जगाचा नकाशा

गुरुजी वर्गात शिकवत हुतं... जगाचा नकाशा लय मोठा हाय... जगात अमाप गुष्टी हायत... कोण चंद्रावर गेलंय, तर कुणी बिना डायव्हर च्या गाड्या बनवल्यात...
World Map
World MapSakal

गुरुजी वर्गात शिकवत हुतं... जगाचा नकाशा लय मोठा हाय... जगात अमाप गुष्टी हायत... कोण चंद्रावर गेलंय, तर कुणी बिना डायव्हर च्या गाड्या बनवल्यात... देशात सगळीकडं आता नवी रेल्वे चालती, त्यात दार लावली तरी गार हवा यती म्हणत्यात...तिथली घर वीस आनं चाळीस मजली इमारतीत असत्यात म्हण..! चकचकीत आसतं सगळं.. चोवीस तास लायट असती..

आमच्याकडं बारा तासबी नसती कवाकवा...घरं गेल्या किती पिढ्या गेल्या तरी तशीच हायत, मातीनं सारवलेली... आजून गावात एक सुदा टीव्ही न्हाय... मुंबईला कामाला असल्याला पोरांकडं मोबाईल हायत पण त्येला हितं आलं की रेंज नसती...

तिथं पावला पावलावर दुकान असत्यात आसं म्हणत्यात मुंबई वाली पोर. हितं साधं दळान दळून आणायचं म्हटलं की पाच मैल डोंगर चढून जायला लागत.. आम्ही धड तळालाबी न्हाय अन डोंगराला सुद्धा न्हाय... कोयनेच्या खोऱ्यात मेन रस्त्यापासनं पाच मैल आत सडा संपतो अन गाव लागत... सड्यावर पवनचक्या आल्या पण गावात रस्ता आला न्हाय... आमची माणसच कुणाला म्हाईत न्हायत.

हितं देश स्वतंत्र झाल्याच्या नोंदी न्हाईत का देशात सरकार बदलेलं कळत न्हाय.. कुणी बाहेरून येऊन सांगल तवाच कळतय... हित पिढ्यान पिढ्या शेती करत्यात माणस...

पावसाळ्यात भयानक पाऊस पडतो. माणसाला घरातन बाहेर येऊन देत न्हाय..!

हितल्या माणसाची पोटं खपाटीला गेल्याली...अर्ध्या फाटलेल्या चड्ड्या अन पैरण अंगात चढवून शिऱ्याआप्पा रोज रानाची वाट धरतो...डोक्यावर पोत्याची केल्याली ख्वाप... हातात काटी घिवून चालत म्हातारं...

देशानं प्रगती किली काय आन् देशावर संकट आलं काय त्याला गुरं चुकत नव्हती... आज एवढ्या वर्षानी एक वीज आंन शाळा सोडली तर इथलं कायचं बदललं नव्हतं...शिऱ्या आप्पा त्या दिवशी पावसाच्या सरीवर नेमका घावला अन चुलीपुढं बसून सुदा त्यला ताप भरला... गावातल्या गांवात माणसानी लय उपाय केल पण काय हुईल आस वाटतं नव्हतं... ताप वाढत चाल्याला..गावात माणूस मेल्याल जेवढं वायट वाटायचं न्हाय तेवढ आजारी पडलं की वाटायचं... कारण डालग्यात घालून त्या माणसाला पाच मैल डोक्यावरन डोंगर चढून न्यायचं माणसांच्या जीवावर याच...

शिऱ्याआपाच्या घरी माणसांची रांग लागली... सगळ्यांनी सगळं करून बघितलं शेवटी जास्त झालं म्हणून न्यायचं ठरल... रातीच्या अंधारात चिखलाचा आवाज यायला लागला... सगळं गाव धुक्यात हरवलं हुत... माणसं चपापली हुती... रस्ता जंगलाचा हुता कुटनं काय यील ह्येचा नेम नव्हता... माणसं जीव मुठीत घिवून चालत हुती.. तशी हत्यारं जवळ हुती, पण भ्या हुतंच... कसंबसं मेन रस्त्यापावतर आप्पाला आणलं.. पण आता हितनं गाडी मिळायची आवघड हुत... दोन तास वाट बघून एक दूध गाडी थांबली... त्याच्या मागच्या हौद्यात टाकायचं म्हणून आपासनी उचलल त्यांच्या अंगात जीव नव्हता... माणसं हाय अशी माघारी फिरली... गावात एकच कालवा झाला... रस्ता न्हाय म्हणून आजबी आमचा माणूस जातो.. जग चंद्रावर गेलंय पण त्या चंद्रावाल्या जगात आम्ही कुठं हाय...! जगाच्या नकाशात आमची जागा काय ?

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरी बेवमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com