...अन्‌ उपासमारीची सांज उंबरठ्यावर आली (Video)

juna kamth
juna kamth
Updated on

जवळपास 350 लोकांचा एक जत्था चार-एक महिन्यांपूर्वी नागपुरात डेरेदाखल झाला. हे शहर आपल्याला जगवेल, अशी उम्मीद होती. ती खरीही ठरली. चार्जर, घडी अशा वस्तू रस्त्यांवर विकून चार पैसे मिळू लागले. डेऱ्याची भूक भागू लागली. डेऱ्यावर साठे-एक पोर-पोरीही होती. सामाजिक कार्यकर्ते धीरज भिसीकर यांच्या प्रयत्नांतून ती शाळेत दाखल झाली. दरम्यान, दुसऱ्या शहरात आपला मुक्काम हलविण्याची वेळ येऊन ठेपली होती. "एकाच शहरात थांबलो, तर पोट भरत नाही', ही त्यामागील डेऱ्याची अनुभवातून आलेली थेअरी. परंतु, आता चित्र जरा बदललं होतं. "आपली पोरं शाळतं जाऊ लागली. डेऱ्यावर येऊन बुकं वाचू लागली. वहीत रेघोट्या ओढू लागली.' हे पाहून ती हरखली होती.


"आपला डेरा इथून हलवला, तर पोरांना पुन्हा आपल्यासोबत भटकावं लागील. त्यांची शाळा सुटल', या विचारानं त्यांचं काळीज हाललं. मग बड्या बुजुर्गानी हिंमत केली. इथंच थांबण्याचं ठरवलं. "पडेल ते काम करू, कष्ट करू. पन जाणार नाही,' असा निर्धार केला. बायांनीही त्यांना साथ दिली. पण, अचानक एक विषाणू संचारबंदी घेऊन आला आणि होत्याचं नव्हतं झालं. धंदा पार कोलमडला. बंदच झाला. आज बायांनी पालातले डबे-डुबे हालवून पाहिले, तर दोन सांजचाच डाळ-दाना उरलेला दिसला. उद्या आपण काय खावं. पोरांपुढं काय वाढावं, या चिंतेनं त्यांचं काळीज पारं सोलून निघालं.
घारीसारखी नजर असलेल्या धीरज भिसीकरच्या नजरेतून या वस्तीतील बालके सुटली नाहीत. नागपूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा धडाधड बंद पडत चालल्या. सुरू आहेत त्या शाळा ओस पडू लागल्या. दुसरीकडे नागपूर शहरातील झोपडपट्टीत शाळाबाह्य बालकांची संख्या वाढत चालली. विद्यार्थ्यांची गळतीही वाढू लागली. हे पाहून धीरज व्यथित झाला. त्याने थेट या विषयावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच जनहित याचिका दाखल केली. दीपकुमार साने यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या "सरकारी शाळा वाचवा अभियाना'तही तो सामील झाला. नव्यानेच पडलेल्या या डेऱ्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बालके पाहून तो हललाच. तो त्या डेऱ्यावर गेला. तिथल्या लोकांशी बोलला. जवळच "मनपा'ची एक शाळाही त्याने शोधली. तेथील शिक्षकांसोबत बोलला. या सर्व बालकांना शाळेत टाकण्याचा संपूर्ण खटाटोप त्याने सुरू केला. त्याच्यासोबत मी जेव्हा वस्तीवर गेलो तेव्हा बालकांची तयारी करणे सुरू झाले होते. शिक्षक-बालरक्षक प्रसेनजित गायकवाडही पोहोचले होते.

डेऱ्यावरील रूपा नावाच्या मुलीची वेणी तिची आई करून देत होती. ती म्हणाली, "इसका बाप मर गया अक्‍सिडंट में. कैसे स्कुल भेजेंगे? अब उसको लेके मैं घुमती हुँ.' ललिता जावर जाधव ही बाई दिसली. तिला सहा अपत्ये. "कोणत्या गावचे तुम्ही?' असे विचारले, तर "गाव नहीं हमारा अब. छुट गया. ऐसही घुमते हैं हम. पह्यले अकोला के तरफ रह्यते हैं,' असे म्हणाली. पाच मुलीनंतर तिला मुलगा झाला. नाव "सर्किट' ठेवलं. सांगतानाही तिला खूप आनंद होत होता. ललिताने तिच्या पायल आणि सुरेखा या दोन मुलींची तयारी करून दिली होती. दोघीही शाळेत जाण्याची वाट बघत होत्या. त्यांच्यासोबत बोलत असताना सारे भोवती गोळा झाले. बोलू लागले. "मी राहुल संजय चव्हाण, मी कला दिलीप मोहिते आमीबी जाऊ शाळत.' शिवम बंडू मोहिते म्हणाला, "मैं पह्यले जाता था स्कूल में.' "कोनसी क्‍लास में' विचारलं तर "क्‍लास भुल गया म्हणाला.' निशा जंगलशी जाधव ही वेणीफणी करुन तयार झाली होती. ती म्हणाली, "स्कुल कैसे रहता हैं?'

