

On The Waterfront Movie
esakal
सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com
इलीया कार्झन यांनी चित्रपट दिग्दर्शन करताना नायकाचा सद््सद््विवेकबुद्धीचा लढा प्रेक्षकांपर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवला आहे. फादर टेरीला आव्हान देतात आणि म्हणतात, हिंमत असेल तर एडीला खरे काय घडले, ते सांग. यानंतर टेरी आणि एडी यांच्यातील संवाद न ऐकवता त्या वेळी बंदरावरील जहाजांचा भोंगा आणि इतर आवाज मोठ्याने ऐकवले आहेत, ज्यामुळे प्रसंग प्रेक्षकांना भिडतो.
चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटात जे दिसते, त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नसते. म्हणजे नाटकात एखाद्या प्रसंगात नायिका खिडकीबाहेर बघत असेल तर ती दिवाणखान्यात बसलेल्या नायकाला सांगते, “कित्ती छान पाऊस पडतोय ना? कित्ती प्रसन्न वातावरण आहे, पावसाचे थेंब अंगावर घ्यावेत असे वाटतेय.” नाटकातील प्रेक्षकांना तो पाऊस दिसत नाही, कदाचित साउंड इफेक्टने त्याचा माहोल तयार करता येईल. याच नाटकावर चित्रपट करताना नायिकेच्या तोंडी असलेले संवाद कट करता येतील, बाहेर पडणारा पाऊस दाखवता दाखवता खिडकीतून कॅमेरा आत आणता येईल आणि नायिका नायकाकडे सहेतुक नजरेने बघते एवढेच दाखवले तरी तिला काय म्हणायचे आहे, ते प्रेक्षकांना संवादाशिवाय कळेल. परंतु १९५०-६० च्या दशकात चित्रपटातील अभिनय नाटकातील अभिनयाप्रमाणे केला जायचा. त्या काळचे अनेक चित्रपटसुद्धा नाटकाप्रमाणे संवादांनी भरलेले आणि भारलेले असायचे. नाटकातील संवाद बाल्कनीत शेवटच्या रांगेत बसलेल्या साउंड सिस्टीमशिवाय ऐकू जावेत यासाठी त्या काळात मोठमोठ्याने संवाद म्हणण्याची नाटकाची गरज होती. त्या अभिनय शैलीला ‘क्लासिक’ म्हटले जाते. नाटकातील अनेक कलाकार चित्रपटात अभिनय करताना त्या तंत्रास अनुसरून वेगळ्या पद्धतीचा अभिनय करत नव्हते. त्या काळात म्हणजे १९५४ साली रिलीज झालेल्या ‘ऑन द वॉटरफ्रंट’ या चित्रपटात मार्लन ब्रान्डोने वेगळ्या पद्धतीने अभिनय केला आणि चित्रपट अभिनयाची परिभाषा बदलली. इलीया कार्झन दिग्दर्शित हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला आहे.