साधना सलमाची! (निवेदिता ठकार)

निवेदिता ठकार
रविवार, 16 जून 2019

आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता.
मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.''

आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता.
मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.''

फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की
मिसेस प्रधान बोलत आहेत. म्हटलं : 'बोला!''
तर म्हणाल्या : 'माझं एक काम होतं. कराल का प्लीज?''
-म्हटलं : 'हो, करीन की. सांगा तर खरं!''
तशी त्या म्हणाल्या : 'आमची बदली झाली आहे जबलपूरला अन्‌ माझ्याकडं एक मुलगी रोज वाचून घ्यायला येत असते...तर तिला तुमच्याकडं पाठवू का?''
'जरूर पाठवा.''
'ती अंध आहे. बुद्धीनं खूप तल्लख. नीटनेटकी, सालस आहे आणि विशेष म्हणजे अतिशय नम्र आहे,'' त्यांनी माहिती दिली.
मनात म्हटलं, "ती तुमच्यासारखीच!'
मिसेस प्रधानांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कुणाला नावं ठेवणार नाहीत. मी तर त्यांना "भावना प्रधान'च म्हणत असते!
प्रधान पुढं म्हणाल्या : 'तिचं नाव सलमा. जन्म इथलाच मुंबईचा. पहिल्यापासून मराठी शाळेत शिक्षण, त्यामुळे मराठी उत्तम बोलते. ती दुपारी अडीच-तीनला येते. पाच-साडेपाचपर्यंत बसते.''
- मी म्हटलं : 'ठीक आहे. मला जमेल. येऊ देत तिला.''
दुसऱ्या दिवशी प्रधानांच्या बाईबरोबर सलमा आली. मी दारात असतानाच ती मला म्हणाली :'नमस्ते ताई, मी सलमा.''
'ये नं आत.''
तिनं पायातल्या चपला दाराच्या कोपऱ्यात काढून ठेवल्या.
मी तिला हाताला धरून सोफ्यावर बसवलं आणि थंडगार सरबत दिलं तशी ती म्हणाली : 'रोज नाही हं असे लाड करायचे.''
'अगं, आज तर घे! पुढचं पुढं पाहू या.''
तिचं सरबत संपल्यावर तिच्या हातचा ग्लास घेऊन मी टी-पॉयवर ठेवला.
- मला म्हणाली : 'थॅंक यू.''
- मी म्हटलं : 'ताई म्हणतेस नं? मग थॅंक यू वगैरे काही नाही'' तर हसली.
'हं, तर चला...आज कुठल्या विषयाचं पुस्तक वाचायचं आहे?''
तिनं खुणेचं पान उघडून पुस्तक माझ्या हाती दिलं. पुस्तक इतिहासाचं होतं. "प्लासीची लढाई'चा भाग वाचायचा होता. युद्ध कुणात झालं, प्रत्यक्ष युद्धात काय रणधुमाळी झाली, युद्धाचे परिणाम हे एकेक सगळं टप्प्याटप्प्यानं मी तिला वाचून दाखवलं. युद्धाचा सन सांगितला. मग मी तिला खाली दिलेला एकेक प्रश्‍न विचारू लागले. मी वाचताना ती लक्षपूर्वक ऐकत होती. त्यामुळे तिनं प्रत्येक प्रश्‍नाचं मुद्देसूद उत्तरं दिलं. मला खूप कौतुक वाटलं.
तिला मी पटकन "शाब्बास' म्हटलं. तिच्या हातात घड्याळ होतं ते तिनं हातानं चाचपून पाहिलं. मीही भिंतीवरच्या घड्याळाकडं पाहिलं. पाचला पाच कमी होते.
- मला म्हणाली : 'आता पुरे. उद्या याच वेळेला येईन.''
- मी म्हटलं : 'जाणार कशी? येऊ का सोडायला?'' तर म्हणाली : 'मी येताना तुमच्या इथल्या पायऱ्या मोजूनच आले अन्‌ पुढं रोजच्या सवयीनं घरापर्यंत पावलं मोजूनच जाते.''
- मी सलमाला म्हटलं : 'घरी गेल्यावर आठवणीनं फोन कर पोचल्याचा.'' त्यानुसार तिचा फोन आला.
***

