सोनेरी स्वप्नं : पाच कोटी जळाले

नेमकी दिवेघाटात गाडी पंक्चर झाली. दोन-अडीच किलोमीटर उतारानी माघारी यायचं का अर्धा किलोमीटर चढानं पुढं जायचं असा प्रश्‍न समोर होता. नेमकी मोबाईलला रेंज नाय.
Dream
DreamSakal
Updated on
Summary

नेमकी दिवेघाटात गाडी पंक्चर झाली. दोन-अडीच किलोमीटर उतारानी माघारी यायचं का अर्धा किलोमीटर चढानं पुढं जायचं असा प्रश्‍न समोर होता. नेमकी मोबाईलला रेंज नाय.

नेमकी दिवेघाटात गाडी पंक्चर झाली. दोन-अडीच किलोमीटर उतारानी माघारी यायचं का अर्धा किलोमीटर चढानं पुढं जायचं असा प्रश्‍न समोर होता. नेमकी मोबाईलला रेंज नाय. मदतीसाठी कुठली गाडी थांबेल अशीही चिन्हं नव्हती. अस्वस्थ होत गाडी बाजूला लावली आणि कठड्यावर बसून दरीकडं पाहू लागलो. तिथंच डोंगरात एकजण गाया राखत होता. पायजमा, टी-शर्ट, डोक्यावर कानटोपी आणि हातात काठी.

त्यानं माझ्याकडं पाहिलं आणि तंबाखू मळत येऊन बसला शेजारी. ‘गाडी पंक्चर झाली कायनू?’ त्याच्या या प्रश्‍नावर मी होकार दिला आणि समोरच्या मस्तानी तलावाकडं पाहू लागलो. ‘मग आता काय ठरवलय तुम्ही? असं बसून निघणारेका तुमच्या चाकातली पंक्चर?’ तसा मी त्याच्याकडं रागानं पाहत म्हणालो, ‘तुला काय करायचयं रं? मी असा बसून राहीन, नायतर जीव दिन. तुझं तू काम कर ना.’ तसा तो दरीकडं पाहत म्हणाला, ‘हितून जीव देऊन नाय मरणार साहेब तुम्ही. हितून उडी टाकली तर हातपाय मोडत्यान फक्त. अ‍ॅब्लूलन्स आली तरी फक्त तुम्हाला नेत्यान. गाडी हितच राहिल.’

हा जरा जास्तच बोलबच्चन दिसतोय. याची फिरकी घेतलीच पाहिजे असा विचार करत मी म्हणलं, ‘मग तुला काय वाटतं, काय केलं पाहिजे मी?’

तसा तो क्षणभर विचार करत म्हणाला, ‘तोका त्या समोरच्या कड्यावरुन उडी टाका. शंभर टक्के मरणार तुम्ही फिक्स. नाय मेला तर मी मारतो.’ त्याच्या या वाक्यावर मला जरा भीतीच वाटली. तसा तो हसत म्हणाला, ‘वाटली ना भीती ? मग गुमान न्यायची गाडी ढकलत आन टाकायची पक्ंचरला तर शिळं पाव खाल्ल्यावानी तोंड करून बसलाय. लय तर लय काय होईल घाम यीन, दम लागंल. पण तुम्हाला लोकांना त्याचच टेंशन येतं. तुमच्याकडं पाहून कसं वाटतयं माहितीये का साहेब, तुमच्या दोन करोडच्या मर्सिडीजला आग लागलीया आणि त्या गाडीत तुमचे पाच कोटी रुपये जळाल्यात. बरं तुमच्या गाडीकडं बघितलं तर तिची किंमत बारा हजारबी नाय. तोका तिकडं जंगलात माझ्या दोन गायाहेत दिसत्यात, त्या दोन गायांची किंमत दीड लाखहे. तरीबी माझ्या तोंडाव हाये का टेंशन? तुम्हा शहरी लोकांना मुंगी मेल्याचंबी सुतक पडतं. आमची म्हतारी ती एकदम खरहे, शिकलं तितकं हुकलं ते हे असं.’

असं म्हणत त्यानं माझ्याशेजारीच तंबाखूची पिचकारी मारली आणि ‘हाईक होय हाईक’ करत दगडाधोंड्यातून खाली उतरत गेला.

डोकं खाजवत मी गाडीकडं बघत होतो. ती गुमान उभी होती. शांतपणे उठलो आणि गाडीचं स्टँड काढून ढकलत निघालो. अर्धा किलोमीटवरतर पंक्चरचं दुकान होतं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com