सोनेरी स्वप्नं : वेदनांची शेकोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shekoti

रात्री गप्पा मारायला मित्रमंडळी जमा झाले. शेकोटी पेटवली. पण, रोजच्यापेक्षा आज काट्या कमी होत्या. तसा एक जोडीदार तंबाखू मळत म्हणाला, ‘आरं, काल तर सरपणाचा ढीग बघितला होता.

सोनेरी स्वप्नं : वेदनांची शेकोटी

‘साहेब, थोडंसं सरपान नेऊ का? उद्या माळावर गेले की सरपनाची एक मोळी आणून टाकते तुमच्या दारात?’ चौथी-पाचवीतली पोरगी असं म्हणाली आणि मी तोंड वाकडं करत होकार दिला. तिनं लगबगीनं माझ्या घराशेजारच्या काट्याकुट्याचं सरपण गोळा केलं मोळी बांधून डोक्यावर घेतली.

रात्री गप्पा मारायला मित्रमंडळी जमा झाले. शेकोटी पेटवली. पण, रोजच्यापेक्षा आज काट्या कमी होत्या. तसा एक जोडीदार तंबाखू मळत म्हणाला, ‘आरं, काल तर सरपणाचा ढीग बघितला होता. कुठं गेला?’ त्याला म्हणलं, ‘आरं एक बारकी पोरगी आली होती सरपण मागायला. वडाच्या वस्तीवरची होती बहुतेक. दिली एक मोळी.’ तसा दुसरा वैतागत म्हणाला, ‘तुला यडबिड लागलंय का रं? हितं थंडीनं पार आकडा व्हायची वेळ आलीया अन् खुशाल सरपण देऊन टाकलं.’ तिसरा म्हणाला, ‘वडाच्या वस्तीवरची पोरं लय बिलिंदर. सरपन विकत्यात अन् दहा-वीस रुपये मिळाले की बिड्याकाड्या पेत्यात.’

सगळेजण वैतागले होते. मी शांत होत सगळ्यांकडं बघितलं. स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे असूनही त्यांना शेकोटी हवीच होती. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळेजण निघून गेले.

दुसऱ्या दिवशी ती पोरगी बरोबर सकाळी नऊ वाजता लाकडाची मोळी घेऊन आली. मी चहाच पेत बसलेलो. मला बघत हसत हसत तिनं मोळी दारासमोर टाकली आणि म्हणाली, ‘साहेब होका तुमचं सरपन. काल तुम्ही सरपन नसतं दिलं, तर तात्याच्या जेवणाचा डबा नसता झाला अन् मला अन् माईला दोघांनाबी सकाळ सकाळ मार खावा लागला असता. थंडीत तात्या मारत्यात तवा लय लागतं.’ असं म्हणत तिनं चिमुकले हात जोडले आणि निघून गेली.

चहामधून हळुवार वाफा येत होत्या. सूर्याच्या लांबवर पसरलेल्या किरणांमधून ते लेकरू शांतपणे घराकडं निघालं होतं.

टॅग्स :saptarang