साडेपाच वाजता यजमान हॉस्पिटलमधून आले. आमचं चहा-खाणं आटोपलं. मी त्यांना सलमाविषयी सांगितलं. तर म्हणाले : 'चांगलं आहे. आपण तिला आमच्या हॉस्पिटलमधल्या डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवू या एकदा.''
-मी सांगितलं : 'तिच्यावर सर्व उपचार करून झालेत. काही राहिलेलं नाही. जन्मत:च ती अंध आहे.''
दुसऱ्या दिवशी मी माझं सर्व आवरून सलमाची वाटच पाहत होते. दहा मिनिटांनी ती आलीच. मी दार उघडलं. एकटीच आली होती. तिला म्हटलं : 'सलमा, आज तू छानच दिसत आहेस.'' तर लाजून हसली. तिचा ड्रेसही छान होता. ती चपला काढून सोफ्यावर बसली. तिला पाणी दिलं. नंतर विचारलं : 'आज कोणता विषय वाचायचा?''
'भूगोल''
खुणेनंच पान उघडून तिनं पुस्तक मला दिलं.
मी वाचायला सुरवात केली. महाराष्ट्राचं हवामान, त्यावर अवलंबून असणारी पिकं वगैरे माहिती मी वाचत होते.
मधूनच तिला काही शंका वाटल्या तर त्या ती विचारत होती.
मी माझ्या परीनं निरसन करत होते.
मी विचारलं : 'सलमा, तुला माझं वाचलेलं समजत तर आहे ना?'' तर म्हणाली : 'खूपच छान वाचता तुम्ही, ताई. अगदी प्रधान बाईंसारखंच!'' सलमाचं हे नववीचं वर्षं असल्यामुळे फारसा ताण नव्हता दोघींनाही;
पण वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर वाचनाचा वेग वाढवून, तोंडी प्रश्‍नोत्तरं भराभर सोडवून घेणं सुरू झालं. दिवस भराभर जात होते. वार्षिक परीक्षा झाली. काही दिवसांनी निकालही लागला. सलमा मला निकाल दाखवायला घेऊन आली. तिला 85 टक्के गुण मिळाले होते. मी तिला अभिवादन करून एक चॉकलेट दिलं. तिनं पटकन वाकून नमस्कार केला. मला तिचं खूप कौतुक वाटलं. म्हटलं : 'हे रीती-रिवाज कुठं शिकलीस?''
'पूर्वी आमच्या शेजारी पानसेकाकू राहायच्या. लहानपणी आम्ही सर्व मुलं त्यांच्या मुलांबरोबर "शुभं करोति' म्हणून सगळ्या मोठ्यांना नमस्कार करत असू. तीच सवय कायम आहे,'' तिनं सांगितलं.
तिच्या पाठीवरून मी प्रेमानं हात फिरवला तेव्हा म्हणाली : 'आता आम्ही भावंडं सुटीत चार-पाच दिवस मावशीकडं गावाला जाणार आहोत. आल्यावर दहावीतल्या मुलींना होस्टेलमध्ये राहावं लागेल. कुठं बाहेर पाठवत नाहीत. शाळा आणि होस्टेल माझ्या घरासमोरच आहे आणि तुमच्या घरापासूनही जवळच आहे. मधल्या सुटीत आम्ही आठ-दहा मुली एकदमच बसत जाऊ, तर तुम्ही येऊ शकाल का?''
- मी म्हटलं : 'अवश्‍य येईन, कधीपासून यायचं ते 2-3 दिवस अगोदर कळव.''
***

