सोनेरी स्वप्नं : डोळ्यांत दाटलेलं आभाळ

कोकणच्या घाटमाथ्यावरचं लेकरू असं म्हणालं आणि मी हसत हसत त्याच्याजवळ गेलो.
Dream
DreamSakal
Summary

कोकणच्या घाटमाथ्यावरचं लेकरू असं म्हणालं आणि मी हसत हसत त्याच्याजवळ गेलो.

‘काका तुमच्या मोबाईलमध्ये लय भारी फोटो येत असत्यान ना?’

कोकणच्या घाटमाथ्यावरचं लेकरू असं म्हणालं आणि मी हसत हसत त्याच्याजवळ गेलो. त्याला सोबत घेत एक सेल्फी काढला आणि त्याला फोटो दाखवत म्हणालो, ‘हा बघ कसला भारी फोटो आलाय आपल्या दोघांचा. पाठीमागचं आभाळ तर बघ कसलं भारी दिसतंय.’

मी मोबाईल त्याच्या हातात दिला. त्यानं मोबाईलमधला फोटो बघितला आणि भेदरत माघारी वळून बघितलं. डोंगरामागून येणारा आभाळाचा काळा डोह बघताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रडवेला चेहरा करत ते लेकरू ‘माये... माये’ ओरडत त्याच्या वस्तीकडं पळत गेलं. त्याला काय झालं तेच मला समजेना.

रविवारी बायकोसोबत साताऱ्याच्या बाजूला फिरायला गेलो होतो. मान्सूनचे दिवस सुरू झाले होते. हायवेवर कडक चहा घेतला. पुढं गेल्यावर मक्याचं गरमागरम कणीस घेतलं. भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगाही घेतल्या आणि वाट फुटेल तिकडे गाडी दामटत निघालो. आमची गाडी एका डोंगरवाडीपर्यंत पोचली. कमालीची हिरवळ होती. म्हणून फोटो काढायला थांबलो. शेळ्या वळणारी लहान लेकरं आमच्याकडं पाहत होती. हसत होती. त्यांचं लोभस हसू पाहून त्यांचा हेवाच वाटला. आपल्या लेकरांपेक्षा निसर्गात राहणारी ही लेकरं किती सुखी असतात, असं वाटू लागलं. निर्मळ हवा, प्रदूषण नाही, धावपळ नाही, शिवाय जो निसर्ग बघायला पुण्यापासून पाच तास प्रवास करून यावं लागलं, तो निसर्ग यांच्या उंबऱ्यात बसलेला असतो. आपलंही घर इथंच असायला हवं होत, असं वाटू लागलं.

हिरवळीत फोटो काढत असतानाच लेकरं बायकोसोबत बोलू लागली. त्यांच्यासोबत फोटो काढू लागली. तसं एक लेकरू माझ्याकडं आलं आणि मी त्याच्यासोबत फोटो काढला. डोंगराआडून आलेला काळ्या आभाळाचा डोह पाहून मात्र त्या लेकराच्या डोळ्यातच आभाळ दाटलं. ते धावत-रडत वस्तीकडं गेलं. तसं बायकोनं एका मुलीला त्याच्या रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, ‘मागच्या पावसाळ्यात रातच्या टायमाला त्याच्या घरावर दरड कोसळली होती. त्यात त्याची बारकी बहीण मेली. तवापासून तो पाऊस आला की घाबरतो.’

असं बोलून ती मुलगी निघून गेली. इतका वेळ सुंदर दिसणारा तो निसर्ग क्षणात भयावह वाटू लागला. गुमान गाडीला किक मारली आणि घराकडं निघालो. मनामध्ये कमालीची भीती घेऊन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com