सोनेरी स्वप्नं : भर चौकात श्रीमुखात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Begger Girl
सोनेरी स्वप्नं : भर चौकात श्रीमुखात!

सोनेरी स्वप्नं : भर चौकात श्रीमुखात!

आठवलं की आत्ताही अंगावर काटा येतो. प्रसंगच तसा घडला होता. पुणे स्टेशन परिसर माहिती असेलच. तिथल्या अलंकार थिएटरसमोरच्या सिग्नलला एका मित्राची वाट पाहत थांबलो होतो. इतक्यात एक आठदहा वर्षाची पोरगी पेन विकायला आली.

‘घ्या ना साहेब, दहा रुपायला तीन पेनहेत,’ असं म्हणत तिनं माझ्यासमोर पेन धरले. मलाही त्या सिग्नलला थांबून कंटाळा आला होता. उगीच तिच्यासोबत गप्पा मारायच्या म्हणून म्हणालो, ‘या दहा रुपयातले तुला किती रुपये मिळतात गं?’ साशंक नजरेनं तिनं माझ्याकडं पाहिलं आणि पुन्हा म्हणाली, ‘घ्या ना साहेब, दहा रुपयाला तीन पेनहेत.’ तसा मी वैतागून म्हणालो, ‘घेतो की, पण मला आधी सांग दहा रुपयातले तुला किती मिळतात?’

तशी ती गप्प झाली आणि सिग्नलवर थांबलेल्या गाड्या पाहू लागली. तिच्यासोबत एक फाटका पोरगाही होता. तो माझं बोलणं कान देऊन ऐकत होता. तांबरलेले केस, तेलकट पँट आणि मातकट सदरा घातलेल्या त्या पोरानं माझ्याकडं पाहिलं आणि हसत म्हणाला, ‘दहा रुपयाचे पेन इकल्याव हिला दोन रुपये मिळत्यात साहेब.’ त्या मुलीच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तिची दयाही येत होती, तसा मी त्या पोराला म्हणालो, ‘मग तू कनाय पेन विकत तिच्यासारखं?’ तसा तो पोरगा हात उडवत म्हणाला, ‘छ्या, तासाभरात तिला फक्त पाच गिऱ्हाईकं मिळत्यात. पन्नास रुपयातले दहा रुपये तिच्या वाट्याला येत्यात. पण मला तासाभरात तीस चाळीस रुपये मिळत्यात. तिला म्हणतोय सोड हमाली अन् माझ्यासारखी भीक माग तर ऐकत नाय कुत्री.’

तो पोरगा कमालीच्या आत्मविश्‍वासानी बोलत होता आणि त्याच्याशेजारी उभी असली बारकी दोन लेकरं त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती. त्या बारक्यांच्या डोळ्यात त्या पोरीच्या कष्टाविषयीची तुच्छ भावना आणि भीक मागणाऱ्या त्या पोराकडं पाहण्यात असलेला आदर स्पष्ट जाणवत होता. तसा मी चकित होत म्हणालो, ‘भीक मागायला लाज नाय वाटतं का? तिच्यासारखं जरा स्वाभिमानानी जगायला शिक की. तुझ्या बारक्या भावांवर काय परिणाम होईल याचा विचार केलाय का?’ तसं ते पोरगं म्हणलं, ‘एवढं वाईट वाटतयं तर घ्या तिच्याकडून शंभर रुपयाचे पेन. दहा रुपयाचा वडापाव तरी खाईल ती.’

भर चौकात त्या लेकरानी सणकन शाब्दिक चपराक लगावली होती. मी क्षणात मोबाईल कानाला लावला आणि ‘आलो आलो तिकडच थांब,’ असं म्हणत त्या चौकातून पळ काढला. भिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्‍या त्या लेकरांसमोर थांबण्याची माझी हिंमतच नव्हती....

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
loading image
go to top