आमची मुलं आणि खेळ...

आमची मुलं आणि खेळ...

‘अभ्यासाला खेळाची जोड दे, बघ, पोर कसं टणाटणा उड्या मारतंय’ आजीच्या या प्रेमळ सल्ल्याला डॉक्‍टरांनीही पुष्टी दिली. याची प्रचिती माझा मुलगा प्रकल्प याच्या अनुभवातून मला आली. प्रकल्प सात वर्षांचा असताना माझे यजमान विकास आणि माझी बदली पुण्यात झाली. पुण्यातलं जून ते सप्टेंबरपर्यंतचं हवामान दोन-तीन वर्षं त्याच्या तब्येतीला त्रासदायक ठरलं.

प्रकल्पची वजन-उंची वाढेल, तो निरोगी राहील, त्याला सगळ्या मुलांमध्ये मिसळून खेळता येईल म्हणून बॉस्केटबॉल हा खेळ आम्ही त्याच्यासाठी निवडला. वयाच्या ११ व्या वर्षी त्याला प्रथमच बास्केटबॉल कोर्टवर घेऊन गेले. आठ दिवस कोर्टवर गेल्यावर रडणारा प्रकल्प पुढं बास्केटबॉल खेळात इतका रमला, की हा खेळ त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

बास्केटबॉलचे ‘विद्यांचल क्‍लब’चे प्रशिक्षक अरुण पवार सर यांचं मार्गदर्शन त्यासाठी मोलाचं ठरलं. त्यांच्या मार्गदर्शनात रोज सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ, तसंच सुटीच्या दिवशी सकाळी सात ते नऊ असा नियमित सराव तो करायचा. परीक्षेच्या काळातही यात खंड पडत नसे. जागतिक स्तरावरच्या एनबीए स्पर्धा पहाटे उठून पहायचा. लेब्रॉन जेम्स हा त्याचा आदर्श आहे. जेम्सच्या खेळातल्या ट्रिक्‍स प्रकल्प स्वतः खेळताना वापरण्याचा प्रयत्न करतो. पुणे बास्केटबॉल लीग (पीबीएल), बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) आदींनी आयोजिलेल्या स्पर्धांमध्ये तो खेळला व त्यानं उत्तम यश मिळवलं.

डीएव्ही औंध शाळेचे खेळाचे शिक्षक विश्‍वनाथ जगताप सरांच्या मार्गदर्शनात तो बास्केटबॉल टीमचा कप्तान म्हणून इंटर डीएव्ही, सीबीएससी क्‍लस्टर स्पर्धा पनवेल इथं खेळला. ‘वेस्ट झोन डीएव्ही’ स्पर्धा गुजरातला होत्या. सगळ्या टीमचं रेल्वेचं आरक्षण झालं होतं. आदल्या आठवड्यात तो पनवेल इथं खेळून आला होता. त्यानंतर तो आजारी पडला. ताप काही उतरत नव्हता. खोकलाही खूप यायचा. जायचा दिवस उजाडला. सगळ्यांचे फोन यायला सुरवात झाली.

‘आम्ही काळजी घेतो, त्याला पाठवा’ अशी विनंती सरांनी आणि मुलांनी केली; पण डॉक्‍टर म्हणाले ः ‘रक्ताचा रिपोर्ट आल्याशिवाय परवानगी देऊ शकत नाही. प्लेटलेट्‌स कमी झाल्या असतील.’ सगळी मुलं रेल्वे स्टेशनवर अडीच वाजता पोचली. इकडं प्रकल्पच्या जिवाची घालमेल सुरू झाली. ‘मला जायचंच,’ असा हट्ट तो डॉक्‍टरांकडं करू लागला. दुपारी दोन वाजता रिपोर्ट नॉर्मल असल्याचं कळलं. डॉक्‍टरांनी आठ दिवसांच्या गोळ्या-औषधं लिहून दिली. लगेच सव्वातीनच्या गाडीनं तो रवानाही झाला. त्या स्पर्धेतही त्यांना यश मिळाले. मिळणारे यश-अपयश पचवण्याची क्षमता त्याला खेळातून मिळाली. स्पर्धेच्या वेळी विज्ञान शाखेचा बुडणारा अभ्यास त्यानं शिक्षकांच्या मार्गदर्शनात पूर्ण केला. दहावीत ९३ टक्के व बारावीत दोन्ही ग्रुप ठेवून विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. शाळेनं त्याला ‘स्पोर्टस्‌ पर्सन ऑफ द इअर ः २०१६’ घोषित केलं व ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान केला. त्याला अखेरपर्यंत शाळेचं बहुमोल सहकार्य मिळालं.