सलमा गावाला जाऊन 10- 12 दिवस झाले होते. सहजच मला वाटलं तिच्या घरी जावं. तिची शाळा मला माहीत होती आणि तिचं घर समोरच आहे असं तिनं पूर्वी सांगितलं होतं म्हणून निघाले. घर लगेच सापडलं. बाहेरच्या खोलीतच सलमा आणि तिचे वडील बसले होते. त्यांना "नमस्ते' म्हटलं. त्यांनी "अस्सलाम आलेकुम' म्हटलं.
मी म्हणाले : 'आप की बिटिया पढाई में बहोत ही तेज है।''
तर हात वरच्या दिशेनं उंचावून म्हणाले : 'सब उस की, अल्लाताला की देन है।'
मी म्हणाले : 'सलमा भी कुछ कम मेहनती नही है। पढाई में थोडा भी कसूर करती नही।''
सलमा म्हणाली : 'ताई, तुमचं आपलं काहीतरीच!''
मग ती आत गेली आणि एक सफरचंद कापून त्याच्या फोडी सुबकपणे प्लेटमध्ये रचून घेऊन आली.
'सलमा बिटिया, पहले पानी तो पूछना था।''
'माफी चाहती हूँ अब्बाजान'' असं म्हणत पाणी घेऊन आली.
- मी दोन फोडी खाऊन निघाले. सलमा दारापर्यंत आली.
- मला म्हणाली :'शाळेत कधीपासून यायचं ते मी आमच्या हेडबाईंना विचारून दोन-तीन दिवसांत मी तुम्हाला कळवते.''
एक दिवस सलमा घरी आली आणि "अमुक दिवसापासून शाळेत यायचं वाचायला' असं तिनं मला सांगितलं.
मी तिला "बस' म्हटलं तर म्हणाली : 'माझी शिकवणीची वेळ झाली आहे,'' आणि पटकन गेलीसुद्धा!
मला काही कळलंच नाही. कुणाची, कसली शिकवणी? काहीच बोध होईना. तो विचार तेवढ्यावरच थांबवून मी माझ्या कामाला लागले. सलमाची शाळा सुरू व्हायला अजून 15 दिवस तरी होते म्हणून मी नागपूरला मावशीच्या नातीच्या लग्नासाठी काही दिवस गेले.
मी बऱ्याच वर्षांनी गेले होते म्हणून मावशीनं आग्रहानं थांबवून घेतलं.
इतके दिवस टीव्हीला विश्रांतीच मिळाली होती. सहज टीव्ही लावला. त्या वेळी फक्त मुंबई दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. तीवर शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. गाणारी मुलगी सुरेल गात होती...
आणि मी चमकलेच...ती मुलगी होती सलमा ! जवळ जाऊन पाहिलं. खात्रीच झाली, ती सलमाच होती.
मी मावशीला म्हणाले : 'अगं, हीच मुलगी माझ्याकडं रोज वाचून घ्यायला येत असते.''
सलमा शास्त्रीय गाणंही शिकली आहे आणि तेही टीव्हीवर सादर करण्याएवढं, हे कळल्यावर मी चकितच झाले आणि मनातून थोडी नाराजही झाले. सलमानं आपल्याला याबाबतीत काहीच कसं सांगितलं नाही असं वाटून गेलं. केवढा हा विनय म्हणायचा. कान देऊन, डोळे मिटून तिचं गाणं आवडीनं ऐकलं. तिचा हा अनोखा पैलू मला समजला आणि मला तिचा खूप अभिमान वाटला.
***

नागपूरहून आल्यावर मी सलमाकडं गेले तर ती सात-आठ मुलांना शास्त्रीय संगीत शिकवत होती, तेव्हा मला उलगडा झाला की "माझी शिकवणीची वेळ झाली' असं सलमा मला जे म्हणाली होती, ती शिकवणी ही होती तर! सलमा खूप मन लावून शिकवत होती आणि मुलंही मन लावून गात होती. मी स्वस्थपणे ऐकत बसले. तरी सलमाला माझी चाहूल लागलीच. तिनं "कोण?' म्हणून विचारलं तर मी म्हटलं : 'मी तुझी ताई. चालू द्या तुमचं, मला मजा येतेय ऐकायला.''
ृ-मी गेल्यामुळे की काय, तिनं जरा आटोपतं घेतलं असं मला वाटलं.
-मुलांना म्हणाली :'चला, आता सुटी. पळा!''
-मी तिला मी विचारलं : 'शाळेत कधीपासून यायचं?''
तिनं मला तारीख, वार, वेळ सगळं व्यवस्थित सांगितलं.
तिनं चहाचा आग्रह केला; पण घरून चहा घेऊनच निघाले होते आणि दुसरंही एक तातडीचं काम असल्यानं चहा न घेताच मी निघाले.
मात्र जाता जाता, मी तुला टीव्हीवर गाताना पाहिलं, हे तिला आधी न सांगता मी तिला म्हणाले : 'सलमा, मी तुझ्यावर रागावले आहे!''
'काय झालं ताई? माझं काही चुकलं का?'' काकुळतीला येऊन तिनं विचारलं.
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता.
मी तिला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही... मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.''
'ताई, मुद्दाम असं काही नाही; पण माझ्या लक्षातच आलं नाही,'' तिनं संकोचून सांगितलं.
सलमा फारच विनयशील होती.
***

