

Marathi Book Review
esakal
बालाजी मदन इंगळे - saptarang@esakal.com
कवी इंद्रजीत भालेराव मंचावरून ते जितक्या सुंदर पद्धतीने कविता सादर करतात, तितक्याच सुंदर पद्धतीने ते शब्दांची मांडणीही करतात. ते जसे उत्तम कवी आहेत, तसेच कसदार ललितलेखन करणारेही आहेत. हा सगळा शब्दांचा खेळ मांडण्यासाठी ज्या गुरूंकडून त्यांनी शिकवण घेतली, त्या गुरूंना शिष्य या नात्याने एक ‘अक्षर’ गुरुदक्षिणा दिली आहे. ती म्हणजे, समीक्षक सुधीर रसाळ यांच्याविषयी भालेराव यांनी लिहिलेलं ‘ऊब ही महीतली’ हे पुस्तक!
भालेराव यांची आपल्या गुरूंबद्दलची कृतज्ञता पुस्तकातील प्रत्येक लेखामधून ओसंडून वाहताना दिसते. हे पुस्तक महत्त्वाचे यासाठी आहे की, रसाळ यांच्याविषयी फारसे कोणी लिहिलेले नाही. मुळात समीक्षा, समीक्षक हे सामान्य वाचकांसाठी असतच नाही, हाच आपल्या सगळ्यांचा समज आहे. मात्र, सामान्य वाचकालाही रसाळ यांची समीक्षा वाचाविशी वाटणे, हे या पुस्तकाचे यश आहे. समीक्षा का महत्त्वाची आहे आणि त्यातल्या त्यात सुधीर रसाळ यांची समीक्षा का महत्त्वाची आहे हे नेमक्या शब्दात भालेराव यांनी लिहिले आहे. ज्यांनी आजपर्यंत रसाळ यांची समीक्षा वाचली नाही, तेदेखील त्यांच्या समीक्षेच्या पुस्तकांकडे वळतील, हे निश्चित!
भालेराव यांनी ह्या पुस्तकातून रसाळ यांच्या सर्व पुस्तकांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकांमधून रसाळ सरांचे व्यक्तिमत्व उलगडते. काही प्रसंगांमधून आणि काही घटनांमधून त्यांचे विविध पैलू समजतात. समीक्षक म्हणून रसाळ यांचे मोठेपण सामान्य वाचकाला कळते.