हा मी पोरात गुंतले... ह्यास्नी कायतरी करा म्हणले... तुम्ही लग्नाआधी म्हणला हुता की नुकरी करू देणार म्हणून... यावर मी प्रयत्न करतूय... हितं पोरास्नी नोकऱ्या न्हाईत आन् तुला कुटनं बगू म्हणाले... मला काय कळतच नव्हतं... आता लगीन झालंय. आता आपल्या शब्दाबाहेर जायची न्हाय... आपल्याला सुडून जगात तिला किंमत न्हाय, आसं त्यास्नी वाटत हुतं आन् त्येंच्यालेखी त्ये खरंबी हुतं... एकटी राहणं सोप्पं नव्हतं, ह्ये मला म्हायत हुतं आन् माझ्या नुकरीसाठी मी पोराचं नुकसान हु देणार नव्हते... काय करू कळत नव्हतं... लय इचार याचा मनात, पण लेकराकडं बगून हिम्मत हुयाची न्हाय...

आता ह्यो नुकरीचा इचार मनातून काडून टाकावा आन् आपल्या नशिबी आल्यालं आयुष्य चालावं असं वाटायला लागलं हुतं... माणसं बदलत न्हाईत, ती तशीच आसत्यात... आपल्याला वेळ आल्यावर कळतं एवढंच... एकेदिवशी ह्ये ज्या शाळेत क्लार्क हुते, त्या शाळेतलं मुख्याध्यापक घरी जेवायला आले... लय येळ माझ्याकडं बगून म्हणले... तू ती अनुजा ना गं... दहावी अ... मी लगेच हो म्हटलं... मलाही त्यांना बघून ओळखीचं आसल्यागत वाटलं हुतं, पण एवढं नीट बगितलं नव्हतं... लगीच त्ये बोलायला लागलं... आग हितं कशी तू? वर्गात सगळ्यात हुशार बरं का ही...! शिक्षकांच्या आधी हिला धडे म्हाईत आसायचं.... स्कॉलरशिप... विविध स्पर्धा... सगळ्यात पयला नंबर... तुला डॉक्‍टर व्हायचं हुतं ना गं... झालीस का मग... लग्न झालं म्हणजे, ह्यांचा एखादा मुलगा डॉक्‍टर असावा न्हाय का... यावर सगळे शांत हुते... गुरुजींच्यासुद्धा आपण काय बोललो हे लक्षात आलं...

दुसऱ्या दिवशी ह्ये किचनमधी आलं... माझ्या हातातलं काम काढून घेतलं... आन् मला म्हणलं... ह्यो फॉर्म भरा, डॉक्‍टरकीला अॅडमिशन घ्यायचंय तुम्हास्नी... मग मागं वळून बगितलं न्हाय...

पण वाटतं, गुरुजी आलं म्हणून ह्यास्नी वायट वाटलं, न्हायतर माझं आयुष्य पोराबाळांतच गेलं आसतं... पण आधी हो म्हणणारी माणसं पुन्हा न्हाई म्हणल्यावर कितीतरी पोरी हाय ह्यात सुख मानतं आसत्याल...

त्यास्नी आसं एखादं गुरुजी घावलं न्हाई तर...