
‘हे पहा महाशय, आमचे वाहन ब्रह्माद्री पर्वतावरील वळणदार मार्गावर धावत होते. अचानक वाहनावरचे आमचे नियंत्रण सुटले आणि विशालकाय पाषाणावर आदळले. आम्हाला आमचा परतावा हवाय.’
कात्रजजवळच्या घाटामध्ये एक अपघात झाला होता. गाडी दगडावर आदळली होती आणि गाडीमालक मोबाईलवर कुणाशीतरी बोलत होता. त्याला थोडीफार मदत करावी, म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. तसा तो माझ्याकडं पाहत म्हणाला, ‘महोदय, तुम्ही माझी मदत करू शकता का?’ मी म्हणालो, ‘होय बोला ना काय हेल्प करू?’ तशा त्याच्या भुवयांचा आकडा झाला. चिडलेल्या चेहऱ्यानं माझ्याकडं पाहत म्हणाला, ‘सगळ्यात आधी माझ्याशी संवाद करताना आंग्लभाषिक शब्द वापरू नका.’ ‘आरं नीघ मग. तडपड तू. कसनामी मदत करायला आलोय तर मलाच अक्कल शिकवतोय होय?’ असं काय काय मनात आलं होतं. पण, घाटात बिचारा एकटाच होता. त्याला म्हणालो, ‘ठिकाय.
बोला काय मदत करू?’ तसा त्यानं त्याचा मोबाईल माझ्याकडं दिला आणि म्हणाला, ‘या भ्रमणसंवादकावर विमा संस्थेचा प्रतिनिधी माझ्यासोबत वार्तालाप करतोय. त्याला तुमच्या शब्दांमध्ये सांगा की आत्ता मी कुठं आहे? केव्हापासून त्याला सांगतोय की मी ब्रह्माद्री पर्वतावर आहे तर तो हसतोय.’ मी मोबाईल हातात घेत म्हणालो, ‘‘अहो पण हा बोपदेव घाट आहे. कानिफनाथजवळचा. त्याला तसं सांगा. ब्रह्माद्री म्हणल्यावर तो कसा ओळखेल?’ तसा तो म्हणाला, ‘‘अहो, या पर्वतावर महादेवांची पूजा करण्यासाठी ब्रह्मदेव यायचे. म्हणून या पर्वताला ब्रह्माद्री पर्वत म्हणतात. त्यांच्या करजा नावाच्या कमंडलूमधून कऱ्हा नदीचा उगम झाला होता. तुम्हाला हा इतिहास ज्ञात नाही का महोदय?’
मला पुढं काय बोलावं तेच उमजेना. मी होकारार्थी मान डुलवत पुढं बोलण्याचं टाळलं आणि फोन कानाला लावत म्हणालो, ‘अहो बोपदेव घाटात यांचा अॅक्सिडंट झालाय.’ असं म्हणाल्यावर इन्शुरन्सवाल्याच्या डोक्यात उजेड पडला. त्यानं माझ्याकडून सगळी माहिती घेतली अन् फोन ठेवला. तिथून पुढं अर्धा तास तो अपघातग्रस्त व्यक्ती अस्खलित मराठी भाषेत तो मला पिडत होता आणि मी अस्सल गावरान भाषेत स्वत:लाच शिव्या देत होतो.
प्रत्येकवेळी दुसऱ्याची मदत करून पुण्यच पदरात पडते असे नाही, कधी कधी मनस्तापही पडतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.