ती अन्‌ शाळा .... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ती अन्‌ शाळा ....
ती अन्‌ शाळा ....

ती अन्‌ शाळा ....

sakal_logo
By
नितीन पवार koripati.production@gmail.com

गावात सातवीपोतर शाळा हुती.. सातवी पास झालं की पुढं तालुक्याच्या शाळेला जायला लागायचं... गावच्या शाळेत लय मजा केलीती... पण आता लोकाच्या गावात जायाचं म्हजी वायचं भ्या वाटायचं.. तरी आमी गावातली सगळी पोर गटून हुतो म्हणून तरी आधार हुता.. तशी तिथली पोर बाहेरगावच्या पोरांवर लईचं दादागिरी करायची हॆ आयकून हुतो... पहिल्याच दिशी बेंचवरनं भांडाण झालं... आमच्यातल्या मध्याला तिथली पोर बेंचवर बसायला घेत नव्हती.. मग आम्ही सगळी मदी पडलो तर बाहेर घावला की हाणणार म्हणली...शेवटी तिकुडची पोर गटली आन आम्हास्नी मागार घ्याला लागली...

मध्याला समजावून शेवटच्या बेंचवरती बशीवलं पण त्या दिशी ठिणगी पडली ती पडली.. मग सगळीकडं आपली पोर त्यास्नी आडगी लागायला लागली... मुद्दाम आपल्यातला मॉनिटर उबा केला.. त्यानंची पोर गटून असली तरी बाहेर गावची पोर त्यांना भिवून हुती.. सगळ्यांसनी जमवून मी एक मिटिंग घेतली

"आपल्याला गटून राहिलो तरच फायदा हाय सांगितलं.. त्येनंचा मॉनिटर झाला तर आपली नाव फळ्यावर आलीच म्हणून समजा.. "

यावर सगळ्यांनी मला मॉनिटर करायचं ठरवलं.. तस पोरांनी सरांकडं माझं नाव लावून धरलं आन मी मॉनिटर झालो... आता पोर निर्धास्त झाली हुती... कबड्डी खेळताना तालुका आणि भाग अश्या टीमा पडायला लागल्या.. भागातली पोर त्यांस्नी जड हुया लागली... हळू हळू ती आम्हास्नी टरकायला लागली... पण त्येनंच्यात राग कायम हुता...

एकदा पाण्याच्या टाकीवरं सगळ्यांनी मिळून मुद्दामच मदयाची खोड काढली आणि हाणायला सुरवात केली... आम्हासानी कळालं तसं आम्ही सगळी गटून गेलो.. घावंलं तशी पोर तुडवली... त्येनी दोनं दिलं तर आम्ही चार द्यायचो... सगळी शाळा बघत हुती... भागातल्या पोरांनी चांगलीच धुलाई केल्यामुळं त्येनची आब्रू गिली हुती... सरांनी सुद्धा त्यासनीच धारंवर धरलं हुत.. त्यामुळं आता घावंल तिथं ती आपल्यास्नी आडगी लागणार म्हायती हुत...

त्याच दरम्यान जिल्ह्याच्या शाळेला असणारी रसिका तालुक्याच्या शाळेत आली आन सगळा घोळ झाला... दिसायला आगदी गोरीपान आन अब्यासात सगळ्यात हुशार... बसं तवापसन शाळा लयच आवडायला लागली... मधल्या सुट्टीत बेंचवर हातांनं वाजवून ‘परदेसी परदेसी जाना नही.. गाणं मोठं मोठयांन म्हणायचो... ती नुसतीच हासायची... पुन्हा मागच्या बेंचवरन ऐकायला येत न्हाय म्हणून सरांसनी सांगून तिज्या बाजूच्या बेंचवर आलो... तास संपला की बेंचवर आडवं डोकं ठिवून नुसतं तिज्याकड बगत बसायचो... तिन बघितलं की नजर चोरायचो...

आता तिज्या लायक व्हायचं म्हणून जोरदार अब्यास सुरु केल्याला.. मला एवढा आब्यास करताना बघून घरातली बेसूद हुयाची बाकी हुती पण माजी सूद कुट हरपली हाय ह्ये त्यास्नी कळलं नव्हतं...

मग रोजं तिच्या वाटंवर उब राहयाला लागलो... ती कितीबी बोलली तरी तिचं नाव कवाच फळयावर लिव्हल न्हाय... पहिल्याच परीक्षेत तिजा पयला आन मजा दुसरा नंबर आला आन तिन एकदाच लाजून बघितलं... बसं त्या दिवशी पुढच कायचं आठवलं न्हाय...कुणाला किती मार्क पडली, कोण नापास झालं कायचं म्हायती न्हाय..

दुसऱ्याच दिवशी तिनं भूगोलची वही मागितली आन माझा इतिहासच बदलून टाकला... आता रोज हासन सुरु झालं.. तिज्यासाठी कब्बडी खेळणं आन मी जिंकलो कि तिनं टाळ्या पिटन सुरु झालं... ह्ये समदं तिला मला कळायच्या आधी वर्गाला कळलं हुत...

आन मग नगो त्येच झालं एक दिवशी स्टॅण्डवरच तालुक्यातल्या पोरांनी मला आडीवलं...आमच्या गावातल्या पोरीकडं बघायचं न्हाय अशी धमकी दिली... यावर मी बघनारं, काय करायच ते करा आस म्हणून मोकळं झालो.. त्या दिवशी एवढी कुटनं हिंम्मत आली कुणास ठावक पण, मग मला भर स्टॅण्डवर लय हाणला... हित भागातली पोर नसल्यामुळं गावातल्या पोरास्नी सुद्धा लय हाणल...आम्ही फुटल्याली तोंड आन फाटल्याली कापड घिवून एसटीन घराकडं गेलो... मोट्या पोरास्नी घिवून शाळेत आलो... मग त्यांनीबी गावातली मोटी पोर बोलीवली... आमच्यामुळं त्येनंच्यात जोरात भांडण झाली..पार पोलिसात केस गिली... कशामुळं भांडण झाली काय तक्रार हुती आस इचारलं.. तवा तिकूडच्या पोरांनी मी रसिकाची छेड काढली म्हणून सांगितलं.. रसिकाला स्टेशनात बोलीवलं.. सगळ्या पोरांदेखत इचारलं "ह्यान तुझी छेड काढली का? रसिकान माझ्याकडं बघितलं...त्या पोरांकड बघितलं आन स्वतःच्या बापाकडं बघितलं... बापाचं डोळ पाण्यानं भरलं हुत.. तिनं हो म्हणून मान हालीवली आन दरवाज्यातनं बाहेर पडली... पोलिसांनी लागलीच तुडवायला सुरवात किली.. मला कायचं दिसत नव्हतं..हाणल्यालं दुकत नव्हतं.. कुणाचा आवाज आयकू यत नव्हता.. नुसती रसिका पाठमोरी, डोळ्या समोरन जात नव्हती...

आता वावराच्या बांधावरन हॆ तुम्हास्नी सांगताना, डोळ वायचं मिटलं तरी तीच दिसती त्या पोलीस स्टेशनातल्या पायऱ्या उतरताना... ती आता शिकून चांगली अधिकारी हून आली म्हणं त्याच पुलिस स्टेशनात जिथं परवा हाजरी लावायला गेलो हुतो.. कारण मी पोरीची छेड काढल्याली केस अजूनबी मिटली न्हाय... पण शाळा तिवढी सुटली...कायमची...!

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

loading image
go to top