सोनेरी स्वप्नं : गावाकडचा डॉन, गण्याभाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

don

‘आरं मी वाघहे वाघ. कुणाच्या बापाला भेत नसतो. नडला की तोडला.’

सोनेरी स्वप्नं : गावाकडचा डॉन, गण्याभाई!

‘आरं मी वाघहे वाघ. कुणाच्या बापाला भेत नसतो. नडला की तोडला.’

गण्या असं म्हणाला आणि मी होकारार्थी मान डुलवली. तसा त्याच्या गाडीवर पाठीमागं बसलेला बंडा म्हणाला, ‘आरं नित्याभाऊ, आपल्या गण्याभाईनं मागच्या वेळी लायटीच्या खांबावर उभं राहून आंदोलन केलं होतं. एमेसीबीवाल्यांना लोडशेडिंगच बंद कराय लागलं. कितीबी मोठा डोंगर असूदे गण्याभाईसमोर, सपाटच होतो. म्हणूनच आपल्या गण्याभाईला गावाकडचा डॉन म्हणत्यात डॉन.’

बंडाच्या या वाक्यावर मी होकारार्थी मान डुलवली आणि गाडी बाजूला घेतली. मागच्या रविवारची गोष्ट. बंडा, गण्या आणि मी पुरंदर किल्ल्याला निघालो होतो. सासवड गाव ओलांडलं आणि आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो.

गण्या पुन्हा बोलू लागला,

‘तुला सांगू का नित्याभाऊ, मागच्या टायमाला पुण्यात आलो होतो. तर एक सरकारी कर्मचारी म्हणला आयकार्ड दाखव. त्याला म्हणलं नाय आयकार्ड काय करणार? गुमान मला ऑफिसमधी जाऊदे नायतर परिणाम लय वाईट होत्यान. भेला ना गडी. गुपचूप बाजूला झाला. नाद करा, पण आपला कुठं?’

बंडा मोठ्या कौतुकानं गण्याभाईकडं पाहत होता. मलाही नवल वाटलं. ‘नित्याभाऊ, तुला कुणीबी त्रास देत असलं की बिनधास्त मला फोन लावायचा. कुणीबी असू, नाय त्या रट्ट्यात वठणीवर आला तर बोल.’

मी होकारार्थी मान डुलवली आणि गाडीला किक मारली. तिथून पुढं गण्याभाई आणि त्याचा चेला बंडा गण्याभाईच्या स्टोऱ्या सांगत होता आणि मी कौतुकानं ऐकत होतो.

पुरंदरचा घाट संपला आणि आम्ही तिघं किल्ल्याभोवतीच्या आर्मी मिलटरी कॅम्पसमोर आलो. भलीमोठी रायफल घेतलेल्या जवानानं आम्हाला थांबवलं आणि ओळखपत्र मागितलं. मी ओळखपत्र दाखवलं. बंडानेही ओळखपत्र दाखवलं. आम्ही दोघं गण्याभाईकडं पाहत होतो. जवानाच्या हातातली रायफल बघत आवंढा गिळत गण्याभाई म्हणाला, ‘माझ्याकडं ओळखपत्र नाय.’

त्यानंतर मी आणि बंडा मस्तपैकी किल्ला फिरून आलो. गण्याभाई तीन तास शांतपणे घाटातल्या शेळ्या मोजत आमची वाट पाहत थांबला होता...

टॅग्स :villagesaptarang