स्वप्नाच्या माध्यमातून देवीचा वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book Mahayoddha Ambalaxmi

नितीन थोरात यांच्या कैलासवंशी कादंबरी मालिकेतील दुसरी कादंबरी म्हणजे अंबालक्ष्मी. खंडोबा ही पहिली कादंबरी.

स्वप्नाच्या माध्यमातून देवीचा वेध

नितीन थोरात यांच्या कैलासवंशी कादंबरी मालिकेतील दुसरी कादंबरी म्हणजे अंबालक्ष्मी. खंडोबा ही पहिली कादंबरी. खंडोबामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे खंडोबाचा जीवनप्रवास वाचायला मिळतो. त्याचप्रमाणे अंबालक्ष्मीमध्ये अंबाबाई आणि माता लक्ष्मी या दोन्ही देवींच्या आयुष्याचा प्रवास वाचायला मिळतो.

कोल्हापूरची देवी नेमकी अंबाबाई की महालक्ष्मी यावर अनेक वाद आहेत. कोल्हापूरची अंबाबाईच आहे असं म्हणत अंबाबाईचे भक्त पुरावे सादर करतात, तर कोल्हापूरची देवी महालक्ष्मीच आहे, असं महालक्ष्मीचे भक्त म्हणतात. या वादात न पडता नितीन थोरात यांनी अंबा आणि लक्ष्मी या दोघींना बहिणीच्या नात्याने वाचकांसमोर आणलं आहे.

कादंबरीची सुरुवात आदित्यच्या एका स्वप्नापासून होते आणि त्यानंतर सुरू होतो अंबाचा रोमहर्षक प्रवास. तपभृगू यांनी स्थापन केलेल्या रम्यनगरीवर असुरवीर कोल्हासुर आपल्या मुलांना सोबत घेऊन हल्ला करतो. त्याची परिणती म्हणून तपभृगू यांच्या कन्यांची म्हणजे अंबा आणि लक्ष्मी यांची ताटातूट होते. अंबा पोहचते श्रीलंकेत तर लक्ष्मी पोहचते देवरगुड्डूमध्ये. देवरगुड्डू म्हणजे आत्ताचे तिरुपती.

त्यानंतर अंबा, लक्ष्मी पुन्हा एकत्र येतात का? एकमेकांना ओळखतात का? कोल्हासुराचा बदला घेतात का ? वडिलांनी उभी केलेले रम्यनगरी पुन्हा ताब्यात मिळवतात का, अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना वाचक कमालीचा सुखावतो. लेखकाने अंबालक्ष्मी ही कादंबरी लिहिली असल्याने साहजिकच ही कथा काल्पनिक आहे. पण, ज्याप्रमाणे लेखकाने पौराणिक कथेलाही न्याय देत त्याचे संदर्भ या कादंबरीत पेरले आहेत, ते कमालीचे सुंदर आहेत. अगदी कोल्हापूरचे नाव पूर्वी करवीरनगरी का होतं आणि अंबा लक्ष्मी या दोघी वेगळ्या नसून एकच आहेत, हे आपण आज का म्हणतो याची उत्तरे पद्धतशीर मांडली आहेत.

हिमालयापासून श्रीलंकेपर्यंतचा वेगवेगळ्या अंगाने होणारा प्रवास वाचकांना गुंतवून ठेवतो. युद्धाचे प्रसंग आणि अंबा, लक्ष्मी या दोघी बहिणींची राजकीय व्यूहरचना अवाक करणारी आहे. बालाजी, खंडोबा, शक्तिपीठातल्या देवी यांचा वेगवेगळ्या संदर्भातून आलेला उल्लेखही वाखाणण्याजोगाच. देवांवर कादंबरी लिहिणे हे तसे आव्हानात्मक काम. पण, देवीभक्तांची भावना दुखावणार नाही, याची काळजी घेत अंबा आणि लक्ष्मी यांच्या आयुष्याचा संघर्षमय प्रवास वाचताना आपसूक त्यांच्या दैवी अस्तित्वाची जाणीव होते, हीच या कादंबरीची जमेची बाजू.

कैलासवंशी कादंबरी मालिकेतल्या खंडोबा या कादंबरीत लेखकाने टाईम ट्रॅव्हल ही संकल्पना वापरली होती. अंबालक्ष्मीमध्ये स्वप्नातून उलगडलेला प्रवास मांडला आहे. विशेष म्हणजे कादंबरीच्या शेवटी जोतिबाचा उल्लेख करत या कादंबरी मालिकेतील पुढची कादंबरी जोतिबावर असेल, असा धागाही लेखकाने सोडला आहे. महाराष्ट्रातले सर्व देव अवतारी आहेत. आपल्या देवांना बालपण नाही हा धागा मनात घेऊन नितीन थोरात यांनी सुरू केलेली कैलासवंशी कादंबरी मालिका नक्कीच आपल्या देवांना कल्पनेतील बालपण देईल, अशी खात्री वाटते.

पुस्तकाचं नाव : महायोद्धा अंबालक्ष्मी

लेखक : नितीन थोरात

प्रकाशक : न्यू ईरा प्रकाशन,

पुणे ( ८९९९३६०४१६ )

पृष्ठं : २७८

मूल्य : ३०० रुपये

टॅग्स :Booksaptarang