ओकाइनावा; खूप सुंदर बेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओकाइनावा; खूप सुंदर बेट

आमच्यासोबत दोन कोरियन भन्तेही या पदयात्रेमध्ये आले होते. हिरोशिमा शांती पार्क, जिथं हे संग्रहालय आहे, ते जगातील प्रत्येक मोठ्या नेत्याने पहिलं पाहिजे, असं मला वाटलं.

ओकाइनावा; खूप सुंदर बेट

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

आमच्यासोबत दोन कोरियन भन्तेही या पदयात्रेमध्ये आले होते. हिरोशिमा शांती पार्क, जिथं हे संग्रहालय आहे, ते जगातील प्रत्येक मोठ्या नेत्याने पहिलं पाहिजे, असं मला वाटलं, जेणेकरून ते या अणुबॉम्ब वापराचा विचार करणार नाहीत. दुपारी काही लहान मुलं एक जगाचा नकाशा घेऊन उभी होती, त्यांनी मला सांगितलं की, तुमचा देश या नकाशात कोणता? मी भारत भूमीवर बोट ठेवलं. त्यांनी मला सांगितलं की, ‘तुमच्या देशात अणुबॉम्ब आहे.’ मी शरमेनं मान खाली घातली, कारण ज्या देशाने जगाला बुद्ध आणि गांधीजी दिले, त्या देशात अणुबॉम्ब असणं हे दुःखद आहे.

पुढच्या टप्प्यात आम्ही गाडीने नागासाकी या शहरात पोचलो. त्याही दिवशी खूप लोक तिथं जमा झाले होते. नागासाकीमध्ये दुसऱ्यांदा अणुबॉम्ब वापरला गेला आणि त्यात साधारण ८० हजार लोक मारले गेले. संध्याकाळी आम्ही बोटीने टोकियोकडे प्रस्थान केलं व पुढे ओकाइनावा या जपानी बेटावर असलेल्या अमेरिकन सैन्याच्या तळाच्या विरोधात चाललेल्या सत्याग्रही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी निघालो. भन्ते इकेदा शोनीन यांनी विमानाच्या तिकिटाची व्यवस्था केली.

विमानातून मला प्रशांत महासागरात लंबुळक्या आकाराचं हिरवं बेट दिसलं. ११२ किलोमीटर लांब आणि ११ किलोमीटर रुंदीचं ओकिनावा बेट आहे. हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे. जगातील सर्वांत मुबलक प्रवाळ खडकांनी वेढलेलं हे बेट आहे. ऊस, अननस, पपई आणि इतर उष्णकटिबंधीय फळांचं प्रमुख उत्पादन इथं घेतलं जातं. ऊस, रताळे यांची शेती केली जाते. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय इथं आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावरच केल्या जाणाऱ्या मासेमारीमध्ये ओकिनावा जगप्रसिद्ध आहे. येथील लोकसंख्या ही १४.६ लाख एवढी आहे. नहा हे प्रमुख शहर असून इथं विमानतळ आहे. टोकियो ते नहा हे अंतर खूप दूर असून त्याचं तिकीट जर आपण जपानी मित्राच्या मदतीने विकत घेतलं तर खूप स्वस्त पडतं.

ओकाइनावा हे बेट खूपच सुंदर आहे. निळा समुद्र आणि छान असे किनारे, यामुळे ते पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. माझे मित्र कामोशीत शोनीन मला एका सुंदर अशा ठिकाणी घेऊन गेले, जिथं अजिबात मनुष्यवस्ती नाही. जंगलातून एक नदी समुद्राच्या दिशेने वाहून येत होती. आम्ही तिच्या विरुद्ध दिशेने गेलो आणि असा एक परिसर आला, जिथं सुंदर अशी झाडी आणि काचेसारखं पाणी. असं पाणी मी जीवनात पहिल्यांदा पहिलं, जे अजून विसरू शकलो नाही. इथं लोकांचं वयोमान हे जगात सर्वांत जास्त आहे, त्याची खूप सारी कारणं आहेत. जसं - शुद्ध हवा, पाणी, अन्न, व्यायाम आणि संपूर्ण जीवनपद्धती. अशा बेटावर राहणं हे स्वर्गाच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी अधिक पटीने जास्त शांतीपूर्ण आणि परिपूर्ण जीवन आहे.

