सोनेरी स्वप्नं : पिकलं पान

‘म्हतारं माणूस आणि लहान लेकरू यामध्ये काहीच फरक नसतो हो. दोघंही अगदी सारखीच.’
old people with children
old people with childrensakal
Summary

‘म्हतारं माणूस आणि लहान लेकरू यामध्ये काहीच फरक नसतो हो. दोघंही अगदी सारखीच.’

‘म्हतारं माणूस आणि लहान लेकरू यामध्ये काहीच फरक नसतो हो. दोघंही अगदी सारखीच.’

असं म्हणत त्या आजोबांनी डोळे टिपले आणि मी क्षणभर सुन्नच झालो. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने घराजवळच्या महादेव मंदिरात गेलो होतो. गर्दी होती. दर्शन घेऊन बाहेर मोकळ्या जागेतल्या बाकडावर येऊन बसलो. तिथं एका लहान मुलासोबत त्याचे आजोबा चेंडू खेळत होते. छान वाटलं, मी त्या दोघांकडं पाहत होतो. तसे आजोबा दमले आणि माझ्याशेजारी येऊन बसले. माझे पांढरे केस पाहून म्हणाले, ‘मग, तुम्ही नाही आणलं का तुमच्या नातवाला?’ क्षणात डोक्यात तिडीक गेली. म्हणलं बाबा, ‘तुमच्या नातवाएवढा मुलगा आहे माझा.’ तसे ते आजोबा स्मित करत म्हणाले, ‘होय का? उशिरा लग्न झालं वाटतं तुमचं?’ मी वैतागून म्हणालो, ‘नाय हो लग्न वेळेतच झालं.’ तसे गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘मग मुलं उशिरा झालं वाटतं. हरकत नाही. मात्र, मग आज्जींना नाही आणलं का सोबत?’ हा साठी पार केलेला थेरडा माझ्या बायकोला कसंकाय आज्जी म्हणतोय? असा विचार करत मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. तसा तो क्षणभर शांत झाला आणि म्हणाला, ‘टिंगल केली हो तुमची. लोकांना चिडवायला मला खूप आवडतं. ते चिडले की मला ओरडतात आणि मग त्यांच्या ओरडण्याचा विचार करत घरी निघून जातो. घरी एकटा असतो हो. तुम्हाला वाटलं असेल ते माझा नातू आहे?’ मी होकारार्थी मान डुलवली.

तसा तो म्हणाला, ‘नाही. माझ्या मुलाने आणि त्याच्या बायकोने मला घराबाहेर काढलंय. मी इथंच जवळ एक खोली घेऊन एकटा राहतो. मग शेजाऱ्यांच्या या मुलासोबत येत असतो खेळायला. तेवढाच विरंगुळा. म्हतारं माणूस आणि लहान लेकरू यामध्ये काहीच फरक नसतो हो. दोघंही अगदी सारखीच. निरासग. दोघांनाही फक्त एकमेकांची साथ हवी असते.’ असं म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मला बिचाऱ्याचं वाईट वाटलं. इतक्यात मंदिरातून त्या मुलाचे आईवडील आले. मुलगा त्यांच्याकडं पळत गेला. तसं मी उभं राहत त्या जोडप्यासमोर गेलो आणि म्हणालो, ‘तुम्ही खूप पुण्याचं काम करताय.’ माझं बोलणं जोडप्याला समजेना. तसं मी म्हणालो, ‘लेकराने आणि सुनेने सोडून दिलेल्या या आजोबांना तुम्ही तुमच्या मुलासोबत खेळायला पाठवून जो आनंद देताय हे खूप मोठं पुण्याचं काम आहे.’ तसा तो माणूस त्या आजोबांकडं पाहत म्हणाला, ‘बाबा, तुम्ही यांना पण सांगितलं का लेकराने घराबाहेर काढलं म्हणून? का अशी थट्टा करता बाबा तुम्ही प्रत्येकाची?’ असं म्हणत तो त्या आजोबाला आणि लेकराला घेऊन गाडीकडं निघाला. मी चकित होऊन त्या आजोबाकडं पाहतच होतो. ते कुटुंब गाडीजवळ गेलं. मीही माझ्या गाडीपाशी येऊन थांबलो. आजोबा गाडीत बसले आणि मला जीभ दाखवत निघून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com