

जपानमधील टोकियो ते हिरोशिमा या शांती पदयात्रेच्या एका महिन्यानंतर मी क्योटो या जपानच्या सांस्कृतिक राजधानीत पोहोचलो. हे एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे.
- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com
जपानमधील टोकियो ते हिरोशिमा या शांती पदयात्रेच्या एका महिन्यानंतर मी क्योटो या जपानच्या सांस्कृतिक राजधानीत पोहोचलो. हे एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे. सुंदर आणि जुनी बुद्धिस्ट आणि शिन्तो मंदिरं, लाकडी घरं, राजवाडे आणि बगीचे आहेत. क्योटोमध्ये दोन हजार मंदिरं आहेत, त्यांतील सोळाशे बुद्धिस्ट आणि चारशे शिन्तो या धर्माची मंदिरं आहेत. शिन्तो या धर्माचा उगम जपानमध्ये झाला. या धर्माचा महत्त्वाचा गाभा ‘अॅनिमिझम’ आहे. म्हणजेच प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे, असा विश्वास हा धर्म देतो. मंदिरात नैसर्गिक वस्तू जसं- लाकूड, दगड इत्यादींचा वापर जास्त असतो. मंदिरामध्ये जाण्यापूर्वी एका लाकडाच्या पळीने विशिष्ट पद्धतीने पाणी घेऊन हात आणि तोंड साफ करावं लागतं. मला ही पद्धत एका महिलेने शिकवली. बांबूची ती लाकडी पळी मला खूप भावली. असा एक शुद्धीकरणाचा प्रकार बऱ्याच धर्मांमध्ये पाहायला मिळतो. गवताच्या सुक्या पात्यांपासून बनवलेलं जाड, सुंदर तोरण इथं वापरलं जातं. दक्षिण अमेरिकेतसुद्धा अॅनिमिझम आधारित धर्म आहेत आणि मला त्यांनी खूप प्रभावित केलं. ६ व्या शतकात बुद्धिस्ट धर्म कोरियाहून जपानमध्ये आला. शिन्तो आणि बुद्धिस्ट धर्म यांमध्ये एकोपा पाहायला मिळतो. खूप लोक दोन्ही मंदिरांत जातात. २०१७ च्या विन गॅलुपच्या सर्व्हेनुसार जगात प्रथम चीनमध्ये ९१ टक्के आणि जपानमध्ये ८७ टक्के लोक नास्तिक आहेत.
टोकियोमध्ये असताना मला निप्पोनजान म्योहोजी या बुद्धिस्ट संप्रदायाबद्दल समजलं आणि मी ठरवलं की, एक महिना मी स्वतः पदयात्रा करेन. मी क्योटोमध्ये निप्पोनजान म्योहोजीच्या शांती यात्रेचे प्रमुख टकेदा शोनीन (शोनीन हे भन्ते यांना आदराने दिलेली संज्ञा) यांना भेटलो. त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि ‘तू इथून हिरोशिमापर्यंत सोबत येशील का?’ अशी एक साद घातली. मी आनंदाने होकार दिला; परंतु माझ्या ‘हो’वर ते थांबले नाहीत, त्यांनी अजून काही प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्यांची मी समाधानकारक उत्तरं दिल्यावर त्यांनी मला त्यांच्यासोबत पदयात्रा करण्याची परवानगी दिली.
टकेदा शोनीन हे टोकियोमधील शुबुया येथील बुद्धिस्ट मंदिराचे प्रमुख आणि सोबत दरवर्षी दोन महिने टोकियो ते हिरोशिमा पदयात्रेची पूर्ण जबाबदारी घेतात. १९५८ पासून ही दोन महिन्यांची पदयात्रा सुरू आहे. तिचा उद्देश अण्वस्त्रं नष्ट करणे आणि जगात कोठेही युद्ध होऊ नये, ही भावना जपत आहेत.
