

Obsession Horror Movie and Psychological Fear
esakal
सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com
भयपट पाहण्यात वेगळीच मजा असते. सर्वच भयपटात भूत नसते. काही भयपटात अनामिक भीती असते, ती खिळवून ठेवते. सर्वत्र शांतता असताना भयपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. त्यातील प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत यांमुळे त्यातील रंजकता अधिकच वाढते.
कल्पना करा की, तुम्हाला काडीसारखी अशी एक वस्तू (One Wish Willow) मिळाली आहे, जिचे दोन तुकडे करताना तुम्ही जी इच्छा शब्दात व्यक्त कराल ती पूर्ण होईल. एकदा मागितल्यावर इच्छा तुम्हाला बदलता येणार नाही. तो सुटलेला बाण असून परत घेता येणार नाही. या इच्छेमध्ये मृत व्यक्तीला जिवंत करणे, बेळ बदलणे, अमर होणे या असू शकत नाहीत. अशीच एक वस्तू ऑब्सेशन चित्रपटाचा नायक बेअर (मायकेल जॉन्स्टन) याला मिळते. त्या युवकाचे त्याची मैत्रीण निक्कीवर प्रेम असते, त्यामुळे तो कोणती इच्छा व्यक्ती करणार? तो अशी इच्छा व्यक्त करतो की निक्कीने त्याच्यावर इतके प्रेम करावे की, तिला जगात सर्वांत जास्त प्रिय काय असेल तर फक्त आणि फक्त मीच.
ऑब्सेशन या भयपटात (हॉरर) बेअर या युवकाला जादूची कांडी मिळते. परंतु त्याची फक्त एकच चूक होते, इच्छा शब्दात व्यक्त करताना त्याची वाक्यरचना चुकते. ‘‘तिने माझ्यावर इतके प्रेम करावे की, तिला जगात कशाहीपेक्षा मीच प्रिय असावे’’ याचाच दुसरा अर्थ तिला फक्त त्याचाच नाद असावा, त्याच्यापेक्षा दुसरे काहीच प्रिय वाटू नये. ‘तिच्यामध्ये त्याच्याविषयी अपार प्रेमभावना’ या इच्छेमध्ये एक स्वार्थ दडलेला आहे, ‘ऑब्सेशन’चा अर्थ तिच्यामध्ये त्याच्याविषयी एक प्रकारचा मालकी हक्क येणे, तिला दुसरे काहीच प्रिय न वाटणे.