सोनेरी स्वप्नं : पुष्पाचा दिलजले आशिक

‘भावा ‘दिलजले’मधल्या शाहरुख खानसारखा लव्ह करतो मी पुष्पावर. पण, ती ‘पीके’मधल्या काजोलसारखी मला भावपण देत नाय राव.’
pushpa
pushpasakal
Summary

‘भावा ‘दिलजले’मधल्या शाहरुख खानसारखा लव्ह करतो मी पुष्पावर. पण, ती ‘पीके’मधल्या काजोलसारखी मला भावपण देत नाय राव.’

‘भावा ‘दिलजले’मधल्या शाहरुख खानसारखा लव्ह करतो मी पुष्पावर. पण, ती ‘पीके’मधल्या काजोलसारखी मला भावपण देत नाय राव.’

डबडबलेल्या डोळ्यानं माझ्याकडं पाहत गहिवरल्या स्वरात मन्या जुन्या प्रेयसीच्या आठवणीत बोलत होता. त्यामुळं ‘दिलजले’मध्ये शाहरुख नाही आणि ‘पीके’मध्ये काजोल नाही, हे त्याला सांगायचही धाडस होत नव्हतं. मी होकारार्थी मान डुलवत त्याला म्हणालो, ‘‘हे बघ, व्हॅलेंटाइन्स हे फक्त निमित्त असतं. प्रेम तर आयुष्यभर करता येतं. तुला प्रत्येक ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिची आठवण येती, यातून तुझ्या खऱ्या प्रेमाची ताकद दिसून येते. तिचं लग्न झालंय. तुझ्या प्रेमाच्या आशीर्वादानं ती आयुष्यभर खूश राहील. आता तिचा विचार सोडून दे आणि तुझ्या बायकोला या ‘व्हॅलेंटाइन डे’ला काय गिफ्ट देणार, याचा विचार कर.’

तसा तो डोळे पुसत म्हणाला, ‘मी या ‘व्हॅलेंटाइन डे’ला बायकोला पिवळ्या रंगाची साडी देणार. पुष्पाला पिवळा रंग खूप आवडायचा.’

तसा मी वैतागत म्हणालो, ‘अरे पण तुझ्या बायकोला पिवळा रंग सूट होईल की नाही, याचा विचार कर ना गयबान्या. पुष्पाला आता दोन लेकरं झाल्यात ना बाबा.’

मी जीव तोडून बोललो, पण त्याला काही फरक पडला नाही. तो दु:खी हिरोसारखं स्मित करत म्हणाला, ‘‘आता तिला दोन लेकरं झाल्यात. मलाही दोन लेकरं झाल्यात, पण प्रेम कधी कमी होतं असतं का रे नित्या?’

‘मन्या, अरे तुला दोन नाही तीन मुलं आहेत रे बाबा.’

असं म्हणत मी त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंकडं पाहिलं. तसा डोळे पुसत तो म्हणाला, ‘पुष्पा लग्नाआधी म्हणायची की, आपल्याला तीन मुलं व्हावीत. बास, तिची इच्छा मी माझ्या घरी पूर्ण केली रे.’ असं म्हणत तो हुंदके देत रडू लागला.

मन्याला आता खरोखरच लाथ घालावी वाटत होती. त्याच्या उत्तराने हसावं की त्याच्या भावनांचा आदर करून आपणही भावनिक व्हावं, याचा मला मेळच बसत नव्हता.

इतक्यात त्याचा फोन वाजला. मोबाईलवर पुष्पा नाव वाचून मी शॉकच झालो. काय अफाट प्रेम आहे या पठ्ठ्याचं. खरंच प्रेमामध्ये काय अद्वितीय ताकद असते याची मला प्रचिती आली होती. पुष्पा मुंबईला असते. गण्या सोलापूरला. तरीही याच्या मनातले भाव तिच्यापर्यंत पोहचले होते.

लैला-मजनू, हीर-रांझा, रोमिओ ज्युलिएट यांचं प्रेम मला मन्या आणि पुष्पापुढं फिकं वाटू लागलं. मन्या मात्र रडवेल्या डोळ्यानंच मोबाईलकडं पाहत होता. कदाचित फोन पाहून त्याला धक्का बसला असेल असा विचार करत त्याला भावनिक साद घालत मी म्हणालो, ‘मन्या आता तरी शांत हो बाळा. हे बघ ‘व्हॅलेंटाइन वीक’ सुरू झाला आणि तुझ्या मनातली तळमळ पुष्पापर्यंत पोहचली. घे फोन घे आणि काही क्षण बोल तिच्याशी.’

डबडबलेल्या डोळ्यानं त्यानं नकार दिला आणि नाक पुसत लांब जाऊन बसला. फोन माझ्या हातात होता. वाजतच होता. निदान आपण तरी मन्याची अवस्था पुष्पाला सांगावी म्हणून मी फोन उचलला.

पलीकडून आवाज आला, ‘घरी येताना अर्धा लिटर दूध आणि गिरणीत ठेवलेल्या दोन पायली ज्वारीचं दळण घेऊन या अन् तायडीला सर्दीच्या औषधाची बाटली आणा मेडिकलमधून. नुसतं नाक गळतयं तिचं.’ फोन कट.

मी क्षणभर स्तब्धच झालो. मन्याजवळ जात म्हणालो, ‘‘मन्या, पुष्पा असं काय बोलली रे. घरी येताना दळण, दूध आणि औषधाची बाटली वगैरे,’’ तसा आवंढा गिळत मन्या म्हणाला, ‘‘मी पुष्पाला लय लव करतो रे नित्या. लय म्हणजे लय लव करतो. म्हणून तिच्या आठवणीत मी बायकोचा नंबरबी पुष्पा नावानी सेव्ह केलाय.’’

अक्षरश: त्याच्या पाठीत लाथ घालत मोबाईल त्याच्या तोंडावर फेकत मी तडातडा घराकडं चालत निघालो. खरोखर गण्या मातीत पडल्या पडल्या रडत होता. पण, मला त्याची आजिबात कीव येत नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com