...आणि सत्याचा शोध सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...आणि सत्याचा शोध सुरू
...आणि सत्याचा शोध सुरू

...आणि सत्याचा शोध सुरू

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान आजही जगभरातल्या अनेकांना प्रेरणा देतंय. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेत एका तरुणाने प्रचंड भ्रमंती केली. त्याच्या प्रवासात त्याला अनेक विलक्षण अनुभव घेता आले, हे सारे अनुभव या सदरातून वाचायला मिळतील....

‘हजार मैलांचा प्रवास एका पायरीने सुरू होतो’, असं ‘लाओत्से’ हा महान चिनी प्राचीन तत्त्वज्ञानी सांगतो. माझी विश्वशांती यात्रा चालू होण्याआधी साबरमती आश्रम इथं भेटलेली अमेरिकन मैत्रीण एव्हरी हिने मला एक दैनंदिनी लाओत्सेचा हा सुविचार लिहून भेट दिली होती. हा विचार माझ्यासाठी खूप प्रेरक होता. प्रवासात जिथं जिथं मी अडकलो, तिथं तिथं मी हा विचार आठवून एक-एक पाऊल पुढं टाकण्याचा प्रयत्न केला आणि मी पुढं जात राहिलो.

नियोजनानुसार महात्मा गांधींना नमन करून २०१६ मध्ये १८ नोव्हेंबरला वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून विश्वयात्रेचं पाहिलं पाऊल आम्ही टाकलं. विश्व-शांती यात्रेची मूळ कल्पना ज्याने मांडली असा माझा मित्र ज्ञानेश्वर यावलकर, दुसरा मित्र आणि गाववाला अजय हापसे, केरळमधून आमच्या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आलेला मित्र सुभाष नायर, अतुल... या सगळ्या मित्रमंडळी व आश्रमातील काहीजणांबरोबर या यात्रेची सुरुवात झाली. तो दिवस खूप महत्त्वाचा होता. मनामध्ये चलबिचल होती. महात्मा गांधीजी हे व्यक्तिमत्त्व संपूर्ण मानवजातीच्या इतिहासातील एक महत्त्वाचं व्यक्तित्व आहे. गांधीजींनी मांडलेल्या सत्याग्रहाच्या सिद्धांतामुळे हिंसक क्रांतीला एक सर्वश्रेष्ठ पर्याय निर्माण झाला आहे, ज्याची प्रत्यक्ष झलक इतिहासानं तर पहिलीच आहे; परंतु आजही ती जगभर पाहायला मिळते. जगभर फिरताना मला हे पावला-पावलावर जाणवलंसुद्धा. जर आपण सुदान या देशाच्या इतिहासावर एक नजर टाकली, तर आपल्याला समजेल की, या देशाचा इतिहास हा हिंसक राहिलेला आहे. परंतु, सुदानमध्ये ‘अल बशर’ या तानशाहला तेथील लोकांनी अहिंसक मार्गाने सत्तेतून खेचून तुरुंगामध्ये टाकलं आणि आजही त्यांचा लोकशाहीसाठीचा लढा अहिंसक मार्गाने सुरू आहे. या देशातील अहिंसा या शब्दाला जोडून येणाऱ्या काही रंजक गोष्टी मी पुढं मांडणारच आहे. गांधीजी यांच्या अहिंसक मार्गाचा वापर आजही जगभर होतो आहे, याचं एक उदाहरण सुदान या देशातील अनुभवावरून दिलं. असो, गांधीजींचा फोटो आम्ही आमच्या सायकलच्या पुढं लावला होता. जगभर पसरलेल्या गांधीबाबा या व्यक्तिमत्त्वासोबत चालू झालेला हा प्रवास म्हणजे जबाबदारीचा होता. यामुळेच मनात चलबिचल, जराशी धास्ती होती. आपल्याकडून काही चुका झाल्या, तर गांधीजींचं नाव खराब होईल, ही चिंता सबंध पाच वर्षं राहिली. ही चिंता माझ्याकडून कोणतंही वाकडं पाऊल पडणार नाही यासाठी मला खूप महत्त्वाची वाटते.