सलमानं सांगितलेल्या दिवशी मी "कमला मेहता अंध मुलींच्या शाळे'त गेले. अगोदर मी हेडबाईंच्या ऑफिसात गेले. त्यांनी शाळेविषयी माहिती सांगितली. शाळेला शंभर वर्षं होऊन गेलीत, म्हणाल्या.
जुनं, दगडी भक्कम बांधकाम, त्यामुळं इमारत खूपच चांगल्या अवस्थेत होती. मी त्यांना माझं काम सांगितलं. त्यांनी माझ्याबरोबर एक शिपाई दिला. त्यानं मला एका खोलीत आणून सोडलं. सलमा माझी तिथं वाटच पहात होती जणू! तिला चाहूल लागली. त्याबरोबर ती उठली व मला "नमस्ते, ताई' म्हणाली. इतर 10-12 मुलीही - गोलाकार बसलेल्या - उठून उभ्या राहिल्या व "नमस्ते, ताई' म्हणाल्या. मुली पुन्हा गोलाकार बसल्या. सलमानं मला तिच्या शेजारी जागा दिली.
-मी विचारलं : 'आज काय वाचायचं आहे?''
सगळ्या एकसाथ म्हणाल्या : 'इंग्लिश.''
सलमानं मला खूण असलेल्या धड्याचं पुस्तक दिलं आणि मुलींनी ब्रेललिपीचं पुस्तक हातात घेतलं. मी वाचत होते. मधूनच काही मुली शंका विचारत होत्या. मी माझ्या परीनं उत्तरं देत होते. शेवटी धड्याखालची प्रश्‍नोत्तरं झाली. दोन तास कसे गेले कळलं नाही. आजूबाजूला इतर वर्गांतल्या मुली हळू आवाजात; पण अंदाजाअंदाजानं पळापळी आणि इतर काही खेळ खेळत होत्या. घंटा वाजली. सगळ्यांची चहाची-खाण्याची वेळ झाली होती. मी घरी निघाले तर एका बाईंनी मला आग्रहानं मुलींबरोबर पोहे खायला बसवलं. छान, खमंग, गरमागरम पोहे होते. मी बाईंना सांगितलं, "हा आग्रह रोज नको.'
***

अशीच मी रोज ठरल्या वेळी वाचायला जात होते. एकेका विषयाची पुस्तकं मुली मला वाचायला देत होत्या. त्यांच्याकडं सगळ्याच विषयांची ब्रेललिपीमधली पुस्तकं नव्हती. एक दिवस एका मुलीनं मी वाचलेलं ब्रेललिपीच्या टाईपरायटरवर टाईप करायला सुरवात केली. दुसरी एकजण टेपरेकॉर्डरमध्ये कॅसेट घालून टेप करू लागली. असे त्या आपल्याकडून हर तऱ्हेनं प्रयत्न करत होत्या. काही मुली आपापसात हळूहळू एकमेकींच्या खोड्या काढायच्या. मी एक-दोनदा दुर्लक्ष केलं. नंतर मात्र एकदा मोठ्यानं नुसतं "हंऽऽ' म्हटलं तेव्हा त्यांच्या गमती थांबल्या.
बाकी इतर मुली खरंच अभ्यासू होत्या. मी वाचलेलं मनापासून ऐकायच्या. शंका विचारायच्या. प्रश्‍नांची उत्तरं मुद्देसूदपणे द्यायच्या. दिवस भराभर जात होते. आता त्यांची प्रिलिमिनरीसाठीची तयारी सुरू झाली. ती परीक्षा बहुतेक सगळ्या जणी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्या. बोर्डाच्या परीक्षेसाठी रायटर मिळवण्यासाठी या मुलींना खूपच प्रयत्न, खूपच खटपट करावी लागते. रायटर एक इयत्ता खालचे चालतात. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना रायटर मिळाले. मलाच खूप हायसं वाटलं. रोज एक पेपर, त्यातून मध्ये मध्ये सुट्या यायच्या. त्यामुळे परीक्षा खूप लांबल्या. शेवटी संपल्या एकदाच्या परीक्षा! एकेकीचे गावी जाण्याचे प्लॅन सुरू झाले. नॉर्मल मुला-मुलींच्या कॉलेजमध्ये या मुला-मुलींना प्रवेश मिळतो. त्याप्रमाणे निकाल लागल्यावर बहुतेक मुलींनी आर्टस्‌ला प्रवेश घेतला. घरापासून कॉलेज खूपच लांब पडतं म्हणून तिघी-चौघींनी मिळून खोली घेऊन राहायचं ठरवलं. स्वयंपाकापासून घरातली सगळी कामं त्या आलटून-पालटून बिनबोभाट करत असत. रस्त्यानं चालताना त्यांच्याजवळ पांढरी-लाल काठी असायचीच. मुंबईच्या लोकल ट्रेनचीही त्यांना व्यवस्थित सवय होती. सलमा माझ्याकडं दोन लोकल्स बदलून अधूनमधून वाचून घ्यायला यायची. येताना ती कॅसेट घेऊन यायची. माझ्या रेकॉर्डप्लेअरवर कॅसेट लावून चालू करून ठेवायची. जाताना घेऊन जायची. खोलीवरच्या तिच्या प्लेअरवर ऐकायची. सर्व जणी कधी एकत्रही ऐकायच्या. माझ्याकडून निघाल्यावर मग ती तिच्या घरी सगळ्यांना भेटायला जायची.
***