खेळ व अभ्यास याची उत्तम सांगड त्यानं स्वतःहून घातली होती. त्यासाठी पालक म्हणून आम्ही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि प्रोत्साहन देऊन आवश्‍यक तेव्हा त्याच्या सोबत राहायचो. त्याच्यावर व त्याच्या खेळावर आमचा विश्‍वास होता. प्रकल्पची बहीण रचना ही त्याला सकारात्मक पद्धतीनं त्रुटी सांगत असे व तो त्या दूर करी. शारीरिक तंदुरुस्तीसाठी जास्तीत जास्त प्रोटिन्स मिळावे म्हणून आम्ही त्याला चौरस-पौष्टिक असा दोन्ही प्रकारचा (मांसाहार व शाकाहार) आहार देत असू. त्यामुळं प्रोटिन्स टॉनिकची गरज पडली नाही.

खेळामुळंच नेतृत्वगुण, संघभावना, संवादकौशल्य, सकारात्मक विचार, संघचर्चा इत्यादी गुणांमध्ये वाढ होऊन त्याचा एकूण शारीरिक व बौद्धिक व्यक्तिमत्त्व विकास झाला. यूपीएससीच्या एनडीए परीक्षेद्वारे इंडियन नेव्हल अकादमीत सब लेफ्टनंट कॅडेट म्हणून तो एक ऑगस्ट २०१६ पासून प्रशिक्षण घेत आहे. तिथंही त्याची बास्केटबॉल खेळातली चमक पाहून अकादमीच्या टीममध्ये त्याची निवड झाली आहे.
चांगले खेळाडू तयार होण्यासाठी शासनानं शालेय जीवनापासूनच आवडीचा कोणताही एक खेळ सक्तीचा करावा व त्यासाठी शाळेत किंवा अन्य ठिकाणी सार्वजनिक मैदानं तयार करावीत, तसंच तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करावी. पालकांनीही ‘खेळातून अभ्यासाकडं’ हा मार्ग स्वीकारून मुलांना टीव्ही, मोबाईल, गेम आदींकडून परावृत्त करावं व सक्षम खेळाडू तयार करण्यात हातभार लावावा.
- योजना टेके, पुणे

----------------------------------------------------------------------------------
धाकटा भाऊ झाला बहिणीचा बुद्धिबळातला गुरू

आमचा मुलगा स्वानंद याला बुद्धिबळाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांनीच स्वानंदला लहानपणी बुद्धिबळाची तोंडओळख करून दिली; परंतु त्याला उपजतच आवड असल्यानं त्यानं स्वतःहून त्यात रस घेतला. हळूहळू तो संगणकावर बुद्धिबळ खेळू लागला व एकेक लेवल संगणकाबरोबर जिंकू लागला; पण तोपर्यंत त्याचं खेळणं मर्यादित होतं. गेल्या वर्षी मला असं प्रकर्षानं वाटू लागलं, की त्यानं या खेळात आणखी ज्ञान मिळवावं आणि शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन करावं. त्यादृष्टीने मी शाळेकडं चौकशी केली; पण शाळेत कुणीही क्‍लास घेणारे मार्गदर्शक नव्हते. त्या वेळी आम्ही फलटणमध्ये क्‍लाससंबंधी बऱ्याच ठिकाणी विचारणा केली. चौकशीअंती नझीर काझी यांचं नाव कळलं. त्यानंतर स्वानंदची घरगुती शिकवणी सुरू झाली. काझी सरांनी त्याला सध्याच्या काळातल्या बुद्धिबळातल्या संकल्पना, स्टार्ट गेम, मिडल गेम, एंड गेम या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवून तयार केलं. त्यामुळंच तर तो यंदा २०१६ मध्ये १४ वर्षांच्या आतल्या मुलांमध्ये तालुका स्तरावर पहिला आला. नंतर तो जिल्हा स्तरावर सातही राउंड जिंकून पहिला आला व त्याची कोल्हापूर विभागासाठी निवड झाली. विशेष म्हणजे, हे सगळं करत असताना त्याचं अभ्यासाकडं जराही दुर्लक्ष झालं नाही. तो सध्या आठवी सेमी इंग्लिश असूनही त्याला कोणताच क्‍लास आम्ही लावलेला नाही. तो संगणकाशी बुद्धिबळ खेळतोच; परंतु काही पुस्तकं वाचून व बुद्धिबळाशी संबंधित कोडी सोडवून तो त्यातलं अधिक ज्ञानही मिळवतो. मोठ्या शहरांमध्ये बऱ्याचदा स्पर्धा होत असतात; पण फलटणसारख्या तालुका स्तरावर मुलांना स्पर्धांचा अनुभव मिळत नाही; क्‍लास नसतात. त्यामुळं पुढं जायची इच्छा असूनही अडथळे खूप येतात. क्रीडा विभागानं शालेय स्पर्धांव्यतिरिक्त इतर वेळी अशा स्पर्धा भरवायला हव्यात. खेळांमुळं मुलांमध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम घेण्याची तयारी, अपयश पचवण्याची सवय, आत्मविश्‍वास हे सगळे गुण आपोआप रुजतात. आमच्या घरात तर या खेळामुळं भावा-बहिणीचं नातंही दृढ झालं आहे. त्याची ताई स्वरांजली हिच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा बुद्धिबळाच्या स्पर्धा होत्या, तेव्हा त्यानं तिच्याकडून आठवडाभर इतकी तयारी करून घेतली, की ती कॉलेजमध्ये पहिली आली. अशा प्रकारे धाकटा भाऊ बहिणीचा बुद्धिबळातील गुरू ठरला!
- सुमेधा कुलकर्णी, फलटण (सातारा)

