
‘आपण माणुसकी जपली पाहिजे. या जगातल्या प्रत्येक जिवावर आपण प्रेम केलं पाहिजे. अहिंसेने जग जिंकता येतं तर मायेनं प्रत्येकाला आपलंसं करता येतं.
सोनेरी स्वप्नं : धन्य ते गुरुजी!
‘आपण माणुसकी जपली पाहिजे. या जगातल्या प्रत्येक जिवावर आपण प्रेम केलं पाहिजे. अहिंसेने जग जिंकता येतं तर मायेनं प्रत्येकाला आपलंसं करता येतं. कोणत्याही सजीवाप्रती राग, द्वेष, क्रोध, मत्सर ठेवून हाती काही लागत नाही. निःस्वार्थी प्रेमभावनेनं जीवन जगायला हवं,’ पांढरेशुभ्र कपडे घातलेले गुरुजी एका कार्यक्रमात असं म्हणाले आणि मला जगण्याचा जणू साक्षात्कारच झाला.
‘ठरलं भाऊ, आपण आजपासून या माणसाला आपला गुरू बनवायचा आणि याच्याकडून चांगल्या गोष्टी शिकायच्या. आयुष्यात लय पापं केली, आता सरळमार्गी चालायचं. या गुरुजींकडून जेवढं आत्मसात करता येईल तेवढं करायचं आणि आयुष्य सोपं करायचं,’ असा विचार करत मी त्या दिवशी घरी गेलो.
रात्री आयोजकांना फोन केला आणि गुरुजी कुठं राहतात असं विचारलं. आयोजकांनी पुण्यातला पत्ता दिला. दुसऱ्या दिवशीही गुरुजींचा प्रभाव होताच. मी पांढरेशुभ्र कपडे घातले आणि प्रसन्न मनानं गुरुजींकडं निघालो. नेमका सकाळी सकाळी पाऊस सुरू होता. गुरुजींच्या बिल्डिंगसमोरच्या रस्त्यावर थांबलो. तिथं झोपडपट्टीतली दोन-चार पोरं आडोशाला थांबलेली. तोंडात गुटखा. अंगावर छपरी कपडे, एकमेकांना शिव्या देणं असं त्यांच चालू. गुरुजींच्या सान्निध्यात आली, तर ही पिढी सुधारेल आणि पर्यायानं देश सुधारेल असं वाटत होतं. इतक्यात, सोसायटीतून एक कुत्र्याचं पिल्लू ओरडत बाहेर आलं.
पावसापाण्याचं आडोशाला बसलेल्या त्या पिलाला कुणीतरी काठी मारली होती. ते पिल्लू जसं रस्त्यावर आलं तसं त्या टुकार पोरांमधली दोन पोरं पावसात पळत आली. एकानं हात करून गाड्या थांबवल्या. दुसऱ्यानं ते पिल्लू उचललं आणि त्याला आडोशाला घेऊन गेला. तिसऱ्यानं तोवर शेजारच्या हॉटेलातून दूध-पाव आणला होताच. आता माझ्या मनात या पोरांविषयी थोडा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात यांनी गुरुजीचं सद््वचन ऐकलंच असणार, असा विचार करत मी गाडीतून उतरणार... तोच त्या सोसायटीतून एक पांढरी लुंगी नेसलेला माणूस हातात काठी घेऊन बाहेर आला. संतप्तपणे तो अवतीभवती बघत होता. तो कदाचित कुत्र्याच्या पिल्लाला शोधत होता. हा महाभाग दुसरा तिसरा कुणी नव्हता, प्रत्येक जीवावर प्रेम करून माणुसकी जपा, असं व्यासपीठावरून ठणकावून सांगणारा गुरुजी होता...