नाविक तळाला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oppose for jeju island

बेटावर जाण्यासाठी येथील व्हिसाच्या अटी शिथिल असल्या कारणाने, खूप सारे पर्यटक इथं येत असतात. त्यांत सर्वांत जास्त संख्या चिनी नागरिकांची आहे.

नाविक तळाला विरोध

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

बेटावर जाण्यासाठी येथील व्हिसाच्या अटी शिथिल असल्या कारणाने, खूप सारे पर्यटक इथं येत असतात. त्यांत सर्वांत जास्त संख्या चिनी नागरिकांची आहे. २८ ऑगस्ट २०१७ रोजी मी जपानला नमन करून जेजू या बेटावर विमानाने प्रस्थान केलं. सायंकाळी मी इथं पोहचलो आणि आपली सायकल जोडण्यास सुरुवात केली. मी आता सायकल चालवत नाविक तळाकडं निघालो, जिथं माझ्या माहितीतील काही लोक होते. पण, रात्र जास्त झाल्यामुळे मी काहीच अंतर कापू शकलो आणि एका चांगल्या जागेवर तंबू टाकून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी गँगजेओंग या गावी पोहचलो. तिथं करी आणि मिलिसा या दोन अमेरिकन मैत्रिणी मला भेटल्या, ज्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मागील काही वर्षांपासून इथं राहत होत्या. करी ही तर अजूनही तिथंच आहे. ती ‘गँगजेओंग गाव’ असं इंग्लिश मासिक चालवते आणि तिथं घडणाऱ्या गोष्टींचं संकलन या मासिकात करून ती ते मासिक जगभरात पाठवते. मी जेव्हा तिथं पोहचलो तेव्हा तेथील आंदोलकांच्या हाती असलेल्या पाटीवरून कळलं की, आजचा दिवस हा या सत्याग्रही आंदोलनाचा ३७५६ वा दिवस होता. या आंदोलनाला सुरुवात झाली, जेव्हा दक्षिण कोरियाने जेजू बेटावर नवीन समुद्रात नाविक तळ बनवण्यास सुरुवात केली. हा नाविक तळ जरी दक्षिण कोरियासाठी महत्त्वाचा असणार असला, तरी गँगजेओंग गावाच्या सभोवतालच्या किनारपट्टीमध्ये एक संलग्न ज्वालामुखी खडक आहे.

जेजू बेटाचा हा भाग एकमेव खडकाळ पाणथळ प्रदेश आहे आणि अनेक लुप्तप्राय प्रजाती आणि मऊ कोरल रीफचं घर आहे. या खडकाला ‘गोरंबी’ असं नाव आहे. यामुळे खूप साऱ्या पर्यावरण संरक्षण संस्थांनी आणि शांती गटांनी याला विरोध सुरू केला. खूप विरोध झाल्यामुळे काम नियोजित वेळेपेक्षा थोडं पुढं सरकलं; परंतु शेवटी २००६ च्या सुरुवातीस काम पूर्ण झालं. तरीही या तळाविरोधात हे सत्याग्रही आंदोलन अजूनही सुरूच आहे आणि ही गोष्ट जगासाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे.

इथं ३०-४० शांती कार्यकर्ते राहतात, ते गावभर जिथं जागा मिळेल तिथं राहतात. खूप साऱ्या ठिकाणी आंदोलनाचे मंडप आहेत. तसंच, एका जागेवर स्वयंपाकघर आहे, जिथं हे सर्व कार्यकर्ते एकत्र जेवण बनवतात. मलाही त्यांनी आमंत्रित केलं. मी राहण्यासाठी नाविक तळाच्या जवळ आणि जिथं नदी-समुद्राचं मिलन होतं अशा ठिकाणी तंबू टाकला. इथं मी १५ दिवस राहिलो. सुंदर खडकातून वाहणाऱ्या शुद्ध आणि काचेसारख्या पाण्यात मी रोज डुबकी मारून अंघोळ करत असे. तंबूमध्ये माझं काही सामानही असे; पण १५ दिवसांत कोणी काही चोरी नाही केली. याचा अर्थ असा होतो की, इथं गुन्हेगारी खूपच कमी आहे आणि येथील लोक हे समाधानी आहेत.

रोज सकाळी ६ वाजता आम्ही सर्व कार्यकर्ते आणि काही कॅथॉलिक नन मिळून नाविक तळाच्या गेटसमोर १०० वेळा उठाबशा करत नमन करत असू. हा आदरयुक्त विरोध मला खूप भावला. नंतर सर्व लोक नाश्ता करून पुन्हा ९ वाजता प्रमुख रस्त्यावर एकत्र येऊन आंदोलनाच्या गाण्यावर एकत्र नृत्य करत असू. मला ती गाणी खूप आवडली आणि अशाप्रकारेही विरोध करता येऊ शकतो हे पहिल्यांदा कळालं. या एकत्रित नृत्यासाठी कधीकधी १००-२०० लोक हजर राहत आणि खूप सारे लोक आम्हाला पाहत असत. त्यानंतर मानवी साखळी करत आम्ही नाविक दलाच्या गेटसमोर विरोध करत आणि घोषणा देत काही गाण्यांवर नृत्यही करत असू. यात कधी कधी लहान मुलंही असत. सर्व कार्यकर्ते हे निसर्गप्रेमी होते आणि कमीत कमी गरजांवर इथं राहत होते. यांत महिलांचं प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त होतं. हे एक शांतीपूर्ण आंदोलन होतं. महिलांचा असणारा सहभाग शांतीसाठी कारणीभूत दिसत होता. इथं एक फादर मून नावाचे धर्मगुरू होते. त्यांची लांब अशी दाढी होती आणि ते सतत आपल्या कामात व्यग्र असत. ते लाकडावर सुंदर नाव आणि कलाकृती काढत, जी नंतर विक्री करून या आंदोलनाला सहकार्य करत.