पन्नासएक मुले-मुली आणि डेऱ्यावरचे चार-दोन लोकांना घेऊन धीरज आणि आम्ही मग एक पूल ओलांडून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील शाळेकडे निघालो. "कळमना मराठी हिंदी उच्च प्राथमिक शाळा नं. 1' मध्ये पोहोचलो. थोड्याच वेळात शिक्षक आणि शाळा निरीक्षक आले. पोरांना शाळेत दाखल करून घेतले. "मनपा'च्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांची भेट घेतली. एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या या नव्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दोन अतिरिक्त शिक्षक देऊ केले. "गणवेश, पुस्तके देऊ', असे सांगितले. "माध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था करण्यात येईल', असेही त्या म्हणाल्या. पन्नास बालके दाखल झाली होती. यापूर्वी धीरजने नागपूर महानगरपालिकेच्या तीन बंद पडलेल्या शाळा पुनरुज्जीवित केल्या होत्या. दाखल केलेल्या बालकांपैकी काहींनी तर शाळा कधीच बघितली नव्हती.

बालके नियमित शाळेत जाऊ लागली. दरम्यान, या बालकांना पाहून आधी शाळेत जायला घाबरणारी आणखी दहाएक बालके हळूहळू यांच्यासोबत जायला लागली. "भटकलेल्या पावलांना शाळेचा रस्ता दाखविला', हा विचारच अत्यंत आनंददायी होता. धीरज तर यामुळे खूपच सुखावून गेला होता. तो अध्येमध्ये शाळेत जायचा. डेऱ्यावरही नजर ठेवून असायचा.
सारे व्यवस्थित सुरू होते. परंतु, "कोरोना व्हायरस'मुळे सारा खेळ बिघडला. शिक्षण विभागाने शाळा बंद केल्या. पोरांना काहीच कळेना. ती मुकाट्याने डेऱ्यावर थांबू लागली. अचानक संचारबंदी लागली. चार्जर, घडी, बॅटरी विकण्याचा धंदा बंद झाला. एखाद्या मैदानावरील पालं अचानक उठावे आणि सारं मैदान सुनसान व्हावं तसं गिऱ्हाईकांचं झालं. नागपूरमध्ये "पॉझिटिव्ह' रुग्ण मिळाले. त्यामुळे प्रशासाने कठोर पावले उचलली. रस्त्यावरची गर्दीच पूर्ण कमी झाली. रस्त्याच्या काठानं मांडली जाणारी सर्व दुकाने बंद झाली. धीरज नजरच ठेवून होता. तो गुरुवारी डेऱ्यावर गेला. लोकांसोबत बोलू लागला. सारी मुलं त्याच्याभोवती गोळा झाली. गोंगाट केला. पण, धीरजला सारीच केविलवाणी दिसली. डेऱ्यावरील राजेश मोहितेने सारी परिस्थिती सांगितली. "गिऱ्हाइकी थांबली तेव्हापासून पदरला होते तेवढे पैसे आन पालातं होतं-नव्हतं ते सर्व सरत आलं. आता दोन सांजाबी भागनं अशी कंडिशन नाह्यी. आमी लय टायमाले भुके राह्यलो. पन म्होरल्या दिशी कायी ना कायी सोय जमाचीच. आता थेबी कंडिशन नायी राह्यली. आमच्यावर तं खरंच महामारी आली सायेब.' त्यांच्या या शब्दांनी धीरजच्या (मोबाईल नंबर- 9370621927) पायाखालची जमीन सरकली. परंतु, त्याने हिंमत सोडली नाही. "ज्या शहराने या डेऱ्याला एवढे दिवसं जगवलं, तेच शहर आणखी जगवेल. मी लोकांपुढे हात पसरीनं; पण या डेऱ्यावर भुखमरी येऊ देणार नाही,' असा निर्धार त्याने केला. चला त्याच्या या निर्धाराला आपण पाठबळ देऊया. या डेऱ्याला जगवूया.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com