आपला प्रवास हा आपण ठरवलेल्या तत्त्व आणि मूल्यांवर असावा, याची खबरदारी मी प्रत्येक पावलावर घेत होतो. यामुळे मी आतून खूप बदललो. कारण गांधीबाबा मी खूप वाचला होता; पण त्यादिवशी प्रत्यक्ष गांधीजींच्या मार्गाचा अवलंब केला होता. ना तेव्हा मी गांधीजी यांचा मोठा प्रचारक होतो, ना मी आज पाच वर्षांची यात्रा करून मला संपूर्ण गांधीजी कळले असं म्हणतो. परंतु, गांधीजींचा स्वतःवर केलेला सत्याचा प्रयोग मीही केला, करतो आहे आणि पुढंही करत राहीन. गांधीजी आणि मी, आम्हा दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा धागा म्हणजे सत्याचा शोध. जसजसं मी माझ्या प्रवासात पुढं जात राहिलो, तसतसा मी गांधीजींच्या जवळ जात राहिलो.

जेव्हा मी चार महिने टेलिकॉममध्ये शिफ्ट बदलणारी नोकरी केली आणि एका चक्रात अडकून बसलो, तेव्हा मला समजलं की हे काही माझं आयुष्य होऊ शकत नाही आणि कोणताही दुसरा पर्याय किंवा पुढं काय करू असा कोणताच दुसरा विचार न करता एका क्षणात ती नोकरी मी सोडली. ती वेळ माझ्यासाठी फार कठीण होती. त्यानंतरही कोणताही अनुभव पाठीशी नसताना सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा घेतलेला निर्णय ही गोष्टही माझ्यासाठी तशी सोपी नव्हती. मी ज्या परिवातून आलो होतो, त्या परिवारात दहावी पास आणि नंतर इंजिनिअर झालेला मी एकटाच होतो.

माझ्याकडून माझ्या संपूर्ण परिवाराला खूप अपेक्षा होत्या. या घरच्यांच्या अपेक्षांचा दबावही माझ्यावर होता. माझे दोन भाऊ - दत्ता आणि महेश - या दोघांच्या मधला मी. घरातील गरीब परिस्थितीमुळे दोघांनाही कमी वयात शाळा सोडून काम सुरू करावं लागलं. माझी आई आणि आत्या या मासेविक्री करतात. माझ्या या संपूर्ण परिवाराने मला इंजिनिअर बनवलं होतं. परंतु एक गोष्ट मला पक्की होती की, काही मोठं करण्यासाठी खूप त्याग करावा लागतो. माझे दोन भाऊ खूप कष्टाळू आहेत आणि त्यांच्यावर माझा विश्वास होता की, मला काही न देता ते माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतील आणि हा भरवसा त्यांनी सिद्धही केला.

जेव्हा विश्व-शांती यात्रेचा निर्णय पक्का झाला, तेव्हा कुमार सप्तर्षीं यांनी या यात्रेला पाठिंबा दिला. जेव्हा माझी आई त्यांना भेटली, तेव्हा तिने सांगितलं की, ‘‘मी माझा मुलगा तुमच्या पदरात टाकला आहे, आता त्याची काळजी तुम्ही घ्या.’’ आईच्या या वाक्यामुळं कुमार सप्तर्षी यांची माझ्याप्रतीची काळजी आणखीन वाढली. यात्रेला सुरुवात केली तेव्हाही मी मांसाहारी होतो; परंतु आता मी विगन आहे (विगन म्हणजे प्राण्यांपासून मिळणारं सर्व खाणं वर्ज्य. उदा. - दूध व दुधापासूनचे पदार्थ). प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान मला ‘शाकाहारी हो’ असे अनेक सल्ले आले; पण मी ठरवलं होतं की, मला जोपर्यंत हे पटत नाही, तोपर्यंत मी जो जसा होतो, तसाच राहणार. पुढं जपानमध्ये मी शाकाहारी बनलो, त्याचं कारण सर्व सृष्टी एक आहे आणि आपण कमीत कमी हिंसेमध्ये आपलं जीवन जगावं हा विचार मला जपानमध्ये पटला. याबद्दल विस्तृतपणे मी पुढं पूर्ण लिहिणारच आहे. प्रवास तर चालू झाला होता; पण मोठा प्रश्न होता की, मी याआधी गिअरची सायकल कधी पहिली नव्हती, वापरायचा तर प्रश्नच नव्हता. यामुळे अशी सायकल चालवायचा सरावही माझा नव्हता. आम्ही म्हणालो, जसजसं पुढं जाऊ, तसतसं आपलं शरीर अजून मजबूत होत जाईल आणि सायकल चालवायची सवयही होऊन जाईल. प्रवास तर सुरू झाला होता, तो न थांबण्यासाठीच.

(सदराचे लेखक जगभर फिरणारे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mahatma GandhiPhilosophy
loading image
go to top