एक प्रेमळ महिलाही काही कलाकृती हाताने बनवीत असे आणि त्यांच्या विक्रीतून आंदोलनासाठी फंड जमा करीत असे. सोबत खूप सारे कलाकार असे होते की, जे शांतीचित्रं काढत व सुंदर असं संगीत वाजवीत. एके दिवशी सकाळी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या नाविक तळासमोर विरोध प्रदर्शन करीत होतो. तिथं काही सुरक्षारक्षक असत. त्यांतील एक सुरक्षारक्षक, त्याचा चेहरा गंभीर होता आणि तो प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना उकसवण्याचा प्रयत्न करे. त्या दिवशी त्या सुरक्षारक्षकाने एका कार्यकर्त्याला उकसवलं आणि आता त्यांचं भांडण सुरू झालं. शेवटी ते मिटलं आणि आम्ही परत निघालो. अहिंसक सत्याग्रही आंदोलनात अशी हिंसा घडणं मला आवडलं नाही. दुसऱ्या दिवशी मी एक फूल घेऊन त्या सुरक्षारक्षकाला दिलं आणि म्हणालो, ‘‘तू चांगला माणूस आहेस.’’ त्याने लगेच उत्तर दिलं, ‘‘मी वाईट माणूस आहे.’’ मी स्तब्ध झालो, आता काय बोलावं ! शेवटी मी म्हणालो, ‘‘तुम्ही तुमच्या हृदयाचं अनुसरण करा आणि या कार्यकर्त्यावर कठोर होऊ नका.’’ हे बोलून मी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी परतलो, तेव्हा त्याने मला हाक दिली आणि बोलला की, ‘‘मला तुझ्यासोबत एक सेल्फी घ्यायचा आहे’’ आणि त्याने माझ्यासोबत फोटो घेतला. ज्यांच्या विरोधात आपण आंदोलन करत आहोत, ते आपल्यासोबत फोटो घेत आहेत, ही अहिंसा सत्याग्रहाची आणि गांधीजींची किमया आहे.

महात्मा गांधीजी नेहमी सांगत, ‘द्वेष करायचा असेल तर दुष्कृत्याचा करा, ते करणाऱ्यांचा नाही.’ त्यांनी कधी ब्रिटिश अधिकारी किंवा नागरिकांचा द्वेष केला नाही, तर फक्त प्रेम केलं आणि त्या प्रेमाने त्यांनी त्या लोकांच्या हृदयावर राज्य केलं. त्यांच्या प्रेमाच्या कृतीने खूप साऱ्या ब्रिटिश नागरिकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला होता. अहिंसा याचा खरा अर्थ मला गवसला. अहिंसेचा आपण तीन स्तरांवर सराव करू शकतो - मन, वाचा आणि कृती. जर आपल्या मनात दुसऱ्याप्रती द्वेष असेल, तेव्हा आपण पहिलं अशांत व्यक्ती असू आणि त्यामुळे आपलंच नुकसान जास्त होतं. गांधीजींनी आपल्या आध्यात्मिक सरावाने मनावर ताबा मिळवला होता आणि त्यात हिंसा उत्पन्न होऊ नये यासाठी ते खूप काळजी घेत. त्या घटनेनंतर मला इतरांचा द्वेष करणाऱ्या लोकांप्रती; उदा. - मुस्लिमद्वेष, या लोकांबद्दल दयाभाव उत्पन्न होऊ लागला, कारण ते द्वेषाने ग्रस्त आहेत आणि ते त्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही. महात्मा गांधीजींचा विश्वास होता की, अहिंसक लढाईला हिंसक लढाईपेक्षा अधिक धैर्य आवश्यक आहे. १५ दिवसांच्या या जेजू बेटाच्या रोमांचक सफरीने मला खूप काही दिलं. येथील शांती कार्यकर्ते यांनी मला खूप मदतही केली आणि प्रेम दिलं. जेजूचं ते आंदोलन जगासाठी एक प्रेरणास्थान आहे, जे गेल्या ११ वर्षांपासून सतत सुरू आहे आणि शांतीचा संदेश देत आहे. जेजू बेटावरील अनुभवांची शिदोरी घेऊन मी पुढील प्रवास अमेरिकेच्या दिशेने सुरू केला. पुढील भागात जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका या देशातील माझ्या प्रवास अनुभवांसह भेटू.

(सदराचे लेखक जगभर भ्रमंती कऱणारे असून महात्मा गांधीजी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)

Web Title: Nitin Sonawane Writes Jeju Island

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Japansaptarang
go to top