जपान या देशाने अणुयुद्ध आणि त्याची दाहकता अनुभवली आहे, त्यामुळे असं युद्ध परत होऊ नये याबद्दल ते खूप जागरूक आहेत. याचसोबत जपानी राज्यकर्ते पुन्हा त्या दिशेने जाऊ नयेत, यासाठी इथं लोक वेळोवेळी आंदोलन करत असतात. बौद्ध भिक्षूंसोबत चालण्याची माझी ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे मी उत्साहित होतो. आमच्या शांतीच्या वारीत पाच भिक्षू आणि एक अरिमरा सान (सान आदरयुक्त संज्ञा पुरुष आणि महिलेसाठी) हे पूर्णवेळ चालणार होते आणि आता मी त्यांत सहभागी झालो होतो. एका गोलाकार लोखंडाच्या रिंगवर प्राण्याचं कातडं मढविलेलं आणि त्याला पकडण्यासाठी एक मूठ, त्यावर सुंदर अशा लिपीत मंत्र लिहलेला; आणि सोबत वाजवण्यासाठी एक काठी मला भिक्षूने दिली. मी पहिल्यांदा एखादा ढोल हाती वाजवण्यासाठी घेतला. सोबतच्या सर्व भिक्षूंनी एक मंत्र बोलायला सुरू केला. तो मंत्र म्हणजे, ‘नमु म्यो हो रेन ग्ये क्यो.’ आधी तर मला ते काही लक्षात राहीना. ते सर्व एका ढोलकीच्या नादावर एक एक उच्चार करीत. आधी ढोल आणि आता हा अवघड मंत्र, यामुळे माझ्यावर खूप दबाव आला. चालण्याच्या काळात हा मंत्र अखंडित चालत असे. दोन-तीन दिवसांनी मला तो मंत्रही पाठ झाला आणि ढोलही वाजवता यायला लागला. हा मंत्र १३ व्या शतकात निचिरेन शोनीन या महान जपानी भिक्षूने जगाला दिला आणि त्यांनी निचिरेन या महायान बुद्धिस्ट शाखेची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी बुद्धाच्या लोटस सूत्र यालाही महत्त्व दिलेलं आहे.
निप्पोनजान म्योहोजी हा संप्रदाय फुजी गुरुजी यांनी १९१७ मध्ये स्थापन केला. फुजी गुरुजी हे ऑक्टोबर १९३३ मध्ये वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमामध्ये पहिल्यांदा महात्मा गांधीजींना भेटले. फुजी गुरुजींनी गांधीजींना तीन माकडं दिली, ज्यांचा संदेश प्रत्येक भारतीयास माहीतच आहे; ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका.’ ती भेट गांधीजी यांनी शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवली. ती गांधीजींची तीन माकडं म्हणून जगप्रसिद्ध झाली. सोबत ‘नमु म्यो हो रेन ग्ये क्यो’ हा मंत्र गांधीजींना खूप भावला आणि तो त्यांनी आश्रमाच्या सर्वधर्म प्रार्थनेत ठेवला. या दोन आध्यात्मिक गुरूंची ती भेट भारत आणि जपान मैत्रीसाठी खूप महत्त्वाची राहिली आहे. फुजी गुरुजी गांधीजींसोबत ६८ दिवस आश्रमामध्ये राहिले आणि त्यांनी चरखा चालवायला शिकला आणि त्यांनी स्वतः बनवलेला धागा गांधीजींना भेट दिला. फुजी गुरुजी आणि त्यांच्या भिक्षूंनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. पाच वर्षांच्या या यात्रेनंतर मी हे नक्की सांगू शकतो, की फुजी गुरुजी निःसंदेह गांधीजींचे खरे प्रतिनिधी होते. फुजी गुरुजी यांचं विश्वशांतीसाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांनी पूर्ण जपानभर पदयात्रा केली, सोबत अणुबॉम्बविरोधात खूप मोठी मोहीम आणि सर्वधर्मांमध्ये एकोपा यावा यासाठी खूप मोठं योगदान दिलं. निप्पोनजान म्योहोजी भन्ते हे त्यांच्या शांती पदयात्रेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे शांतिदूत जगभर पसरलेले आहेत. भारतात दिल्ली, मुंबई, कोलकाता, वर्धा, लेह, दार्जिलिंग, राजगिरी, भुवनेश्वर या ठिकाणी यांची मंदिरं आहेत आणि त्यांच्या प्रत्येक मंदिरात महात्मा गांधीजींचा फोटो असतो. पुढं जगभरातील मंदिरांमध्ये राहण्याचा मला योग आला, तसंच माझ्या यात्रेसाठी त्यांनी खूप मदत केली.
