काळ एके काळ, काळ दुणे काळ...

आपण काळाच्या कुठल्या तुकड्यात जन्माला आलो त्यानुसार आपल्या आठवणींची जातकुळी ठरत जाते.
nothing so miraculous as steady-volatile discovery of oneself
nothing so miraculous as steady-volatile discovery of oneselfSakal

- विशाखा विश्वनाथ

स्वतःच्या बाबतीतील स्थिर-अस्थिर शोध स्वतःला लागत राहण्याइतकी चमत्कारिक गोष्ट दुसरी कुठलीही असू शकत नाही. आपल्याला काय वाटतं, याची एक सांकेतिक, स्वतःची स्वतंत्र वा आई-वडिलांना न कळणारी भाषा असावी, असं वाटण्याच्या वयातल्या मुलांना एखाद-वेळी चुकण्याची मुभा देण्यात काहीएक हरकत नसावी.

आपण काळाच्या कुठल्या तुकड्यात जन्माला आलो त्यानुसार आपल्या आठवणींची जातकुळी ठरत जाते. आज, आता, या घडीचे आपण म्हणजे त्या काळाचं प्रतिनिधित्वच जणू. असं वाटायला फार मोठा वाव वारंवार मिळत जातो. तशा घटना घडत जातात, माणसं भेटत जातात. आठवणींचा एक संचच तयार होत जातो.

जेव्हा वाटतं, आपण सगळे कमी-अधिक फरकाने, वर्षांचे आकडे बदलून किती सारखं जगलो किंवा काळाच्या प्रतलात एकाच वेळी अनेकांच्या वाट्याला सारख्या गोष्टी आल्या, पण हे सगळं असंच असतं का, याचा शोध घेणं, आठवणींच्या मदतीने काळाचं बोट धरून मागे-पुढे करत राहणं आणि स्वतःच्या बाबतीतील स्थिर-अस्थिर शोध स्वतःला लागत राहणं या इतकी चमत्कारिक गोष्ट दुसरी कुठलीही असू शकत नाही.

लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकरांनी अलीकडेच फेसबुकवर एक इंग्रजी पोस्ट टाकली होती. ज्याची सुरुवात तारुण्याच्या अगदी सुरुवातीला त्यांना काय वाटायचं, अशी काहीशी होते. त्यात सुरुवातीच्या भागात ते लिहितात, ‘माझे पालक बोलत नाही ती, त्यांना समजत नाही अशीच भाषा मला हवी होती.

मला इंग्रजी नीटसं बोलता आणि वाचता येत नव्हतं आणि मला जे वाटतं ते मी मराठीतून लिहिलं असतं तर ते माझ्या आई-वडिलांच्या हाती पडण्याची, त्यांनी ते वाचण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच मला तेव्हा माझी स्वतःची भाषा हवी होती.’

हे वाचल्या वाचल्या ते जणू मीच लिहिलंय की काय, असं वाटलं. अर्थात सचिन कुंडलकरांनी हे त्यांच्या १६ व्या वर्षाविषयी लिहिलेलं असलं तरीसुद्धा, माझंही त्या वयातलं वाटणं फार काही वेगळं नव्हतंच.

काळ नावाच्या एका भल्यामोठ्या प्रतलात, मनातली घालमेल शब्दात उतरवता येणाऱ्या एका माध्यमाविषयी, पालकांशी न बोलता येणाऱ्या विषयांविषयी किंवा मी जो विचार करतोय-करतेय ते लिहिलं-बोललं तर माझ्या पालकांना काय वाटेल, या भावनेविषयी, काळाच्या कुठल्याही तुकड्यात जन्मलेल्या माणसांना सारखंचं वाटतं, हे समजल्यावर मला भारी वाटलं.

पहिलं तर, ‘सगळ्यांनाच मी बोललेलं किंवा माझंच म्हणणं का कुणाला समजत नाही’ आणि दुसरं म्हणजे, ‘माझं म्हणणं अर्थात माझ्या मनातलं कुणाला कधीच कळू नये’ असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटलेलं असतंच.

त्यातल्या त्यात नववी ते बारावीच्या दरम्यान हमखास वाटतं. वर कुंडलकरांचं उदाहरण दिलं तसंच अगदी मलाही वाटलं होतंच. तेव्हा मी माझ्या एका वहीच्या पहिल्या पानावर, माझी स्वतंत्र लिपी तयार केली होती. काही चिन्हं होती, त्यात माझं नाव लिहून ठेवलं होतं. यथावकाश ते भूत उतरलं. माझं ते लिपी वापरणं माझ्या नावापलीकडे कधी गेलं नाही.

