esakal | कोविड काळातील ऑनलाईन शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

saptarang

कोविड काळातील ऑनलाईन शिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोविड काळात सगळे जनजीवन ठप्प झाले आणि त्याबरोबरच शाळासुद्धा बंद झाल्या. विद्यार्थ्यांच्या चिवचिवाटाने गजबजलेल्या शाळा मुक्या झाल्या. विद्यार्थी घरातच बंदिस्त झाले. अशा परिस्थितीत सुरू झाले ऑनलाईन शिक्षण. ऑनलाईन शाळा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही एक आव्हानच होते. शिक्षकांना पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक पद्धतीने शिक्षण द्यावयाचे होते. ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ या मोहिमेअंतर्गत शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे होते. जे शिक्षक तंत्रस्नेही नव्हते, त्यांना गुगल मीट, गुगल क्लासरूम, झूम ॲप, गुगल फॉर्म, व्हिडीओ, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन हे अवघड आणि वेळखाऊ होते. त्यामुळे काही शिक्षकांना सुरुवातीला हे काम थोडेसे कठीण वाटले.

या सर्व समस्यांबरोबरच मी एक शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून माझ्यापुढे मोठी समस्या होती, ती म्हणजे खेळाच्या शिक्षकाचे बहुतांशी काम हे प्रात्यक्षिकाद्वारे होत असते. समोर असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकाद्वारे निरीक्षण करून, त्यांच्या चुकांची दुरुस्ती करून अनेक खेळांची कौशल्ये आणि तंत्रे त्यांना शिकवता येतात. क्रीडा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिक्षणाची ओढ निर्माण होते; परंतु आता विद्यार्थी आपल्या समोर नसताना त्यांना शिकविणे थोडे अवघड होते. त्यावरही अनेक ॲपचा अभ्यास आणि अवलंब करून मात करण्यात मी यशस्वी झाले.

ऑनलाईन शिक्षणाच्या काळात सर्वात महत्त्वाचे आहे ते विद्यार्थ्यांचे आरोग्य. शारीरिक शिक्षण आणि आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. शारीरिक शिक्षणात मुळातच विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी अनेक घटक समाविष्ट आहेत. त्यातील एक घटक म्हणजे योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीर स्थिती योग्य राहते. लवचिकता वाढते. स्नायू मजबूत बनतात. रक्ताभिसरण वाढून ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. फुप्फुसांची क्षमता वाढते. इन्फेक्शनविरुद्ध लढण्याची ताकद वाढते. मन प्रसन्न राहते. स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अजून एक महत्त्वाचा घटक आहे आहार. समतोल आहारात कोणत्या घटकांचा समावेश व्हावा, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून त्यांचे आरोग्य कसे स्वस्थ राहील, याकडे विशेष लक्ष दिले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आहाराबाबतच्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्येसुद्धा सहभागी करून घेतले. त्याचप्रमाणे योगासने, प्राणायाम याबरोबरच स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम, मनोरंजनात्मक खेळ, घरात उपलब्ध वस्तूंच्या सहाय्याने व्यायाम, खेळ, कृतीयुक्त गाणी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे शरीर स्वस्थ आणि मन उत्साही राहण्यासाठी मार्गदर्शन केले. ऑनलाईन शिक्षणाबरोबरच अनेक सण-समारंभ ऑनलाईन पद्धतीने साजरे केले आणि विद्यार्थ्यांना सतत शाळेशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला.

ही कोरोना नावाची महामारी विद्यार्थ्यांबरोबर आम्हा शिक्षकांनाही खूप काही शिकवून गेली आणि आम्ही शिक्षक तंत्रस्नेही बनलो, हे मात्र नक्की.

(लेखिका मुंबई पब्लिक पोईसर हिंदी शाळा क्र.१ आर /मध्य विभाग, बोरिवली येथे शारीरिक शिक्षण शिक्षिका आहेत.)

loading image
go to top