भारत हाच देश जगामध्ये शांती प्रस्थापित करू शकतो, असं फुजी गुरुजींचं म्हणणं आहे. पाच वर्षांच्या या प्रवासात मलाही याची प्रचिती आली. मी जेव्हा निप्पोनजान म्योहोजींसोबत पदयात्रा सुरू केली, त्यात अनेकदा शोनीन यांनी मला पुढं केलं. त्यांनी मला खूप संधी दिल्या. जसं- पत्रकारांशी बोलणं, बॅनर घेऊन पुढं चालणं आणि ठिकठिकाणी असलेल्या रोजच्या सभेत भाषणाची संधी. आम्ही रोज साधारण २० किमी चालायचो, त्यात ३ ते ४ सभा असायच्या. अमेरिकन सैन्याच्या काही तुकड्या ज्या अजूनही जपानमध्ये आहेत, त्यांच्याविरोधात प्रदर्शन करणे, शांतीचं परिपत्रक देणे, या कामात शोनीन हे दिवसभर व्यग्र असत. त्यांना आणि इतर भन्तेंना इंग्रजी येत नव्हतं, त्यामुळे आमचं बोलणं कमी असायचं. माझ्या भाषणासाठी एक अनुवादक असे.
अरिमरा सान यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी होती. आमच्यासोबत एक गाडी होती, त्या ती चालवत आणि सोबत जेवणाची पूर्ण जबाबदारी पार पाडत. मी शाकाहारी आणि इथं जपानमध्ये माझ्यासाठी शाकाहारी अन्न मिळवणं खूप कठीण गोष्ट असूनसुद्धा अरिमरा सान यांनी माझ्यासाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था पार पडली. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. मी त्यांना माझी आई मानतो.
३ ते ४ दिवसांत शोनीन यांना समजलं की, माझे बूट हे छोटे आहेत आणि त्यामुळे मला त्रास होतो आहे. त्यांनी मला नवीन बूट घेऊन दिला, तो माझा या यात्रेतला ४ था बूट होता. इकेदा शोनीन आणि मला एक जबाबदारी मिळाली. ती म्हणजे, आम्ही आदल्या दिवशी ज्या चर्च, बुद्ध मंदिर, घरामध्ये राहिलो, त्याची साफसफाई करणं. त्यात मी संडास साफ करायचं काम घेतलं आणि सोबत फरशीची सफाई. त्यात मी हळूहळू निपुण होत गेलो आणि इकेदा शोनीन यांसोबतची मैत्री घट्ट झाली, हे एक तरुण भन्ते आणि करुणामय भन्ते आहेत. त्यानंतर आफ्रिकन देशांमध्ये आम्ही आठ महिने सोबत यात्रा केली, त्याबद्दल मी नंतर लिहीनच. संपूर्ण यात्रा ही शिस्तीत चालली. आम्ही एका रांगेत चालत, वाटेत पत्रकं वाटत असू, खूप साऱ्या गावांत आणि शहरात. कधीकधी १५०-२०० लोक आमच्यासोबत चालत. हा प्रवास साधारण १ महिना होता. त्यात मला खूप सारं शिकता आलं. सर्वांनी खूप प्रेम दिलं. मी भारतीय म्हणजे बुद्ध यांच्या भूमीचा आणि सोबत गांधीविचार घेऊन इथं आलो, यामुळे इथं मला मानसन्मान मिळाला. या यात्रेविषयी अजून काही पुढील भागात.
(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे असून, महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.