ओकिनावाच्या भौगोलिक-सामरिक स्थानामुळे ते द्वितीय महायुद्धाच्या वेळेस जपानच्या सैन्याच्या तळासाठी महत्त्वाचं ठिकाण होतं. इथून कोरिया आणि चीन जवळ आहे. जपानने इथून चीन आणि कोरियावर हल्ला केला. त्याचा मोठा इतिहास आहे. जेव्हा जपानने पर्लहार्बरवर हल्ला चढवला, त्यानंतर अमेरिकेने जपानच्या ओकिनावा या बेटावर प्रथम हल्ला चढवला, त्यात जपानचे ७७ हजार आणि अमेरिकेचे साधारण २० हजार सैनिक मारले गेले आणि सोबत ओकिनावाचे एक चतुर्थांश लोक मारले गेले. हे एक भयानक युद्ध होतं. मी तेथील कॉर्नरस्टोन पीस या स्मारकाला भेट दिली. या सुंदर आणि भव्य अशा स्मारकात काळ्या दगडावर युद्धात मारल्या गेलेल्या जपानी, ओकिनावन आणि अमेरिकन लोकांची नावं कोरली आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर हे बेट अमेरिकेच्या हाती गेलं आणि त्यांनी इथं खूप मोठं सैन्य उभं केलं. १४०० अणुबॉम्ब इथं आहेत, असं बोललं जातं. अमेरिकेने १९७२ मध्ये हे बेट जपानला परत केलं. जपानमध्ये असलेल्या सैन्यतळांपैकी ६२ टक्के तळ ओकिनावामध्ये आहेत. १३ सैन्यतळं, जी या बेटाची २५ टक्के जमीन वापरतात. १२ वर्षांच्या मुलीवर १९९५ मध्ये सैनिकांनी बलात्कार केला. या घटनेनंतर ओकिनावन लोकांनी खूप मोठा विरोध केला आणि तो अजूनही सुरू आहे. आमच्या जमिनीवर असे सैन्यतळ नकोत, युद्ध परत सुरू झालं तर त्याचे परिणाम आमच्या लोकांना भोगावे लागतील आणि अमेरिकेच्या सैन्यतळांमुळे तेथील पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. युद्ध अभ्यासामुळे कधी कधी बिघडलेले हेलिकॉप्टर मानवी वस्तीवर पडतात. या सर्व कारणांमुळे तेथील लोक याचा विरोध करत आहेत.

अहागों शोको यांना ओकिनावन गांधी असं संबोधलं जातं, त्यांनी गांधीजींच्या अहिंसक मार्गाने सैन्यतळविरोधी मोहिमेला खूप मोठं योगदान दिलं. कामोशीता शोनीन जे एक भिख्खू, त्यांनी माझी त्यांच्या विहारात राहण्याची व्यवस्था केली. ते या सैनिकी तळाविरोधात आंदोलन करत आहेत. अमेरिकेच्या लष्करी हवाई तळासमोर रोज सकाळी ते आपला ढोल वाजवून ‘नमु म्यो हो रेन ग्ये क्यो’ हा मंत्र उच्चारतात. हा नवीन तळ समुद्राच्या पाण्यात आहे व त्यामुळे तेथील प्रवाळांचं व जीवांचं प्रचंड नुकसान होत आहे. रोज मोठमोठी वाहनं दगड घेऊन समुद्राच्या पाण्यात टाकतात. ओकिनावन लोक या तळाला खूप विरोध करत आहेत. मागील ३ वर्षांपासून ते इथं आपला विरोध करत होते. रोज एक हजार ते पंधराशे लोक या आंदोलनाला येतात. अमेरिकेच्या त्या तळाच्या प्रवेशद्वारावर बसून ते मालवाहतूक गाड्या थांबवितात. तिथं जपानी पोलिस आहेत आणि त्यांची नियुक्तीही विशेष या कामासाठी आहे. त्यांचं काम हे आंदोलकांना आवरणं, त्यांना बाजूला नेणं किंवा कैद करणं. याआंदोलनामुळे या तळाचं काम मंदावलं आहे. मीही त्या आंदोलनात सामील झालो होतो. एके दिवशी माझीही उचलबांगडी त्या पोलिसांनी केली आणि बाजूला घेऊन सोडलं. बाजूला एक मंडप टाकून तिथं काही लोक दिवस-रात्र बसतात, काही कलाकार इथं तळविरोधात्मक गाणी तसंच ओकिनावन गाणी आणि संगीत वाजवतात. ते माझ्या आवडीचं संगीत बनलं. त्यांची चाल ही आपल्या ओव्यांसारखी वाटली. काही लोक नृत्यही करत होते. मी त्यांच्यात सहभागी झालो. पुढे मला त्यांनी बोलण्याची आणि गाण्याची संधी दिली. मी त्या आंदोलनाने प्रभावित झालो व सर्वांना मी विनंती केली की, अहिंसेच्या मार्गाने हे यशस्वी होईल आणि गांधीजींची आठवण करून दिली.

ओकिनावच्या या भेटीने मला खूप काही पाहायला आणि शिकायला मिळालं. हेनोको तळाच्या विरोधी आंदोलनाने मला खूप ऊर्जा दिली. तसंच, पुढे अमेरिकेत जेव्हा मी यात्रा केली, तेव्हा तेथील शाळेत ओकाइनावा येथील या आंदोलनाची माहिती दिली. पुढे मी दक्षिण कोरियातील जेजू या बेटाकडे प्रस्थान केलं. ( उत्तरार्ध )

(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे असून, ते महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)

टॅग्स :saptarang