
मेक्सिकोमध्ये यात्रा करत असताना खूप अनोळखी लोकांसोबत माझी भेट होत होती, त्या लोकांसोबत संवाद होत असे. इथं बहुतांशी लोक गहूवर्णीय आहेत.
- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com
मेक्सिकोमध्ये यात्रा करत असताना खूप अनोळखी लोकांसोबत माझी भेट होत होती, त्या लोकांसोबत संवाद होत असे. इथं बहुतांशी लोक गहूवर्णीय आहेत. मीही याच रंगाचा असल्यामुळे लोक मलाही मेक्सिकनच समजत आणि स्पॅनिश भाषेत बोलणं सुरू करत. येथील मूळ स्थानिक जमाती आणि स्पॅनिश यांचं मिश्रण झालं आहे. त्यामुळे ते दिसायला अगदी भारतीयच. भारत देशामध्येसुद्धा खूप मिश्रण आहे. भविष्यात जेव्हा जात, धर्म, भाषा, रंग आणि देश याला काही अर्थ राहणार नाही, तेव्हा जगात सर्वत्र मिश्रण होईल; आणि तेव्हा दिसणारा मनुष्य हा अगदी भारतीयांसारखा दिसेल असं मला वाटतं. मेक्सिको आणि आपल्या देशांमध्ये खूप साम्य आहेत. जसं - खाण्याचे विविध प्रकार, कुटुंबरचना, हवामान, धर्मांमधील समानता, आर्थिक परिस्थिती, मनमिळावू आणि बोलके लोक. मेक्सिकन लोक कुटुंबाला खूप महत्त्व देतात. भारतात जसं आपण आपल्या दूरच्या पाहुण्यांशी परिचय ठेवतो तसं. खूप वेळा मोठमोठ्या पारिवारिक मेजवानी असतात. घरात आई-वडील आणि त्यांची विवाहित मुलं एकत्र राहतात.
अमेरिकेत असं नसतं, एकदा कॉलेज सुरू झालं की आई-वडिलांपासून मुलं-मुली वेगळं होतात आणि दूरच्या नातलगांशी काहीही संबंध रहात नाही. अमेरिकेत सहसा नातलग आणि जवळचे लोक एकमेकांना अडीअडचणीच्या काळात जास्त मदत करत नाहीत; पण मेक्सिकन लोक एकमेकांची खूप मदत करतात.
सात - आठ लोक एकत्रित असल्यामुळे राहण्या-खाण्याचा खर्च कमी होतो. स्पॅनिश वसाहत असल्यामुळे इथे कॅथोलिक ख्रिश्चन लोकांचं प्रमाण जास्त आहे आणि कॅथोलिकमध्ये संतांना खूप महत्त्व आहे, जसं भारत देशामध्ये आहे. मेक्सिकोचे सर्वांत आदरणीय संत व्हर्जिन ऑफ ग्वालालुपे (व्हर्जिन मेरी) यांनी शेतकरी जॉन दिएगोला दर्शन दिलं आणि त्याला आता मेक्सिको सिटीच्या उत्तरेला आर्चबिशपला एक मंदिर बांधण्यासाठी सांगितलं. मेक्सिको शहराबाहेर हे खूप मोठं मंदिर आहे आणि व्हर्जिन ऑफ ग्वालालुपे यांच्या दर्शनाला पूर्ण मेक्सिकोतून लोक येतात. दक्षिण अमेरिकेतील लोकही येतात. स्थानिक जुने धर्म, परंपरा आणि कॅथोलिक ख्रिश्चन यांचं मिश्रण खूप छान झालं आहे. सायकल यात्रेत मला धार्मिक यात्रा आणि नवस करणारे खूप लोक दिसले. एका चर्चमध्ये तर जुन्या स्थानिक धर्मानुसार प्राण्यांची आहुती दिली जाते, असं ऐकण्यात आलं.
मी उत्तरेकडून सायकल यात्रा करून मेक्सिको शहरात पोहचलो. इमा ही मैत्रीण माझी वाट पाहत होती आणि तिच्याबद्दल मी मागील लेखात सांगितलं होतं. ती एक कला इतिहासकार आहे. मेक्सिकोचं राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठ, जे की मेक्सिको शहरात आहे आणि मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचं विद्यापीठ आहे, येथून इमाने आपली पदवी घेतली. तिचे वडील हे मिरचीचे व्यपारी होते आणि आणि तिचे मोठे बंधू हा व्यवसाय संभाळतात. इमा बराच काळ भारतात असते, तिला भारत खूपच जास्त आवडतो. मेक्सिको आणि भारत देशातील साम्य यामुळे भारत हे तिचं दुसरं घर आहे. इमाने माझ्यासाठी एक स्पॅनिश भाषा शिक्षिका नियुक्त केली, मला पुढे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील प्रवासासाठी स्पॅनिश भाषा शिकणं महत्त्वाचं होतं. मी ओळख सांगू शकेन एवढी भाषा २-३ दिवसांत शिकलो.