----------------------------------------------------------------------------------
खेळामुळं संघभावना येते, प्रामाणिकपणा वाढीस लागतो

माझा पुतण्या विराज देवकर याला लहानपणापासूनच खेळाची आवड. शालेय क्रीडास्पर्धेत तो नेहमी भाग घ्यायचा. जसजसा तो पुढच्या वर्गात गेला, तसतसं त्याचं खेळाविषयीचं आकर्षणही वाढत गेलं. दहावीचं वर्ष म्हटलं की पालकांना ताण येतो. मुलांनी फक्त अभ्यास करावा असंच त्यांना वाटत. विराजला क्रिकेटची खूप आवड आहे. रोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास सरावासाठी तो मैदानावर जात असे. घरातील सगळे त्याला म्हणायचे ः ‘अभ्यास कर, महत्त्वाचं वर्ष आहे.’ मात्र त्याचं लक्ष फक्त मैदानाकडंच असे. एखाद्या दिवशी बळजबरीनं त्याला घरी थांबवून अभ्यास करायला सांगितलं, तर त्याचं लक्ष लागत नसे. तो म्हणायचा ः ‘मी खेळून आलो की अभ्यास करेन’. थोडा अभ्यास केला तरी तो माझ्या कायमचा लक्षात राहतो आणि मनही प्रसन्न राहतं. म्हणूनच की काय, त्याला दहावीत उत्तम प्रकारे यश मिळालं. म्हणजे अभ्यास हा दहा तास केला काय आणि मन लावून एक तास केला काय, सारखाच होतो हे विराजच्या उदाहरणावरून मला कळलं. मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला सांगितलं, तर मुलांना त्यांचं ध्येय निश्‍चित करता येतं. शरीर आणि मन दोहोंचा एकत्रित विचार केला तर उत्तम व्यक्तिमत्त्व निर्माण होतं आणि शरीर तंदुरुस्त असेल तरच मनही प्रसन्न राहतं. हे खेळामुळं शक्‍य होतं. क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांचा आनंद वेगळाच असतो, हे त्यांच्याकडं पाहिल्यावर जाणवतं. मी शिक्षिका असून, तिसरीच्या वर्गाला शिकवते. मैदानावरून आल्यावर मुलांची ग्रहणक्षमता वाढलेली मला जाणवते. शिकवलेलं त्यांच्या लगेच ध्यानात येतं, कायमचं लक्षात राहतं. खेळाचा तास मुलांना आवडतो. खेळामुळं त्यांच्यात संघभावना, प्रामाणिकपणा, नियमांचं पालन असे अनेक गुण निर्माण होतात. विराज ११ वी ला असला तरी अनेक ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेत, क्‍लबतर्फे घेतल्या जाणाऱ्या सामन्यांत भाग घेतो व यश मिळवतो. अभ्यासही त्याच जिद्दीनं करून परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. मुलांना खेळांकडं वळवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली तर ती आपोआपच सुजाण नागरिक बनतील.
- मनीषा देवकर, कापरे, उरुळी कांचन (हवेली, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com