
सकाळ सकाळ मित्राचा फोन आला आणि मी एकदम स्तब्धच झालो. वर्षभरापूर्वी त्यानं त्याच्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं होतं. तो जॉबला जातो. त्याची बायकोही नोकरी करते.
सोनेरी स्वप्नं : स्वामी तिन्ही जगाचा ‘देखाव्याविना’ भिकारी!
‘नित्या कुठाय रं तू? आईला भेटायला जायचं होतं. येतो का?’
सकाळ सकाळ मित्राचा फोन आला आणि मी एकदम स्तब्धच झालो. वर्षभरापूर्वी त्यानं त्याच्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं होतं. तो जॉबला जातो. त्याची बायकोही नोकरी करते. मुलगा शाळेत असतो. आई आजारपणानं आणि म्हतारपणानं थकलेली. तिची काळजी कोण घेणार? त्यापेक्षा ती वृद्धाश्रमात बरी, अशा समजूतदार विचारांची चादर पांघरून त्यानं एके दिवशी आईला पुण्याजवळच्या एका वृद्धाश्रमात पोहोच केलं.
तसा तो वाईट नाही. महिन्यातून दोन वेळा आईला भेटायला जातो. दोन महिन्यातून एकदा त्याची बायकोही ट्रिप म्हणून वृद्धाश्रमाला भेट देते. भरपूर खाऊ नेतात. आईला काय पाहिजे, काय नको सगळं पोहोच करतात. एक दिवस मीही त्याच्यासोबत गेलो होतो. तेव्हा त्याच्या आईची मान शरमेनं खाली झुकली होती. त्यानंतर कधीच मला त्या वृद्धाश्रमाकडं जाण्याची इच्छा झाली नाही. पण, आज त्याचा फोन आला आणि नकार देणं जमलं नाही. मी त्याला यायला सांगितलं. रविवारचा दिवस होता. तो, त्याची बायको आणि मुलगा तिघंही आले. त्यांच्यासोबत वृद्धाश्रमात गेलो, तर तिथं कितीतरी हायफाय मुलं आपल्या आईबाबांना भेटायला आले होते.
पालक मेळावा वगैरे असावा, असं वाटत होतं. तास-दोनतास थांबलो. सगळी मुलं आईसोबत फोटो काढत होती. हसत होती. वातावरण प्रसन्न होतं. मित्राच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र पाहिजे तेवढा आनंद नव्हता. मी त्यांच्याशेजारी बसलो. तशा त्या मला म्हणाल्या, ‘तुझे पत्रकार ओळखीचे आहेत का रे?’ काकूंचा प्रश्न ऐकून मला धक्का बसला. वाटलं मुलाविरोधी बातमी छापायला लावतात की काय? मी म्हणालो, ‘होय काकू, आहेत की ओळखीचे. काय काम आहे?’ तशा त्या म्हणाल्या, ‘त्याला सांग की रोज ‘मदर्स डे’ असायला हवा अशी बातमी छापायला. ‘मदर्स डे’ला बघ कशी लेकरं माईच्या कुशीत शिरू शिरू फोटो काढत्यात. रोज अशी लेकरं कुशीत शिरली की किती बरं वाटलं सगळ्या माउलींना.’
दोन वाक्यांनी डोळे ओले केले. होकारार्थी मान डुलवली आणि लांब झाडाखाली येऊन बसलो. वातावरण एकदम प्रसन्न होतं.
वृद्धाश्रमातलं आणि सोशल मीडियावरचंही.
Web Title: Nitin Thorat Writes Old Age Home
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..