मेक्सिको हे शहर ॲझ्टेक काळात लागो डे टेक्सकोको तलावावर बांधलं गेलं. ॲझ्टेक लोकांनी सरोवरात माती टाकून एक कृत्रिम बेट बांधलं. नंतर, स्पॅनिश लोकांनी टेनोचिट्लानच्या अवशेषांवर दुसरी मेक्सिको सिटी उभारली. शहराच्या मध्यभागी खोदकाम केलं, तर पुरातन शहराचे अवशेष सापडतात. मेक्सिको शहर हे उत्तर अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. शहराच्या मध्यभागी Cathedral of Art in Mexico हे मेक्सिको सिटीमधील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे. त्याद्वारे मेक्सिकोमध्ये संगीत, नृत्य, नाट्य, ऑपेरा आणि साहित्यातील उल्लेखनीय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि चित्रकला, शिल्पकला आणि फोटोग्राफीचं महत्त्वपूर्ण प्रदर्शन आयोजित केलं जातं. या सुंदर आणि भव्य केंद्रामध्ये मला डान्सचा एक शो पाहायला मिळाला, तो माझ्यासाठी अविस्मरणीय कलेचा प्रकार होता, इमाने तो मला दाखवला, त्याबद्दल तिचे खूप आभार. सहसा मी अशा कार्यक्रमांना या आधी गेलो नव्हतो, कारण ते थोडे महाग असतात. तुम्ही जर बाहेर फिरायला जात असाल, तर असे गाणी, डान्स आणि नाटक यांचे शो कधीही टाळू नका.
मेक्सिको शहरामध्ये एक सुंदर संग्रहालय आहे, ज्याचं नाव आहे ‘सहिष्णुता संग्रहालय.’ मी आणि इमाने त्याला भेट दिली. या संग्रहालयात जगभरात नरसंहार कसे झाले आणि केले गेले, त्याची माहिती दिली आहे आणि त्यावर उत्तर काय, हेही दाखवलं आहे. १९९४ च्या रवांडा नरसंहारादरम्यान, ज्याला तुत्सीविरुद्ध नरसंहारदेखील म्हटलं जातं. रवांडाच्या पूर्व-मध्य आफ्रिकन राष्ट्रातील हुतू वांशिक बहुसंख्य सदस्यांनी सुमारे आठ लाख लोकांची हत्या केली. बहुतेक तुत्सी अल्पसंख्याक होते. हिटलरने यहुदी लोकांचा कसा नरसंहार केला हेही दाखवलं गेलं. शेवटी हा नरसंहार कसा घडतो व त्याचे १० टप्पे सांगितले आहेत, त्यात पहिला आहे लोकांमध्ये गट पाडणे. ‘आपण’ आणि ‘ते’ म्हणजे माणूस माणसापासून तोडणे. यानंतर त्याला वेगळं दाखवणे, विशिष्ट प्रतीक लावणे. तिसऱ्या टप्प्यावर त्याच्यावर भेदभाव करणे, नागरी अधिकार नाकारणे, नंतर त्यांचे मानवी हक्क नाकारणे आणि जसं हुतू जमात तुत्सी जमातीतील लोकांना झुरळ म्हणू लागले म्हणजे अमानवीकरण.
पाचवा टप्पा हा टोळीला संघटित करणे, अपराध करायला लावणे. नंतर पेपर, रेडिओ आणि आता टीव्हीच्या माध्यमातून तिरस्कार आणि राग निर्माण करणे. सातवा टप्पा तयारी करणे आणि अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करणे. आठव्या टप्प्यात जाती-धर्मावरून वेगवेगळं करणे आणि त्यांचा छळ करणे. नवव्या टप्प्यावर संपूर्ण नाश करणे आणि शेवटी जे केलं ते नाकारणे. अशा टप्प्यांमध्ये नरसंहार घडतो, यामुळे नरसंहाराचा वास आधी येतो, जर आपण नजर ठेवली तर. या नरसंहारावर उत्तर म्हणून त्या संग्रहालयात चार व्यक्तीचं जीवन आणि काम दाखवलं आहे. त्यात दोन भारतीय - एक महात्मा गांधी आणि मदर तेरेसा व महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेणारे मार्टिन लुथर किंग ज्यु. आणि नेल्सन मंडेला.
मेक्सिको शहरामध्ये उभ्या स्वरुपात असलेला महात्मा गांधी यांचा एक सुंदर पुतळा एका छान अशा गार्डनमध्ये आहे, त्यापासून खूप लोक प्रेरणा घेत असतात. महात्मा गांधींना समजण्यासाठी इमाने गांधीजी यांनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात प्रवेश घेतला. तिचं भारतामध्ये येण्याचं कारण महात्मा गांधी हेच होतं, आपले ‘बापूजी’ अशा हजारो लोकांचं प्रेरणास्थान आहेत. जगभरातील लोकांना बापू अहिंसेकडे घेऊन जात आहेत, याचा साक्षीदार मला बनता आलं, याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. गांधीजी... बापूजी तुम्ही सगळीकडे आहात. हा लेख मी कराची, पाकिस्तानमधून लिहिलेला आहे. २४ दिवसांची पाकिस्तान शांतीयात्रा सुरू आहे. खूप सारं प्रेम पाकिस्तानमधून....
(सदराचे लेखक जगभर भ्रमंती कऱणारे असून महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)