
विरोध अमेरिकन सैन्यतळास...
- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com
‘नमु म्यो हो रेन ग्ये क्यो’ या शांती मंत्राचा उच्चार आणि डमरूचा नाद करत आमची शांती यात्रा सुरू होती. ही शांतीची प्रार्थना फक्त मानवजातीसाठी नव्हती, तर सबंध सजीव-निर्जीव घटकांसाठी होती. मी आणि सबंध निपोन्झन बुद्धिस्ट भन्ते आणि त्यांचे अनुयायी, आम्ही हिरोशिमा या शहरात पोहचलो. लहानपणी ऐकलं होतं की, अणुबॉम्बमुळे हिरोशिमा शहरात एक झाडही उगवत नाही; परंतु तसं प्रत्यक्ष मी काही पहिलं नाही. इथं भरपूर झाडं आणि उंच उंच इमारती आहेत. पूर्ण जपानच्या कानाकोपऱ्यांतून खूप सारे लोक इथं येताना दिसत होते. बरेचसे शांततेत चालणारे मार्च मी रस्त्यावर पहिले, परंतु त्यांची भाषा जपानी असल्यामुळे ते काय म्हणतात, ते मला नाही समजलं; पण त्यांचं उद्दिष्ट हे ६ ऑगस्ट म्हणजे ‘हिरोशिमा डे’ होतं. आम्ही या यात्रेत हिरोशिमा अणुबॉम्बहल्ल्यातून वाचलेल्या खूप साऱ्या लोकांना भेटलो. ही मंडळी वयस्कर होती आणि त्यांच्या काही संघटना आहेत, ज्यांद्वारे हे एकमेकांना मदत करतात व सोबत आपल्या कहाणीतून लोकांना अणुबॉम्बबद्दल जागरूक करतात. त्यांतील काही लोकांनी मला त्यांच्या शरीरावरील घावही दाखवले. त्यांतील खूप साऱ्या लोकांचे परिवार या बॉम्बहल्ल्यात मारले गेले आहेत. प्रत्येकाची हृदयद्रावक अशी कहाणी होती.
सारे बुद्धिस्ट भन्ते, त्यांचे अनुयायी आम्ही सर्व ‘ॲटोमिक बॉम्ब डोम’समोर बसलो. या हल्ल्यात पडलेली ही इमारत अजूनही तशीच जतन करून ठेवली आहे. नुकसान झालेल्या अन्य इमारती भुईसपाट करण्यात आल्या. ही इमारत अणुअस्त्राचे भीषण परिणाम सांगत होती. दर वर्षी ६ ऑगस्ट रोजी इथं खूप मोठा कार्यक्रम आयोजिला जातो, ज्यात जगभरातील लोक सहभागी होतात. आज हजारो लोक इथं उपस्थित होते. तत्कालीन पंतप्रधान शिंझो आबे हेसुद्धा आले होते. शाळेतील लहान मुलांना इथं प्राधान्य होतं, त्यांनी काही गीतं म्हटली. सकाळी पाच मिनिटं मौन पळून या अणुबॉम्बमुळे मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली गेली. त्यानंतर एका स्मारकाजवळ जाऊन, पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. हे स्मारक एका कमानीच्या आकाराचं आहे, त्याच्या वरती सहाशे मीटर आकाशात जगातील पाहिला अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकण्यात आला.
ती सकाळची वेळ होती, एक तीन वर्षांचा शिन नावाचा मुलगा नेहमीप्रमाणे आपली तीन चाकांची आवडती सायकल घेऊन खेळत होता. तो त्या भीषण बॉम्बमध्ये मारला गेला. या छोट्या मुलाची ही कहाणी दगडाला पाझर फोडणारी अशी आहे. त्याचे वडील त्याला आणि त्याच्या आवडत्या सायकलला एकत्र पुरतात. नंतरच्या काळामध्ये ती सायकल काढली जाते. आता ती हिरोशिमा शांती पार्कच्या संग्रहालयात आहे आणि त्या सायकलला पाहून आपण त्या घटनेची दाहकता समजू शकतो. तो अणुबॉम्ब ६०० मीटर उंचीवर फोडण्यात आला, कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोक मारले जातील.
एक आगीचा मोठा ढग शहरावर तयार झाला, ज्यात त्याच्या दबावामुळे आणि उष्णतेमुळे खूप लोक हे तडफडत नदीकाठी मेले, तसेच उत्सर्जित किरणांचा परिणाम खूप वाईट होता. साधारण ७० हजार ते १ लाख ३५ हजार लोकांचा मृत्यू यात झाला, त्यातील साधारण २० हजार लोक हे कोरियन होते. या कोरियन लोकांना जपानने सक्तीने त्यांच्या कारखान्यांत कामाला ठेवलं होतं. मारले गेलेल्या कोरियन लोकांना स्मरून तिथं एक स्मारक खूप उशिरा जपानने बांधलं. (क्रमश:)
(सदराचे लेखक जगभर भ्रमंती करणारे असून, ते महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)
Web Title: Nitin Sonawane Writes Opposition To Us Military Bases
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..