न दिसणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि वैयक्‍तिक वर्गवारीचा उलगडा

tiger.jpg
tiger.jpg

बाबाराव, गेल्या 4-5 वर्षांपासून मुख्य 2 समस्यांनी ग्रासलेले आहेत. पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढता त्रास आणि दुसरी म्हणजे नाइलाजाने, बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर. बाबाराव वर्धा जिल्ह्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी-म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय. गावालगतच कुरण आणि जंगल यावर गायी-म्हशींसाठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार. त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा. जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरित्या व्हायचे. तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशू होतेच, त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला. तरीपण याआधी बाबारावांना अशा प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही. सद्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरू आहे यावर बाबारावांना हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे.
विदर्भात मुख्यतः 7-8 पशुपालक समाजाचे वास्तव्य आहे. जवळपास असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर ते त्यांचा उपजीविकेसाठी करतात व सोबतच शेती, जंगल आणि अन्नसाखळीचा समतोल ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात. गडचिरोलीचे कुरमार आणि गोलकर, वर्धा आणि नागपूरचे नंदा गवळी, अमरावती नागपूर भंडारा आणि यवतमाळचे धनगर या सर्व लोकांचे एकमत आहे की शहरी लोकांच्या वाघ बघण्याच्या हौसेमुळे आणि जंगल विभागाच्या जंगल आणि वाघ संवर्धनाच्या एकांगी दृष्टिकोनामुळे जैवविविधतेचे व समाजाचे प्रचंड नुकसान होत असून हा प्रयत्न अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांना जन्म देत आहे.
सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जंगल म्हणजे विविध प्रकारची झाडेझुडपे, प्राणी, पक्षी आणि बरेच जीव नैसर्गिकरित्या वावरत असलेली जागा किंवा भूखंड. अशा जंगलात आणि जंगलालगत आदिवासी आणि बरेच पशुपालक समाज कितीतरी वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अंदाजे गेल्या 1 कोटी वर्षांपासून मनुष्यप्राणी या पृथ्वीवर इतर जवळपास 87 लाख जीवजंतूसोबत वावरत आहेत, कारण मनुष्याने जंगलाशी आणि निसर्गाशी जुळवून घेतले. जंगल, प्राणी आणि मनुष्य यांचे वर्गीकरण न करता याला एकसमान मानलं आणि प्रगती करत गेला. गावं आणि जंगले, शेती आणि गवताळ प्रदेश, वाघ आणि मनुष्य, बिबट आणि गाय हे सगळे गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत जगत आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यात यांचा वावर एकाच कालखंडात असल्यामुळे हे वेगवेगळ्या बाबींनी परस्पर एकमेकांशी जोडले आहेत. आता हे संबंध कधी कधी खूप उघड असतात तर कधी कधी याबद्दल कळतसुद्धा नाही. या सर्व दिसणाऱ्या न दिसणाऱ्या संबंधामुळे आपण जंगल वेगळे, गाव वेगळे आणि प्राणी वेगळे असे वर्गीकरण करू शकत नाही. केल्यास यातून काय काय सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक आणि वैयक्तिक प्रश्न निर्माण होतील याचा आपण अंदाज पण लावू शकणार नाही.
पण, जंगल विभाग काय करते? वाघ, जंगल, गाव, शेती, मनुष्य यांचे वर्गीकरण. नंतर जंगलात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली झाडे तोडून तिथे सागवानाची लागवड आणि स्थानिक लोकांचा जंगलातील प्रवेशावर निर्बंध. इथे मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की सागवान प्रमाणेच संत्र्याची किंवा आंब्याच्या बागेची जंगलात गणना होईल काय, जंगल आणि स्थानिक लोकांचा जन्म गेल्या 5-10 वर्षांत झाला काय, याआधी इथे मनुष्य, वाघ आणि इतर प्राण्यांचे वास्तव्य नव्हते काय,
आंबा, संत्री किंवा इतर झाडे, वृक्ष कमीतकमी इतर जीवजंतूंच्या अन्न आणि निवाऱ्याच्या कामी तरी येतात. याउलट सागवान कुणाला अन्न पुरवत नाही तो इतर झाडांना त्याच्या बाजूला वाढू पण देत नाही व जमिनीतून खूप जास्त प्रमाणात पाणी शोषून घेतल्याने जमिनीची होणारी हानी ती वेगळीच.
यात आणखी भर म्हणजे स्थानिक लोकांच्या जंगलातील प्रवेशावर निर्बंध लादल्याने गावातील पशूंना पुरेसा पोषक चारा मिळत नाही. परिणामी जनावरांची वाढ खुंटते, दूध कमी होते, चारा विकत घेतल्याने गावातील पैसा बाहेर जातो आणि गावाचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडते. याचीच दुसरी बाजू म्हणजे गावातील जनावरांच्या जंगलातील निर्बंधामुळे जंगलात घाणेरी आणि रानतुळस याची प्रचंड वाढ होते. गायी, म्हशी किंवा शेळी घाणेरी आणि रानतुळस कोवळी असताना खाऊन घेतात आणि त्याची फार वाढ होत नाही पण आता असे राहिलेले नाही आणि जंगलातील तृणभक्षीय जनावरे घाणेरी किंवा रानतुळस खात नाही आणि गावालगतच्या शेतावर हल्ला चढवतात. या तृणभक्षीय जनावरांच्या मागे मागे वाघ येतो आणि मनुष्य व प्राणी यांचा वाद सुरू होतो. म्हणजे शेतकरी आणि पशुपालक समाजासाठी एकीकडे विहीर आणि दुसरीकडे दरी. मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे आधीच गर्दी असलेल्या शहरात स्थलांतर करणे, शहरातील कमी असलेल्या नैसर्गिक साधनावर ताण देणे, आपले पारंपरिक ज्ञान विसरून जाऊन पोट भरायला मिळेल ते काम करणे.
आतातरी आपण आपली जंगल आणि वाघ संवर्धनाची उच्चभ्रू एकांगी दिशा सोडून सर्वसामायिक दिशा घेणे गरजेचे आहे. जंगल आणि वाघ महत्त्वाचे, पण गाव आणि बाकी जंगलातील प्राणी दुय्यम, शहर आणि उद्योग महत्त्वाचे पण शेती आणि पशुपालन हे दुय्यम अशी ही न दिसणारी वर्गवारी मोडून काढायची वेळ आली आहे. नाहीतर यातून काय अनिष्ट होईल याचा आपण बहुतेक विचार पण करू शकणार नाही.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com