तरीही अधूनमधून उफाळत येत राहिलं, हे मात्र खरं. मला आठवतं, आम्हाला ‘घर’ नावाचा एक धडा होता. त्यात अशीच मध्येच एक गुपित सांगण्यासाठी वर मी म्हटलं त्याच वयोगटाच्या आसपासची दोन मुलं ‘च’ची भाषा वापरतात, असा एक प्रसंग आहे.

अगदी आताचं पाहा ना, ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ असलेली मुलं ही आपली स्वतंत्र शब्दसंपदा वापरतात. एकूण मुद्दा काय, तर कुठल्याही काळात जन्मलेल्या सगळ्याच मुलांना त्यांच्याच पौगंडावस्थेत वा तारुण्याच्या उंबरठ्यावर मोठ्या माणसांना समजणार नाही, अशी भाषा हवी असणं हा सायिक मुद्दा आहेच आणि अर्थात प्रत्येकाच्या मनात आपल्या सांकेतिक भाषेविषयी आठवणींचा खजिनाही.

जसं या सांकेतिक भाषेचं सत्य सगळ्याच काळात जन्मलेल्या माणसांना लागू होतं, तसंच करियर निवडताना होणाऱ्या गोंधळ आणि गफलतीचं सत्य कधीही जन्मलेल्या हरएकाला लागू होतं. एक तर जेव्हा करियर निवडायची वेळ येते तेव्हाच नेमकं मुलांना त्यांच्या मनातलं कुणाला कळू नये, असं वाटतं.

ते स्वतःलादेखील स्वतःच्या मनाचा थांग लागू देत नाहीत. पालकांना जितकं कळतं त्यानुसार काळाचा अंदाज घेत ते आपल्या पाल्याला त्या काळाशी रिलिव्हंट वाटेल अशा शाखेकडे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात किंवा मुलंही ट्रेंडमध्ये असणाऱ्या कपड्यांप्रमाणेच ट्रेंडमध्ये इन असणाऱ्या कोर्सेसना ॲडमिशन घेतात.

म्हणून तर ठराविक दशकात कुठल्यातरी एकाच डिग्री, डिप्लोमा कॉलेजेसचा उदय होतो. जो-तो सारखंच शिक्षण घेतोय, असं वाटतं. उदाहरण द्यायचं झालंच तर ८० च्या दशकानंतर डी. एड, बी. एड. झालेल्या, मग इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या, बी. फार्मसी झालेल्या, इंजिनिअरिंग झालेल्या मुलांच्या तुकड्याच्या तुकड्या शिक्षण संस्थांमधून बाहेर पडल्यात, हे अगदी सहज पाहण्यात येईल.

अर्थात यातले सगळेच स्वइच्छेनुसार ते शिक्षण घेत असतात, असं होतं नाही. पण ती ज्या काळाची अपत्यं असतात त्या काळात टिकून राहता यावं म्हणून ही तडजोड झालेली असते. कधी मुलांच्या बाजूने, तर कधी पालकांच्या.

करियर निवडताना केलेली ही तडजोड, झालेल्या चुका प्रत्येक काळातल्या मूल आणि पालक यांच्याकडून झालेल्या असतातच, फरक इतकाच काहींच्या चुका डोळ्यात ठसठशीत भरतात, काहींच्या कालौघाने कळून येतात.

काहींच्या बाबतीत आधी चूक वाटलेल्या गोष्टी नंतर बरोबर सिद्ध होत जातात. म्हणूनच स्वतःची स्वतंत्र वा आई-वडिलांना न कळणारी भाषा असावी, असं वाटण्याच्या वयातल्या मुलांना एखाद-वेळी चुकण्याची मुभा देण्यात काहीएक हरकत नसावी.

कारण, आपली निवड चुकली हे मुलांना स्वतः कळणं किंवा आपल्या पाल्याचं म्हणणं बरोबर आहे हे पालकांना उमगणं यासाठी काही काळ जाणं अत्यंत गरजेचं असतं. कारण, तरुण मुलं, करियरच्या वाटा आणि मुलं व आई-वडील यांच्यातला संवाद हा न सुटलेला तिढा सोडवण्याचा पहिला मार्ग आहे, काळ एके काळ आणि दुसरा मार्ग आहे, काळ दुणे काळ...

vishakhavishwanath11@gmail.com (लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com