आमच्या भेटी अधूनमधून होत होत्या. बारावीचं वर्ष आल्यावर आम्ही वाचनावर जरा जास्त जोर दिला. मी तिला शुभेच्छा दिल्या. तिनं वाकून नमस्कार केला. सुट्यांमुळे परीक्षा खूपच लांबत गेल्यानं जरा बदल म्हणून सलमा दोन मैत्रिणींना घेऊन मला भेटायला आली. आतापर्यंतचे पेपर उत्तमच गेले होते. ऐन दुपारी उन्हाच्याच आल्या होत्या. मी तिघींना सरबत दिलं व उरलेल्या पेपरांसाठी शुभेच्छा दिल्या.
यंदाचा निकाल खूपच गाजला. सलमा गुणवत्तायादीत आली होती. माझ्याकडं पेढे घेऊन आली तेव्हा अगोदर मी तिला पेढा भरवला. तिच्या मैत्रिणींची चौकशी केली. त्यांनाही 80-82 टक्के गुण मिळाले होते. सलमाचं मी अभिनंदन केलं. मैत्रिणींनाही सांग म्हटलं.
सलमा म्हणाली : 'मी आता संगीताच्या परीक्षा देणार आहे. एसएनटीडी कॉलेजमध्ये प्रवेश घेईन. तिथं बीए-एमए करून संगीतात पीएच.डी. करायचं तिनं ठरवलं होतं. ती तिच्या आत्याच्या घरी गेली. तिच्या या आत्यानं शास्त्रीय संगीत शिकलेलं होतं व ती रियाजही नित्यनेमानं करत असे. कॉलेजप्रवेशाच्या वेळी ती आत्याला घेऊन कॉलेजमध्ये गेली होती. तिला सहजच प्रवेश मिळाला. काही दिवसांनी कॉलेजचं सलमाचं रुटीन सुरू झालं. अधूनमधून ती एखादं थिअरीचं पुस्तक माझ्याकडं वाचनासाठी घेऊन यायची. मला त्यातलं फारसं कळत नसे. वाचून दाखवणं एवढंच माझं काम!
पाहता पाहता सलमा बीए झाली. मग एमए झाली. आता तिला पीएच.डीचा ध्यास लागला होता. ती अधूनमधून आत्याकडं मार्गदर्शनासाठी जायची. संगीत हाच तिचा श्वास होऊन गेला होता. मी एकदा तिला तिच्या कॉलेजमध्ये भेटायला गेले होते तेव्हा म्हणाली : 'खूपच धावपळ होतेय सध्या माझी. घरी जाऊन दोन तास मुलांची शिकवणी घेते. तेवढाच माझाही रियाज होतो; त्यामुळे काही वाटत नाही.''
एकीकडं प्रबंधाचं कामही सुरू होतं. त्यासाठी ती माझ्याकडं यायची. ती सांगायची अन्‌ मी लिहायची. मी तिची लेखनिक झाले होते. हे नवीनच काम मला उत्साहवर्धक वाटत होतं. मौज वाटत होती त्यामध्ये. घरचे म्हणायचे : "आता तू काही दिवसांनी गायलाही लागणार!' सगळं चेष्टेतच! प्रबंध पूर्ण झाला. तो मान्यही झाला. पुढं लेखी परीक्षा. त्यासाठी मी रायटर म्हणून जाऊ लागले. लेखी परीक्षा संपल्यावर प्रॅक्‍टिकल्स सुरू झाली. तीही नेहमीप्रमाणे उत्तमरीत्या पार पडली. काही दिवसांनी निकाल लागला. सलमा पीएच.डी. झाली. पेढे घेऊन आली. सलमाचा यशोवेलु गगनावेरी निघाला होता. तिच्या या चढत्या यशानं मलाही गगनभर आनंद झाला...आणि स्वत:चं बोन्साय झाल्यासारखंही त्याच क्षणी वाटून गेलं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nivedita thakar write salama music article in saptarang